थोर शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात की, “ज्ञानातील गुंतवणुकीवर सर्वात चांगले व्याज मिळते.” त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अर्थकारणाकडेही तितकेच गांभीर्याने आजही पाहिले जाते. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत भारताचे शिक्षण क्षेत्रही 225 डॉलर्स अब्जचा टप्पा गाठेल, असा एक अंदाज नुकताच वर्तविण्यात आला आहे. 5 ते 24 वर्षे वयोगटातील 580 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या आपल्या युवा देशात एक चांगले भविष्य घडविण्याची क्षमता असलेली युवा प्रतिभा भरपूर प्रमाणात पाहायला मिळते.
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तरुणांना सक्षम करता यावे, म्हणून शिक्षण हे ज्ञान आणि कौशल्य प्रदान करते. शिक्षणाच्या पायाभूत सुविधासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या. कारण, त्यातून शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रउभारणीसाठी दर्जेदार शिक्षण आणि प्रभावी शिक्षणाच्या पायाभूत सुविधा आधारभूत आहेत. तांत्रिक नवकल्पनांमुळे शिक्षण वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. ‘उद्योग (इंडस्ट्री) 4.0’ मध्ये पाऊल टाकताना, आपण पाठ्यपुस्तकांपासून शैक्षणिक उपकरणे, प्रत्यक्ष शिकवण्यापासून व्हिडिओवर आधारित शैक्षणिक मजकूर आणि सूक्ष्म अभ्यासासाठी (मायक्रोलर्निंग) अॅप्स, काळ्या फळ्यांपासून संवादात्मक पांढर्या फळ्यांकडे आणि पारंपरिक वर्गामधून ‘स्मार्ट’ वर्गाकडे वळलो आहोत. शिक्षण संस्था अजूनसुद्धा हा बदल स्वीकारण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि नवीन युगातील शिक्षण परिसंस्थेला समांतर होण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांची पुनर्कल्पना आणि पुनर्रचना केली गेली पाहिजे. मात्र, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागत असल्याने या शैक्षणिक आस्थापना शिक्षण संस्थांसाठी कर्ज घेण्याकरिता वित्तीय संस्थांकडे वळत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातही स्पर्धा वाढत आहे आणि जागा कमी पडत आहे. म्हणून विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण योग्य राखता यावे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता यावा म्हणून स्वतंत्र क्रीडांगण, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मालमत्ता व जागा खरेदी करण्याची शिक्षण संस्थांची योजना आहे. शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रत्येक व्यक्तीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रगत अभ्यासक्रम आणि नवीन युगातील शैक्षणिक चौकटीचे महत्त्व ठळकरित्या मांडलेले आहे. हे धोरण सर्व टप्प्यांमध्ये अनुभवात्मक शिक्षण लागू करण्यासाठी रचले गेले होते, जेथे वर्गातील व्यवहारांना क्षमतेवर आधारित शिक्षण आणि अभ्यासाकडे वळता येईल. सरकारी उपक्रमांच्या अनुषंगाने, शैक्षणिक संस्थांनी आभासी वास्तवावर आधारित शिक्षणाचा नमुना, पसंतीप्रमाणे केलेल्या अभ्यासाची योजना रचण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, खेळावर आधारित शैक्षणिक प्रश्नमंजुषा आणि शैक्षणिक नोंदींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांसारख्या डिजिटल साधनांना सामावून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांचा अनुभव वाढविण्यासाठी संस्थांनी जीवतंत्रविद्या, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि क्रीडा उपकरणांवर विशेष लक्ष देऊन मैदानी शिक्षणांमध्येही गुंतवणूक केली पाहिजे.
आजकालच्या विद्यार्थ्यांचे मन चंचल असल्याने फारकाळ कुठल्याही गोष्टींमध्ये त्यांचे लक्ष लागत नाही आणि म्हणूनच शिक्षक व संस्थांनी एकत्र येऊन एका लहानशा घासाएवढे सूक्ष्मशिक्षण मजकुराची रचना केली आहे. ‘स्मार्टफोन’, ‘स्मार्ट बोर्ड्स’, ‘आयओटी’ वर आधारित हजेरीसाठी प्रणाली आणि सुरक्षा साधनांच्या स्वरूपात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ विद्यार्थ्यांचा अनुभव वृद्धिंगत करतात आणि याशिवाय महामारीसारख्या अपरिहार्य परिस्थितीत विनाअडथळा येता, शिक्षण सुनिश्चित करतात. शिक्षण संस्थांनी पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करताना या अद्ययावत शैक्षणिक गोष्टींचा विचार केला पाहिजे.भांडवली खर्च कार्य करण्यासाठी लागणारा खर्च आणि शिल्लक स्थानांतरण आवश्यकता-अशा आर्थिक गरजा ओळखणे आणि त्यांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. मालमत्ता खरेदी, अस्तित्वात असलेल्या जागेचे व्यापक नूतनीकरण किंवा इमारत व शाळेच्या बसची खरेदी यांसारख्या दीर्घकालीन मालमत्तेची देखभाल करणे, असे दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या खर्चाचे ‘भांडवली खर्च’ म्हणून वर्गीकरण केले जाईल.
दुसरीकडे, उपयुक्त गोष्टी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन आणि प्रत्येक माणसामागे येणारा खर्च (सामान्य आणि प्रशासकीय) यासारखे वारंवार होणारे भांडवली खर्च आहेत. याव्यतिरिक्त, बर्याच वित्तीय संस्था या कधीकधी त्यांच्या गरजा व आवश्यकता पूर्ण करणारे कमालीचे-व्यक्तीप्रमाणे (व्यक्तिकृत)वित्तपुरवठा करणारे कोणी भेटल्यास शिल्लक स्थानांतर करण्याचा पर्याय निवडतात.शैक्षणिक संस्थांनी अशा वित्तीय संस्थांशी भागीदारी केली पाहिजे, जे जास्तीत जास्त फायद्यांसह संरचित शैक्षणिक पायाभूत कर्जे आणि दर्जेदार वित्तपुरवठ्याचे उपाय उपलब्ध करून देतात. अचूक आर्थिक गरजा भागविणार्या संयमी भांडवलाची निवड करणे योग्य ठरते. शैक्षणिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या अनेक नवीन युगातील शिक्षणकेंद्रित वित्तीय संस्थांकडे सर्वोत्तम सेवा देण्याचे कौशल्य आहे. शैक्षणिक संस्थांना तंत्रज्ञान आणि साहित्य पुरविणार्या ‘के-12’ आस्थापना, उच्च शैक्षणिक महाविद्यालये, नामांकित कोचिंग आणि प्रशिक्षण संस्था व संघटना यांना शिक्षण संस्थासाठी कर्जाचा पर्याय निवडता येईल. यामुळे त्यांना विद्यार्थी वर्गाचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करून भविष्यासाठी तयार करता येण्यासाठी एक मजबूत शैक्षणिक वातावरण व अद्ययावत सुविधा प्रदान करता येतील.
-विवेक बरनवाल
(लेखक चीफ बिझनेस ऑफिसर, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन लोन अॅण्ड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर लोन्स - अवान्स (अवन्से) फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत.)