अयोध्येतील राम मंदिर उभारणीत चंद्रपूरचे काष्ठ

येत्या बुधवारी शोभायात्रेसह पहिली खेप होणार रवाना

    26-Mar-2023
Total Views |
Best-wood-from-Chandrapur-in-Sri-Ram-temple-in-Ayodhya

मुंबई : कोट्यवधी रामभक्तांची श्रध्दा असलेल्या अयोध्येत श्रीराम मंदिराचे काम युध्दपातळीवर सुरू असून भव्यदिव्य स्वरुपातील राम मंदिर उभारणीत चंद्रपुरचेही योगदान असणार आहे. मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेले मौल्यवान काष्ठ चंद्रपूर येथून रवाना होणार आहे.राम मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानातील खास दगडांचा वापर करण्यात आला असून, मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान देखील असणार आहे. मंदिरासाठी लागणारे १८०० क्यूबिक मीटर लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. २९ मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. या सागवान काष्ठाचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू डौलात उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज असून त्यासाठी चंद्रपूर येथून हे लाकूड पाठवण्यात येत आहे.
 
असा असेल काष्ठपूजन सोहळा

चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा दोन भागात होणार असून २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी ३.३० वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं.४ वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष असून या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल. ही शोभायात्रा सायं .६ वा. संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ ९ पर्यंत चालेल.सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व खासदारांना आणि आमदारांना तसेच पक्ष पदाधिकार्‍यांना या भव्य काष्ठपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री आणि खासदार व आमदार यांनाही या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले आहे.

शोभायात्रेला लोककलांचा साज

 
शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण ४३ प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्यात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून ११०० असे एकूण २१०० कलाकार हे सादरीकरण करणार आहेत.
 
चित्ररथासह गायनाचा विशेष कार्यक्रम

शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा नारीशक्ती - साडतीन शक्तीपिठे हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहेत. काष्ठ वाहून नेणार्‍या रथाच्या भोवती कलकारांचे रिंगण राहिल. हा चित्ररथ श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर ही शोभायात्रा चांदा चौकात संपन्न होईल. शोभायात्रेनंतर रात्री १० ते १२ या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात श्रीरामभक्तीची विविध गीते सादर करण्यात येतील.
 
रामायणातील कलावंतांचाही सहभाग

काष्ठ पूजन सोहळा आणि शोभायात्रेत दूरदर्शनच्या रामायण मालिकेतील कलाकार अरूण गोवील, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेकरिता योगगुरू स्वामी रामदेव बाबा तसेच सद्गुरू श्री जग्गी वासुदेव आणि श्रीश्री रवीशंकर यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.