जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अभिनेता, दिग्दर्शक असणारे कलाकार अभिजित झुंजारराव यांचा आणि त्याच्या ’अभिनय कल्याण’ या संस्थेचा प्रवास मांडणारा लेख...
अभिजित जयवंत झुंजारराव यांचा जन्म कल्याण येथे झाला. त्यांचे मूळ गाव नेवाळपाड, मुरबाड. झुंजाररावांचे वडील ’महावितरण’मध्ये होते. त्यांनाही नाटकाची आवड असल्याने ‘महावितरण’मार्फत होणार्या नाट्यस्पर्धांमध्ये ते सहभागी होत. झुंजाररावांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कॅप्टन रवींद्र ओक हायस्कूल येथून केले. त्यानंतर बिर्ला महाविद्यालयातून त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तसेच के. एम. अग्रवाल महाविद्यालयातून ते ’बी.कॉम’ झाले. त्यानंतर ’कॉम्युटर हार्डवेअर नेटवर्किंग’चा ‘डिप्लोमा’ आणि ’नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ तसेच ‘नेहरु सेंटर’द्वारे आयोजित नाट्यदिशा ’ड्रामाट्रिक्स आर्ट्स’ या विषयात त्यांनी डिप्लोमा केला. झुंजाररावांना लहानपणापासून नाटकाची आवड नव्हती. परंतु, ते जेथे राहतात त्या सदनिकेत महाराष्ट्र दिनी नाटुकली त्यांनी सादर केली आणि तेव्हाच आपणही रंगमंचावर निर्भीडपणे उभे राहू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासूनच आजपर्यंत रंगभूमीशी झुंजाररावांची नाळ जोडली गेली. त्यानंतर झुंजाररावांनी आपल्या वडिलांसारखेच कला क्षेत्रात काम करायचे ठरवून जेव्हा ’ड्रामाट्रिक्स आर्ट्स’ या विषयात शिक्षण घ्यायला सुरूवात केली तेव्हा जयदेव हट्टंगडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे झुंजारराव सांगतात. त्यावेळी नाट्यदिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ’शापित गंधर्व’ हे दोन अंकी नाटक झुंजाररावांनी केले. त्यावेळी ते प्रशासक म्हणून एका कंपनीत कामदेखील करत होते.
कल्याण परिसरात राहणार्या काही नाटकवेडापायी झपाटलेल्या मित्रांना घेऊन झुंजाररावांनी ’अभिनय, कल्याण’ या संस्थेची स्थापना २००० साली केली. त्यातुनच त्यांच्यातील कलाकार जन्माला आला. ’अभिनय कल्याण’ ही संस्था प्रायोगिक नाटक, समांतर नाटक, विविध स्पर्धांमधील नाटकांत नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी काम करते. आज कल्याणसारख्या ठिकाणी गेली २३ वर्षे सातत्याने ही संस्था नाट्यक्षेत्रात काम करत असल्याने अनेक प्रामाणिक असे नवोदित आणि उत्तम कलाकार या संस्थेने रंगभूमीला दिले आहेत. सुरुवातीपासूनच संस्था चालवताना झुंजाररावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. वेळप्रसंगी सदनिकेच्या गच्चीवर जाऊन नाटकांची तालीम त्यांनी केली. त्यावेळी ’मी मराठी’ या वहिनीसाठी ही झुंजाररावांनी काम केले. तिथे कला क्षेत्राशी संबधित बर्याच गोष्टी त्यांना शिकता आल्या. त्यानंतर २०१३ साली त्यांनी काम सोडले आणि पुर्णवेळ नाट्यक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. मग त्याचवेळी संस्थेला हक्कांचा दिग्दर्शक हवा होता म्हणून झुंजाररावांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि मग अभिनयाबरोबर ते दिग्दर्शनाकडे ही वळाले.
’हे राम’ ही झुंजाररावांनी दिग्दर्शित केलेली पहिली एकांकिका. त्यानंतर ’दर्दपोरा’, ’फिल्ड ट्रायल’, ’तदैव लग्नम्’ , ’वेडिंग अॅनिव्हर्सरी’, ’ वेदना सातारकर हजर सर’, ’जीर्णोद्धार’ आणि यासारख्या अनेक एकांकिका संस्थेच्या माध्यामातून झुंजाररावांनी दिग्दर्शित केल्या. तसेच ‘स्ट्रॉबेरी’, ’माकड’ ही व्यावसायिक नाटक आणि ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘बॅलेन्स शीट’, ‘वारकरी’, ‘ए आपण चहा घ्यायचा?’, ‘लेझीम खेळणारी पोरं’, ‘साम्राज्यम्’, ‘कृष्णविवर’, ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला?’, ‘आयडी’, यांसारखी प्रायोगिक नाटके अशी जवळपास ४० पूर्णलांबीची नाटके संस्थेच्या माध्यमातून झुंजाररावांनी केली आहेत. महाराष्ट्र शासनाचे नाट्य विभागातील वेगवेगळे पुरस्कारही संस्थेला मिळाले आहेत.
आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बंगाल, केरळ या ठिकाणी हजारांवर नाटकाचे प्रयोग अभिनय, कल्याण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. ‘एनसीपीए’,‘ भारत भवन’, ‘एनएसडी’, ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’, येथील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात ही संस्थेने निर्मिती केलेल्या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. आजही संस्था कोणाकडून ही ‘स्पॉन्सरशिप’ घेत नाही. उलट गावोगावी जाऊन नाटक करत त्यातून मिळणार्या पैश्यातूनच नाटकांचा पुढचा खेळ संस्थेच्या माध्यमातून मांडला जातो. त्यामुळे कल्याणसारख्या ठिकाणी ‘अभिनय कल्याण’ नाट्य क्षेत्रात भरिव योगदान देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
झुंजारराव यांनी ‘दशक्रिया’ या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले आहे. ‘पोस्टर गर्ल’, ‘पोस्टर बॉय’, ‘ट्रिपल सीट’, ‘नयना’, ‘ठाकरे’ या चित्रपटांसह ‘एक थी बेगम’, ‘रान बाजार’ या वेबसीरिज मध्येही झुंजाररावांनी अभिनय केला आहे. झुंजाररावांना नाट्यपरिषदेचा सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ‘शंकर घाणेकर पुरस्कार’, ‘भारतीय विद्या भवन’चा ‘सत्यदेव दुबे पुरस्कार’, ‘झी गौरव’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचा रंग प्रयोग पुरस्कार, आणि वेध यासारखे अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
आज संस्थेच्या माध्यामातून ललित कला केंद्रांचा सहा महिन्यांचा अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालवला जात आहे. तसेच कल्याण येथे राहुल शिरसाट रंगमंच ही झुंजाररावांच्या कल्पनेतून उभा राहिला आहे. तिथे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील संस्थांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काची जागा ‘अभिनय कल्याण’च्या माध्यमातून देण्याचा संस्थेचा आणि झुंजाररावांचा मानस आहे. अशी झंझावती कारकीर्द असलेल्या झुंजाररावांना त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!