एका प्रवासवेड्याची मुंबई ते लंडन दुचाकीवारी...

04 Mar 2023 19:38:37
Yogesh Alekari


आपण भारतीयांना युरोप खंडाचे तसे नेहमीच आकर्षण. लंडन, पॅरिस, रोम यांसारखी अतिप्रगत शहरे जगभरातील पर्यटकांना खुणावतात. पण, सोबतीला आल्प्स पर्वतराजीत विसावलेली सुंदर सुंदर खेडी, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, ग्रीसमध्ये आढळणारी प्राचीन शहरे व त्यांचे अवशेष, इटलीचे सुंदर समुद्रकिनारे बहुतांशी वाचनांतून अथवा छायाचित्रांतूनच आपल्या भेटीला येतात. परंतु, आजच्या या लेखातून आपण अशा एका अवलियाचा परिचय करुन देणार आहोत, ज्याने ही कल्पना सत्यात उतरविली आणि यशस्वीही करुन दाखविली...


योगेश आलेकरी... मूळचा सांगली जिल्ह्यातला हा अवलिया सध्या नवी मुंबईत स्थायिक. योगेशला प्रवासाचे भारी वेड. त्यातही दुचाकी (बाईक राईड) हा त्याचा आवडता छंद. बाईक घेऊन महिनोन्महिना फिरत राहायचे, मग कोणी सोबत असो वा नसो. या सफारीमधूनच मग उत्तरेला उत्तुंग हिमालयाच्या पर्वतरांगा अगदी अरूणाचल ते काश्मीरपर्यंत योगेशने पालथा घातल्या. लडाख, स्पिती ही सर्वांची ‘ड्रीम राईड’ ही योगेशने अनेकदा पूर्ण केली. पश्चिमेला थारचे व कच्छचे वाळवंटी प्रदेशही बाईकवरूनच पादाक्रांत केले. त्यानंतर ईशान्येकडील राज्यांमधील घनदाट जंगलेही पाहून झाली. आसाम, अरुणाचल, मेघालय, नागालॅण्डमधील ‘बाईक राईड’चे त्याचे अनुभव तर अगदी तासन्तास ऐकत बसावे, असेच.
 
 
भारत असा उभा-आडवा फिरून झाल्यावर योगेशला करमेना. मग त्याला देशाबाहेरील रस्त्यांवर गाडी चालवावीशी वाटली तर त्यात नवल ते काय! योगेशने या दरम्यान नेपाळ, भूतानमध्ये ‘बाईक राईड’चा अनुभव वृद्धिंगत केला आहेच. पण, त्याव्यतिरिक्त दक्षिण आशियातील कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांतही दुचाकी भ्रमंती केली. रस्त्याच्या उजव्या बाजूने ‘ड्रायव्हिंग’ असणार्‍या या देशांत योगेश आणि त्याच्या मित्रांनी मोटरसायकलवर भरपूर धमाल केली. असे देशीविदेशी प्रवासाचे कित्येक अनुभव गाठीशी बांधल्यावर या साहसी प्रवासवेड्याने आता चंग बांधलाय मुंबई ते लंडन दुचाकीवारीचा!येत्या मे महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा तरुण सीमोल्लंघनासाठी सज्ज असेल. या नियोजित ’बाईक राईड’मध्ये २४ देश, तीन खंड आणि २५ हजारांहून अधिक किलोमीटर असा अवाढव्य कार्यक्रम योगेशने आखला आहे.

योगेश हा प्रवास १०० दिवसांत एकट्यानेच पूर्ण करणार आहे. भारत, नेपाळ, दुबई, इराण, तुर्की आणि मग पुढे तो युरोपियन देशांत प्रवेश करून इंग्लंडमध्ये पोहोचेल. त्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे प्रयाण करत आफ्रिकेतील मोरोक्को या देशात काही दिवस ‘राईड’ करुन पुन्हा पोर्तुगाल, स्पेन मार्गे त्याचा परतीचा प्रवास सुरु होईल.या प्रचंड साहसी आणि क्षमतेचा कस पाहणार्‍या प्रवासात योगेश हिमालयाच्या कुशीत थंडगार वातावरणात ‘बाईक राईड’ करेलच, पण पुढे संयुक्त अरब अमिरातीमध्ये मानवनिर्मित ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’चे आविष्कार पाहत शारजा, अबुधाबीही पालथी घालेल. आज दुबईच्या वाळवंटातून पुढे इराणमध्ये पारशी संस्कृतीच्या खाणाखुणा पाहत अलबोर्झ आणि खोरस्सन या पहाडी भागातून पुढे तेहरान या इराणच्या राजधानीच्या शहरात काही दिवस राहून आणि नंतर कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनारपट्टी वरून ’राईड’ करून तुर्कस्तानमध्ये पोहोचेल.


तुर्की या एकेकाळच्या ऑटोमन साम्राज्याच्या देशातील डार्क कॅनयन या अतिसाहसी मार्गावरून पुढे अंकारा या राजधानीच्या शहरात मुक्काम आणि मग पुढे ऐतिहासिक कॉन्स्टान्टिनोपल म्हणजे आत्ताचे इस्तंबूल शहर, असे या प्रवासाचे एक मुख्य आकर्षण असल्याचे योगेश सांगतो. दोन खंडांत विभागलेल्या जगातील या एकमेव शहरास भेट देण्याची त्याची बर्‍याच वर्षांची इच्छा यानिमित्ताने पूर्णत्वास जात आहे. इथून पुढे ग्रीसमधून त्याचा प्रवास सुरु होईल. त्यामध्ये अथेन्स हे चार हजार वर्षे जुने ऐतिहासिक शहरही योगेशला खुणावते आहे.

जगज्जेत्या सिकंदरच्या देशात काही काळ राहून तिथून मग रोमनांच्या इटलीमध्ये जाऊन ऐतिहासिक रोम, कालव्यांची नगरी व्हेनिस पाहून याचा प्रवास आल्प्स पर्वताच्या कुशीत वसलेले ऑस्ट्रिया या सुंदर देशात पोहोचेल. मग हंगेरी, झेक, दुसर्‍या महायुद्धाला कारणीभूत ठरलेले आणि आत्ताचे ‘ऑटोमोबाईल हब’ जर्मनी लागेल. युरोपमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने बराच मोठा असलेला हा देश व आजूबाजूची इतर युरोपियन राष्ट्रे पालथी घालून इंग्लिश खाडी पार करून इच्छित स्थळी सुमारे दोन महिन्यांनी लंडन या जगविख्यात शहरात पोहोचण्याचे योगेशचे नियोजन आहे.इंग्लंडच्या मुक्कामात ब्रिटिश लायब्ररी, वीर सावरकर, गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्थाने पाहण्याची इच्छाही योगेश व्यक्त करतो. त्याचबरोबर थेम्स नदीचे खोरे, वेल्सचा स्वच्छ सुंदर कन्ट्री साईड भाग, ऑक्सफर्ड-केम्ब्रिज विद्यापीठं ही पाहण्याचाही योगेश यांचा मानस आहे. १०-१२ दिवस लंडनमध्ये वास्तव्य करून आपली ‘रॉयल एम्फिल्ड’ घेऊन योगेश आफ्रिका खंडांत असलेल्या मोरोक्को या देशात जाण्यासाठी दक्षिणेकडे प्रस्थान करेल.

फ्रान्समधील पॅरिस या जगप्रसिद्ध शहरात मुक्काम करून सात आश्चर्यांपैकी एक असलेले आयफेल टॉवर पाहून फ्रान्समधून स्वित्झर्लंडमध्ये पोहोचून पुन्हा आल्प्सची पर्वतराजी, हिरवेगार गालिचे व त्यावर वसलेली सुंदर खेडी, या पार्श्वभूमीवर सदैव बर्फाच्छादित शिखरे, सुंदर वळणावळणाचे रस्ते असे नजरे डोळ्यात साठवून फ्रेंच रिव्हेरिया भागातून दक्षिण दिशेकडे प्रवास चालू राहील. काही दिवसांनी मग फुटबॉलपटूंच्या देशात म्हणणजेच स्पेनमधील विविध शहरे पार करत युरोपच्या दक्षिण टोकाला पोहोचून ‘जिब्राल्टर’चा समुद्र फेरी बोटीने पार करत, आपला एक भारतीय मोटरसायकलस्वार आफ्रिकेत पोहोचेल.


‘टॅनजियर’ बंदरात उतरुन योगेश पुढे कासाब्लँका या मोरोक्कोच्या राजधानीच्या शहरात जाईल आणि हजार ते बाराशे किमीमध्ये हा देश पालथा घालून मोरोक्को या अरब देशातील ऐतिहासिक स्थळं, सांस्कृतिक समन्वय पाहत पुन्हा उत्तरेकडे युरोपकडे रवाना व्हावे लागेल. तिथून पोर्तुगाल आणि स्पेन हे देश पालथे करुन माद्रिदवरून फुटबॉल खेळाची राजधानी मानली गेलेल्या बार्सिलोना या प्रसिद्ध शहरात काही काळ मुक्काम होईल आणि इथूनच योगेश परतीचा प्रवास सुरु करेल.अशा या साहसी आणि अतिदूरच्या प्रवासाच्या तयारीबद्दल या अवलिया ‘रायडर’ला विचारले असता योगेश पुढे सांगतो की, “जवळपास सहा महिन्यांपासून या साहसी मोहिमेच्या तयारीत आहे. वेगवेगळ्या देशांत जर आपल्या भारतीय मोटरसायकलने प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी खूप वेगवेगळे कायदेकानून असतात, ते सर्वप्रथम जाणून घ्यावे लागतात.”

आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाना बनवून घ्यावा लागतो. त्याचबरोबर जर अशी ‘रोड ट्रिप’ स्वत:च्या वाहनाने करणार असाल, तर सर्वांत महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे ‘कार्नेट’ हे एक कस्टम कागदपत्र आहे किंवा आपण त्याला बाईकचा ‘पासपोर्ट’सुद्धा म्हणू शकतो. ’कारनेट’ मिळवणे हे सर्वात खर्चिक काम. त्यासाठी आपल्याला काही लाख रुपये मोजावे लागतात आणि त्याची वैधता फक्त एका वर्षासाठी असते. त्यानंतर वेगवेगळ्या देशांचे ‘व्हिसा’ मिळवणे हा अजून एक महत्त्वाचा टप्पा. त्यापुढील काम असते, स्वतःचा आणि आपल्या बाईकचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वैध राहील, असा विमा उतरवणे. काही देशांत बाईकसाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते. मग पुन्हा त्या कागदपत्रांची जमवाजमव. ही संपूर्ण प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आणि थकवणारी नक्कीच असते, पण आपण आपल्या स्वप्नांच्या मागे असं हात धुवून लागायचं की, सर्वच आवाक्यात आले पाहिजे, असे योगेश सांगतो.


 ‘बॉर्डर क्रॉसिंग’ची सर्व ठिकाणे त्या त्या ‘व्हिसा’मध्ये दाखवावी लागतात. त्याचा इत्यंभूत अभ्यास आपल्याला आधीच करावा लागतो. त्याचबरोबर बदलतं हवामान, त्याला तोंड देण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता कमावणे, आरोग्य सांभाळणे, ऊन-वारा-पाऊस-थंडी अंगावर झेलत प्रवास सतत सुरू ठेवण्यासाठी शारीरिक क्षमता (फिटनेस) आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवणे, हे देखील मोठे कष्टाचे आहेच. त्याचबरोबर करन्सी, डाव्या-उजव्या बाजूचे ड्रायव्हिंग, त्या-त्या देशाचे वाहतूक नियम, बदलत जाणारे ‘टाईम झोन’ इ. विषयांवर सखोल अभ्यास आणि अद्ययावत माहिती संकलन अतिशय महत्त्वाचे असल्याचे योगेश अधोरेखित करतो.या संपूर्ण प्रवासात योगेशचे वास्तव्य वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे. एकटाच असल्याने सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाचा मुद्दा आहे. जवळपास १०० दिवसांच्या मुक्कामात ३०-४० दिवसांचा मुक्काम सोबत नेलेल्या ‘टेंट’मध्ये करण्याचे त्याने ठरवले आहे. इराण, तुर्की या देशात ‘कॅम्पिंग’ सुरक्षित नसल्याने तिथे हॉटेल किंवा हॉस्टेल्समध्ये राहण्याची त्याची प्राथमिकता असेल. पुढे महागड्या युरोपियन देशात सोबत नेलेल्या ’कॅम्पिंग’ सेटअपवर या प्रवासवेड्याची भिस्त राहील.

योगेश हा पहिल्यापासूनच एक पर्यावरणवादी राहिला असल्याने त्यासोबत बोलताना असे समजले की, तो एक पर्यावरणाचा संदेश घेऊन हा सर्व प्रवास करणार आहे. त्यासाठी त्याने ‘राईड फॉर लाईफ’ असे या ’राईड’चे नामकरण ही केलेले आहे.'LiFE' म्हणजे 'Lifestyle for environment.' पर्यावरण पूरक जीवनशैली.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जागतिक वातावरणीय बदला’वर मार्ग काढण्यासाठी मागच्या वर्षी 'LiFE' या नावाने एक पर्यावरणविषयी चळवळ सुरू केली आहे. 'LiFE' या संकल्पनेने प्रेरित होऊन योगेशने हाच संदेश देत जगभर प्रवास करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. तसेच या संपूर्ण प्रवासात योगेश स्वतः कोणतेही प्लास्टिक बॉटल्स न वापरता किंवा रोजच्या रुटीनमध्ये कोणताही पर्यावरणास हानिकारक कचरा न करता ‘झिरो वेस्ट ट्रॅव्हेल’चे एक उदाहरण देण्यासाठी तो प्रयत्नशील राहील. अशा या ’हार्डकोअर बाईक रायडर’ला दै.‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!

योगेश आलेकरीच्या या भन्नाट प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला तुम्ही फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर ‘फॉलो’ करू शकता. वर नमूद केलेल्या प्रवासमार्गात जर कोणी वास्तव्यास असेल किंवा कोणाचे मित्र असतील, तर yogeshalekari@gmail.com ईमेल आयडीवर किंवा ९७०२५२५४३५ या क्रमांकावर योगेशशी संपर्क साधू शकता.



Powered By Sangraha 9.0