ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये; राऊत

28 Mar 2023 11:56:10
 
sanjay raut on shinde
 
 
मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. "ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये." असे ते म्हणाले.
 
शिंदे-फडणवीस सरकारने 'सावरकर गौरव यात्रा' काढण्याचे जाहीर केले. यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "'सावरकर गौरव यात्रा' आहे की 'अदानी बचाव यात्रा' आहे. वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीच संबंध नाही. उलट सावरकरांना संघ परिवाराने कायम वाळीत टाकलं. काल मुख्यमंत्र्यांनी सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. त्यावेळी सावरकरांविषयी त्यांना दोन शब्द नीट बोलता आले नाही. लिहून दिलेलं सर्व ते वाचत होते. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना वाचू का? असं विचारलं. हीच गुलामी आहे. त्यामुळे ही सावरकर गौरव यात्रा नसून अदानी बचाव यात्रा आहे." असं राऊत म्हणाले.
 
"सावरकर गौरव यात्रा काढून शिंदे-फडणवीस सरकार राजकीय ढोंग करत आहेत. सावरकर क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय. मुख्यमंत्र्यांनी सांगावं सावरकर यांचा जन्म कुठं झाला?" असा सवाल यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला. सावरकर यांचा मुद्दा उपस्थित करुन त्यांना अदानी यांच्या विषयावरुन लक्ष दुसरीकडे भरकटवायचे आहे. म्हणूनच त्यांना एक प्रकारची अदानी गौरव यात्राच काढायची असल्याचे संजय राऊत म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0