दि. ३ मार्च, १९२४ची रात्र आणि दि. ४ मार्च, १९२४चा उगवता दिवस या काळात श्यामलालजींनी झपाटल्यासारखी ही कविता लिहून काढली आणि ते झोपी गेले. दिवस उजाडल्यावर, कविता पुन्हा वाचल्यावर त्यांच्या स्वतःच्याच लक्षात आलं की, एक उत्कृष्ट ध्वजगीत आपल्या लेखणीतून अवतरलं आहे.
‘वंदे मातरम्’ हे काव्य बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चतर्जी यांना १८७० साली स्फुरलं. असं सांगितलं जातं की, हे काव्य स्फुरत असताना बंकिमबाबू एका विलक्षण अशा भावावस्थेमध्ये होते. पुढे १८८२ मध्ये त्यांनी ‘आनंदमठ’ नावाची कादंबरी लिहिली. तिच्यात त्यांनी हे काव्य समाविष्ट केले.संस्कृतप्रचुर बंगाली भाषेतलं हे काव्य भारतमातेच्या भक्तीने आणि एकंदरीतच उत्कृष्ट काव्यगुणांनी इतके परिपूर्ण होते की, अल्पावधीतच ते लोकप्रिय झालं. इतकं की, स्वतः कवी असलेल्या गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर उर्फ टागोरांनी १८९६ सालच्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात ते व्यासपीठावरून गायलं. मात्र, त्या गीताला आणि नुसत्या ‘वंदे मातरम्’ या शब्दांना मंत्रमयना प्राप्त झाली ती १९०५ साली! त्यावर्षी व्हॉईसरॉय लॉर्ड नाथानेल कर्झन याने बंगालची फाळणी केली. संपूर्ण देश वंगभंग विरोधी आंदोलनाने पेटून उठला. खुद्द बंगाल प्रांतात बिपीनचंद्र पाल यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी राजसत्तेविरूद्ध विरोधाचा आगडोंब उसळला. पाल बाबूंनी ‘वंदे मातरम्’ या नावाचंएक बंगाली साप्ताहिक सुरू केलं. त्याचे संपादक होतेबाबू अरविंद घोष. या पत्रातल्या ज्वलज्जहाल नि देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या लेखनाने प्रेरित होऊन शेकडो तरुणांनी ‘वंदे मातरम्’ (किंवा बंगालीत बंदे मातरम्)चा जयघोष करीत वंगभंग आंदोलनात हसत हसत प्राण झोकून दिले.
पुढे १९११ साली रवींद्रनाथ ठाकुरांनी ‘ब्राह्मो समाज’ या बंगालमधल्या एका धार्मिक पंथाच्या पत्रात ‘भारत भाग्यविधाता’ या नावाची एक कविता लिहिली. १९१२ साली रवींद्रनाथांची भाची सरलादेवी चौधराणी यांनी काही प्रमुख काँग्रेस नेत्यांसमोर ती गायली. खुद्द कविराज रवींद्रनाथ कविता म्हटल्यावर उत्कृष्ट काव्यगुणांनी ती नटलेली असणार, हे वेगळं सांगायला नकोच. अल्पावधीत ती देखील लोकप्रिय झाली. ‘जन गण मन अधिनायक जय हे’ हा त्या कवितेचा प्रथम चरण होता. बंकिमबाबूंनी भारतमातेला ‘जगदंबा’ मानून तिचं स्तुतिस्तोत्र रचलं होतं, तर रवींद्रबाबूंनी भारत देशाचा भाग्यविधाता असणार्या अधिनायक अशा परमेश्वराचा जयजयकार केला होता.
१९०५ ते १९१२ या कालखंडात ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ ही गीतं देशभर लोकप्रिय होत असतानाच आणखी एक गीताचं बीज पडत होतं. १९०६ सालचं काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन कोलकोत्यालाच झालं. दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. त्या अधिवेशनासाठी पिंगाली वेंकय्या नावाचे एक कार्यकर्ते आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातूनआले होते. त्या काळातल्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचं कर्तृत्व बघितल्यावर थक्क व्हायला होतं नि लक्षात येतं की सामान्य भासणारे हे लोक अजिबात सामान्य नव्हते. हे पिंगाली वेंकय्या निवृत्त सैनिक होते. ते लष्करी सेवेत असताना म्हणजे, १८९९ साली इंग्रजांचं दक्षिण आफ्रिकेत बोअर लोकांशी युद्ध जुंपलं. वेंकय्यांचं सैन्य पथक दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आलं. तिथे लढत असताना एकदा वेंकय्यांची गांधीजींशी भेट झाली. त्यावेळी गांधीजी अजून ‘महात्मा’ झाले नव्हते. ‘बॅरिस्टर गांधी’ म्हणून ते ब्रिटिश सैन्यपथकांना वैद्यकीय सेवा देणार्या नागरी पथकाचे कार्यकर्ते होते. पुढे सैन्यातून निवृत्त होऊन वेंकय्यांनी ‘भूगर्भशास्त्र’ या विषयाचा कसून अभ्यास केला. त्यांनी नेल्लोर जिल्ह्यात प्रथम अभ्रकाचा आणि हिर्याचा शोध लावला.खाणीतून हिरे कसे काढावेत, याबाबत त्यांनी इतकं कौशल्य प्राप्त केलं की, लोक त्यांना ‘डायमंड वेंकय्या’ म्हणू लागले. मग त्यांनी कापूस उत्पादनात लक्ष घातलं.
कंबोडियातून आणलेल्या एका विशिष्ट बियाण्याच्या लागवडीतून त्यांनी उत्तम आणि भरपूर कापूस उत्पादनकाढून दाखवलं. आता लोक त्यांना ‘पट्टी वेंकय्या’ म्हणजे ‘कापूस वेंकय्या’ म्हणू लागले. मग त्यांनी विविध भाषा शिकण्याकडे लक्ष घातलं. अल्पावधीत त्यांनी अनेक देशी-परदेशी भाषा आत्मसात केल्या. त्यातही जपानी भाषा ते फारच सफाईने बोलू लागले. म्हणून त्यांना ‘जपान वेंकय्या’ म्हणू लागले. असा हा माणूस लौकिक जीवनात काय होता? तर ते मछलीपट्टणच्या एका कॉलेजात प्राध्यापक होते. काँग्रेस हा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष असला, तरी त्याची सगळी चळवळ सनदशीर मार्गाने होती. त्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशनात गे्रट ब्रिटनचा ध्वज, ज्याला ‘युनियन जॅक’ म्हणतात, तोच फडकवला जात असे. १९०६च्या कोलकाता अधिवेशनाला आंध्र प्रांताचे प्रतिनिधी (तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी) म्हणून उपस्थित असलेल्या पिंगाली वेेंकय्यांना ही गोष्ट फारच खटकली. ‘युनियन जॅक’ला अभिवादन करण्याच्या वेळेस ते मुद्दाम अधिवेशन मंडपापासून लांब राहिले.पण, तेव्हापासून त्यांच्या डोक्यातली चक्रं फिरू लागली.
काँग्रेस पक्षाचा आणि नंतर स्वतंत्र भारताचा वेगळा झेंडा हवा. संपूर्ण भारताची अस्मिता ज्याच्यातून प्रकटेल, असा झेंडा हवा. तब्बल १५ वर्षांनी म्हणजे १९२१ साली आंध्र प्रदेशात विजयवाडा (तत्कालीन बेझवाडा) या ठिकाणी काँग्रेस अधिवेशन भरलं. या अधिवेशनात पिंगाली वेंकय्यांनी महात्मा गांधींना एका झेंड्याचा नमुना दाखवला. हा झेंडा दुरंगी होता. देशातल्या हिंदूंचा प्रातिनिधिक म्हणून लाल रंग आणि मुसलमानांचा प्रातिनिधिक म्हणून हिरवा रंग असे दोन रंगांचे पट्टे आणि त्यावर चरख्याचं चित्र, असा हा झेंडा होता. गांधीजींनी पक्षाच्या कार्यकारी समितीकडे तो नमुना विचारार्थ पाठवला.नंतर त्याबाबत खूप विचारविनिमय झाला. गांधीजींच्या सूचनेवरून वेंकय्यांनी सर्वांत वरचा पट्टा पांढरा, जो अन्य सर्व जाती-जमातींचं प्रातिनिधिक रूप, मधला पट्टा हिरवा, जो मुसलमानांचं प्रतिनिधित्व करतो आणि सर्वांत खालचा पट्टा लालऐवजी नारिंगी, जो हिंदूंचं प्रतिनिधित्व करतो, असा नवा ध्वज बनवला. चरख्याची आकृती या तीनही पट्ट्यांमध्ये व्यापून होती. १९२१ सालापासून हा ध्वज काँग्रेस पक्षाचा आणि पर्यायाने स्वतंत्र भारताचा ध्वज असेल, असं ठरलं. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांमध्ये हा झेंडा आवर्जून फडकावला जाऊ लागला. इंग्रजी झेंड्याला जसं ‘युनियन जॅक’ म्हणतात, तस या झेंड्याला ‘तिरंगा’ म्हणावं, असंही ठरलं.
पुढे दि. २२ जुलै, १९४७ या दिवशी घटना समितीच्या बैठकीत असे ठरलं की नारिंगी रंग सर्वात वर, मध्ये पांढरा आणि तळाशी हिरवा अशा क्रमाने रंग असावेत आणि चरख्याऐेवजी २४ आरे असलेले अशोकचक्र किंवा धम्मचक्र हे मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगात असावं. आज हाच आपला राष्ट्रीय झेंडा आहे.पण, १९२१ आणि १९४७च्या दरम्यान आणखी एक घटना घडली होती. श्यामलाल गुप्त हे कानपूरचे रहिवासी. त्यांचे वडील व्यापारी होते. पण, उत्तर प्रदेशातले एक प्रभावी काँग्रेस नेते गणेश शंकर विद्यार्थी यांच्या संपर्काने स्वातंत्र्य आंदोलनात उतरलेल्या श्यामलालने वडिलोपार्जित व्यवसायात न पडता ‘राष्ट्रीय शिक्षक’ म्हणून नोकरी धरली. व्यापारी समाजाच्या दृष्टीने व्यवसाय न करता नोकरी करणं म्हणजे भीक मागण्याची लक्षणं आणि नोकरी तरी कसली, तर मास्तराची! पोरगा वाया गेला. श्यामलाल १९२१च्या आंदोलनात तुरुंगात गेले. पुढे १९३० ते १९४४ या काळात ते फत्तेपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनले. श्यामलाल चांगले कवीदेखील होते. १९२१च्या आंदोलनात जेलयात्रा करून आल्यावर श्यामलाल गांधीजींच्या भाषणांनी, तिरंग्याच्या भक्तीने फारच भारावून गेले होते. एखादी घटना, एखादं ठिकाण, एखादी व्यक्ती याप्रमाणेच एखादं निशाणसुद्धा माणसाच्या मनावर फार प्रभाव पाडू शकतं.अशा या अतिशय भारलेल्या, उत्कट मनोवस्थेत असताना श्यामलालजींना काव्य स्फुरु लागलं-
विजयी विश्व तिरंगा प्यारा।
झंडा ऊँचा रहे हमारा॥
सदा शक्ति बरसानेवाला।
प्रेमसुधा सरसानेवाला।
वीरों को हर्षानेवाला।
मातृभूमि का जनमन सारा ॥१॥
स्वतंत्रता के भीषण रण में।
रख कर जोश बढे क्षण क्षण में।
काँपे शत्रू देखकर मन में।
मिट जाये भय संकट सारा ॥२॥
इस झंडे की के नीचे निर्भय।
हो स्वराज जनता का निश्चय।
बोलो भारतमाता की जय।
स्वतंत्रता ही ध्येय हमारा ॥३॥
आओ प्यारे वीरों भाओ।
देश धर्म पर बलि-बलि जाओं।
एक साथ सब मिलकर गाओ।
प्यारा भारत देश हमारा ॥४॥
शान न इसकी जाने पाये।
चाहे जान भले ही जाये।
विश्व विजय करके दिखलायें।
तब हो ये प्रण पूर्ण हमारा ॥५॥
दि. ३ मार्च, १९२४ची रात्र आणि दि. ४ मार्च, १९२४चा उगवता दिवस या काळात श्यामलालजींनी झपाटल्यासारखी ही कविता लिहून काढली आणि ते झोपी गेले. दिवस उजाडल्यावर, कविता पुन्हा वाचल्यावर त्यांच्या स्वतःच्याच लक्षात आलं की, एक उत्कृष्ट ध्वजगीत आपल्या लेखणीतून अवतरलं आहे. कानपूरच्या सभा प्रेसचा मालक त्यांचा मित्र होता. त्याने एक चांगली कविता म्हणून पत्रकावर छापून ती वितरीत केली. पुढच्या काही दिवसांत त्या पत्रकाला इतकी मागणी आली की, खन्ना प्रेसने पुन:पुन्हा छापलेल्या पाच हजार प्रती चुटकीसरशी खपल्या. सगळ्या कानपूरभर ते गीत ज्याच्या-त्याच्या तोंडी झालं. लगेच १३ एप्रिल रोजी कानपूरच्या फूलबागेत जलियाँवाला बाग कत्तलीचा पाचवा स्मृतिदिन होता. त्याला खुद्द पंडित नेहरू उपस्थित होते. तिथे हे गीत सादर करण्यात आलं. नेहरू बेहद खूश झाले. मग ते गीत देशभर पसरत गेले. १९३८ साली गुजरातमधल्या हरिपुरा इथल्या काँग्रेस अधिवेशनात सरोजिनी नायडूंनी हे गीत मंचावरून गायलं. सरोजिनी नायडूंना त्याकाळी ’नाईटिंगेल ऑफ इंडिया’ म्हटले जात असे. १९४८ साली ’आझादी ही राह पर’ किंवा ’स्वतंत्रता के पथ पर’ या हिंदी चित्रपटात हे गीत समाविष्ट करण्यात आलं होतं. पृथ्वीराज कपूर नायक असलेल्यां या देशभक्तीपर चित्रपटात साहिर लुधियानवी आणि क्रांतिकारक हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या गीतांसह कवी श्यामलाल गुप्त उर्फ पार्षद (त्यांचं कविता करतानाचं टोपण नाव) यांचं हे गीतही होतं. आता त्या गीताला ९९ वर्षं पूर्ण होऊन ते शताब्दीत पदार्पण करीत आहे.