‘आयएएस’ नव्हे ’एसएआय’ ई‘नामदार ’

07 Mar 2023 19:47:57
S. A. Inamdar Readymade Matching Blouse Pvt Ltd

‘आयएएस’चे स्वप्न अधुरे राहिले, तरी ’एसएआय’ अर्थात ‘एस. ए. इनामदार’ हा ‘रेडिमेड’, ‘मॅचिंग ब्लाऊज’चा नामांकित ब्रॅण्ड त्यांनी सातासमुद्रापार पोहोचविला. अशा श्वेता इनामदार यांच्या आगळ्या उद्योगाची रौप्यमहोत्सवी वाटचाल समस्त महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे. अनेक स्थित्यंतरे आणि अडचणींवर मात करून ‘प्रोप्रायटरशीप’ ते ‘एस. ए. इनामदार रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज प्रा.लिमिटेड’ कंपनीपर्यंत झेप घेतली. त्या, श्वेता यांना ’एसएआय’ ’ई’नामदार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


पुण्याचे एस. ए. इनामदार अर्थात सुभाष अनंत इनामदार यांनी भारतीय वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करून १९७९ साली पुण्यात रेडिमेड ब्लाऊजचे दुकान थाटले. पत्नी, आई यांच्या सोबतीने सुरु केलेल्या या उद्योगात त्यांच्या ज्येष्ठ कन्या श्वेता इनामदार शाळेच्या सुट्ट्यांमध्ये तसेच फावल्या वेळेत हातभार लावत. शालेय वयात ‘आयएएस’ची स्वप्नं रंगवणार्‍या श्वेता यांना तसूभरही कल्पना नव्हती की, भविष्यात इनामदारांच्या या व्यवसायाची सर्वस्वी धुरा त्यांच्यावर पडेल. नियतीचा क्रूर खेळ, दि. ६ जुलै, १९९२ रोजी सुभाष इनामदारांचे वयाच्या ४८व्या वर्षी अचानक निधन झाले. इनामदार कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला. श्वेताच्या आईला हा धक्का सहन झाला नव्हता, बहीण प्रांजली लहान होती आणि मोठा भाऊ गतिमंद असल्याने असाहाय्य होता. त्यात श्वेता यांची दिल्लीला ‘आयएएस’ची प्रवेश परीक्षा असल्यामुळे अगदी जड अंत:करणाने दुसर्‍याच दिवशी ७ जुलैला त्यांना दिल्लीसाठी जावे लागले. इकडे नात्यागोत्यांनी पाठ फिरवली, सर्व उद्ध्वस्त झाले होते.

दिल्लीहून परीक्षा देऊन परतल्यानंतर हलाखीच्या परिस्थिती पाहून श्वेता खचून गेल्या. पण, त्या डगमगल्या नाहीत. ‘आयएएस’ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. परंतु, कौटुंबिक जबाबदार्‍यांचे जोखड खांद्यावर पडल्याने श्वेता यांनी ‘आयएएस’च्या स्वप्नाला तिलांजली दिली. अन् ’आयएएस’ बनता आले नाही तरी, ’एसएआय’ (एस. ए. इनामदार अ‍ॅण्ड कंपनी) पुढे न्यायचा निर्धार त्यांनी केला. ऐन विशीत विद्यार्थीदशेत व्यवसायाचा कुठलाही पूर्वानुभव गाठीशी नसताना श्वेता यांनी ’एसएआय’ची धुरा खांद्यावर घेत त्या उद्योजकाच्या भूमिकेत शिरल्या. पुढे कालौघात त्यांनी ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि नंतर ‘सिम्बॉयसीस’मधून ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन’चे शिक्षण पूर्ण केले. परंतु, प्रारंभी दुकान चालवण्यापासून ते अगदी बँकेचे व्यवहार, कोर्टकचेर्‍या यांचे कसलेही ज्ञान गाठीशी नसताना त्यांनी सर्व जबाबदार्‍या सक्षमपणे पेलत ग्राहकांना पुन्हा आपलेसे केले.

लग्नानंतर ठाण्यात स्थायिक झाल्यावर काही काळ ठाणे-पुणे असा दररोज प्रवास केला. परंतु, सांसारिक जबाबदार्‍या आणि रोजची दगदग लक्षात घेता, १९९८ साली त्यांनी ‘एस. ए. इनामदार’ याच नावाने ठाण्यात पहिले ‘रेडिमेड ब्लाऊजेस’चे शोरुम सुरु केले. त्यावेळीही आलेल्या आव्हानांचा सामना करीत अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास कमावला. या काळात त्यांच्या पतीचीही नोकरी गेली. परंतु, श्वेता यांनी न डगमगता नावीन्यपूर्ण प्रयोगांची जोड देऊन उद्योग अधिकाधिक विस्तारला. देश-विदेशी विविध ‘एक्झिबिशन्स’मध्ये त्या सहभागी झाल्या. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे नवे ते सर्व आत्मसात करीत संपूर्ण भारत पिंजून काढला. विविध प्रकारच्या ‘फॅब्रिक्स’ वापरुन ब्लाऊजेसमध्ये कलात्मकता दाखविली. त्यांचे स्केचिंग चांगले असल्यामुळे कटिंग, प्रॉडक्शनमध्येही त्यांचा हळूहळू चांगलाच जम बसला. आज ‘एस. ए. इनामदार’ हा रेडिमेड ब्लाऊज क्षेत्रातला एक नामांकित ब्रॅण्ड असून विविध क्षेत्रात तसेच मालिकांमध्येही इनामदारांचे ब्लाऊजेस झळकत असल्याचे श्वेता अभिमानाने सांगतात. २०१० साली रेडिमेड ब्लाऊजेसची वाढती मागणी लक्षात घेता, श्वेता यांनी मुंबईतील दादर येथे शोरुम सुरु केले.


S. A. Inamdar Readymade Matching Blouse Pvt Ltd


दरम्यान, २०१५ मध्ये मोठा अपघात घडला, १६ फूट उंचावरून खाली पडल्याने दोन-अडीच वर्षे ‘कॅथेटर’चे (कृत्रिम मलमूत्र विसर्जन) लोढणे झेलत वॉकरच्या साहाय्याने चालत त्यांनी व्यवसाय सांभाळला. या काळात कॅथेटरही त्यांनी ’एस.ए.इनामदार’च्या बॅगेत मिरवत आपल्या व्यवसायाचे ब्रॅण्डिंग करण्याची संधी दवडली नाही. “माझा रक्तगटच ’बी पॉझिटिव्ह’ असल्याने प्रत्येक अडचणीत व्यावसायिक संधी शोधते,” असे त्या सांगतात. उद्योजिका म्हणून आजवरच्या अनुभवांचे संचित आणि संभाषण कौशल्याच्या जोरावर ‘ऑनलाईन’ माध्यमांचा वापर करुन उद्योजकांना व्यवसाय प्रशिक्षणाचे धडे दिले. आजघडीला त्यांच्या ऐरोली येथील वर्कशॉप व सर्व शोरूममध्ये मिळून २० जणी कार्यरत असून त्यांनी ही कंपनी आता ‘प्रायव्हेट लिमिटेड’ केली आहे.

पुढे २०१९ साली त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय भरारी घेत अमेरिकेत शोरुम सुरू करुन इनामदारांची पताका सातासमुद्रापार फडकावली. आधी ८० ‘पॅटर्न’ होते, आज त्यांच्याकडे तब्बल १५० ’पॅटर्न’ असून विविध सेलिब्रिटींबरोबरच नामवंत वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी ते अगदी सर्वसामान्य महिलावर्गालाही त्यांचे मनपसंत ब्लाऊज इनामदारांकडे हमखास मिळतात. वयोपरत्वे शरीर थकले, संवेदना हरपल्या, तरीही श्वेता जिद्दीच्या जोरावर त्यांच्या उद्योगाच्या पंचविशीत धीराने पावले टाकत ’ब्रॅण्ड’ टिकवून आहेत. नवउद्योजकांना संदेश देताना त्या, “२०३५ पर्यंत भारताला सुवर्णकाळ आहे, तेव्हा सोशल मीडियात वेळ वाया न घालवता एखादा व्यवसाय करा. किंबहुना, त्यात सातत्य बाळगा, चिकाटीने समर्पण केल्यास यश हमखास मिळेल,” असे सांगतात. “संधी मिळाली तर स्वर्गातही दुकान थाटून तेथील अप्सरा व देवींना ब्लाऊज विकायला मला आवडेल,” असे गमतीने सांगणार्‍या श्वेता यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता श्वेता यांची मुलगी शाल्विका जोशी-इनामदार हीदेखील याच व्यवसायात उतरली असून ’मिळून दोघीजणी’ नव्या ध्येयधोरणांसह ’एसएआय’चे शिवधनुष्य लीलया पेलत आहेत. त्यांच्या या उद्यमी धडपडीला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



(अधिक माहितीसाठी संपर्क : श्वेता इनामदार - ९८२०१९८१६६)


Powered By Sangraha 9.0