चिनी उद्योजकांचे ‘चलो सिंगापूर’

28 Mar 2023 19:52:57

China-Singapore
China

भारताचा शेजारी देश असलेल्या चीनची कोरोनानंतरही आर्थिक स्थिती सुधारलेली नाहीच. त्यामागचे एक कारण म्हणजे चिनी उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींनी या देशातून बाहेर पडण्याचा लावलेला धडाका. कारण, जिनपिंग यांचे सरकार चीनमधील उद्योगपती आणि श्रीमंतांवर सातत्याने आपल्या वर्चस्वाचा फास अधिकाधिक घट्ट करू पाहत आहे. हे सरकारी संकट टाळण्यासाठीच चीनमधील श्रीमंत उद्योजक सिंगापूरकडे धाव घेताना दिसतात. चीनमधील अनेक बड्या उद्योगपतींनी तर अलीकडेच आपली मालमत्ता सिंगापूरच्या बँकांमध्ये हस्तांतरित केली. हा सर्व प्रकार समोर आला तो बाओ फॅनमुळे.

चीनमधून नुकतेच गायब झालेले मोठे उद्योगपती बाओ फॅन यांनी सिंगापूरमध्ये आपली संपत्ती व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, तत्पूर्वीच ते बेपत्ता झाले. ‘चायना रेनेसान्स’चे संस्थापक असलेल्या बाओ फॅन यांनी सिंगापूरमध्ये खासगी संपत्ती व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्याचा विचार केला होता. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच ते बेपत्ता झाले. खासगी क्षेत्रांवर चीनमध्ये होणारी कारवाई आणि भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी आपली संपत्ती सुरक्षित ठिकाणी हलवणार्‍या श्रीमंत चिनी व्यावसायिकांमध्ये बाओ यांचाही समावेश होता.’आशियाचे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे सिंगापूर हे व्यवसायाच्या दृष्टीने जगातील सर्वोत्तम ठिकाण. मात्र, चिनी व्यावसायिक केवळ यामुळे सिंगापूरमध्ये व्यवसाय करत नाहीत.

खरंतर, २०२१ मध्ये शी जिनपिंग यांच्या सरकारने चीनच्या आर्थिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात चौकशी सुरू केली. आतापर्यंत देशातील बड्या कंपन्या या तपासाच्या कचाट्यातही सापडल्या. त्यातच टीकाकारांच्या मते, शी जिनपिंग हे त्यांच्या विरोधकांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी धोरणे वापरतात. म्हणूनच चिनी सरकारची आपल्या संपत्तीवरील वक्रदृष्टी टाळण्यासाठी तेथील उद्योगपती सिंगापूरमध्ये स्थलांतरित होत आहेत. चीनमधून साधारण ६०० श्रीमंत उद्योगपतींनी आतापर्यंत आपल्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये मालमत्ता हस्तांतरित केल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत चीन आणि हाँगकाँगमधून बरीच संपत्ती सिंगापूरमध्ये हस्तांतरित झाली. तब्बल २४ लाख कोटी रुपयांची मालमत्ता गेल्या सहा वर्षांत इतर देशांमधून सिंगापूरमध्ये हस्तांतरित झाली.

यापैकी बहुतेक उद्योगपतींचे आपली संपत्ती सिंगापूरला हस्तांतरित करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे जिनपिंग सरकारची भीती. तसेच चीनच्या व्यावसायिक कंपन्यांनी सिंगापूरमध्ये नोंदणी करण्यामागील सर्वात मोठे कारण हे चीनच्या गैरवर्तवणुकीमुळे इतर देशांशी बिघडलेले संबंध होय. (जिथे चिनी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे). त्यामुळे या चिनी लोकांपुढे सिंगापूर हाच एकमेव पर्याय होता. मात्र, या चिनी लोकांमुळे सिंगापूरच्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, सिंगापूरमध्ये चीनच्या संपत्तीत झालेली ही वाढ तेथील मूळ लोकांसाठी समस्या निर्माण करू शकते. कारण, चीन आणि इतर देशांतील लोकं सिंगापूरमध्ये स्थलांतरित झाल्याने तेथे महागाई आणि घरभाडेसुद्धा वाढले आहे. याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. सिंगापूरमध्ये चिनी लोकांचे आगमन १९व्या शतकात सुरू झाले असले तरी संपत्तीच्या सुरक्षिततेसाठी होत असलेले हस्तांतरण चीन खपवून घेणार नाही, अशी भीती या चिनी लोकांना आहे. त्यामुळे या एकमेव कारणाने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनमधील विविध खासगी क्षेत्रांना स्पर्श करणार्‍याच भ्रष्टाचारविरोधी आणि नियामक ‘क्रॅकडाऊन’मुळे येथील अनेक श्रीमंत लोक त्यांचे पैसे चीनमधून बाहेर काढू पाहत आहेत. चिनी गुंतवणूकदार परदेशात चांगल्या संधी शोधत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे, तर चीन हा गुंतवणुकीसाठी कमी आकर्षक देश बनत चालला आहे. सिंगापूरमधील संपत्ती व्यवस्थापन कार्यालयांची संख्या २०२२ मध्ये ७०० कार्यालयांवरून १५०० पर्यंत दुप्पट झाली आहे, त्यापैकी जवळपास निम्मी चीनची आहेत. परंतु, चीनमधून सिंगापूरमध्ये मालमत्तेचा आणि लोकांचा ओघ दीर्घकाळ टिकणार नाही. कारण, हस्तांतरण सुरू राहिल्यास चिनी अधिकारी त्यांचा भांडवल नियंत्रण कायदा आणखी कडक करण्याचा प्रयत्न करू शकतात. सिंगापूरमध्ये चिनी लोकांचे होणारे स्थलांतर हेही दर्शविते की, श्रीमंत चिनी लोक केवळ त्यांच्या मालमत्तेचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचेही एकप्रकारे रक्षण करत आहेत!




Powered By Sangraha 9.0