अनेक जण सहजीवनाची व्याख्या ही एकाच घरात गोडीगुलाबीने एकत्र नांदणे, एकमेकांना समजून घेऊन साहाय्य करणे, आधार देणे अशीच करतील. कुटुंबापुरतीच आपल्या सहजीवनाची व्याख्या सिमीत राहते. पण, निसर्गामध्ये माणसाशिवाय असंख्य सजीव घटक आहेत. अगदी किडे-मुंग्यांपासून पक्षी, प्राणी आणि वनस्पतींपर्यंत या सगळ्यांचं एकत्रपणे जगणं, एकमेकांना पूरक राहून जगणं हे निसर्गात प्रत्यक्ष पाहायला मिळतं. त्यामुळे माणसांशिवाय जेवढे सजीव घटक आहेत, ते आपल्यापेक्षा खूप व्यापक अर्थाने सहजीवन जगत असतात. या नैसर्गिक सहजीवनाचा माणूस म्हणून आपणही भाग आहोत, हे माणसाला स्वार्थापायी कधी समजलंच नाही. त्यांनी निसर्गातल्या अनेक घटकांचा आपल्या सोयीसाठी वापर केला. या प्रवृत्तीला बदलण्यासाठी काही चांगली उदाहरणं निर्माण केली पाहिजेत, असे बाबांना नेहमी वाटत असे.
प्राण्यांचे पालन हेही नैसर्गिक साखळी कायम राखत एकमेकांना पूरक होण्यासाठी केले पाहिजे. गाईचे पालन हे सेवाभाव जोपासण्यासाठी तिच्या शेणाचा उपयोग नैसर्गिक शेतीसाठी, दुधाचा उपयोग जास्तीत जास्त तिच्या बछड्यांसाठी झाला पाहिजे, हे त्यांनी स्वतः छोटी गोशाळा उभारून आदर्श उदाहरण उभं केले. जास्तीचे निघालेले दूध विक्रीचा उद्देश न ठेवता जेवढे वाटता येईल तेवढे वाटत राहिले. गांडूळ खताकरिता अनेक जण गांडूळ आणतात. अशा गांडूळांना पण प्रेमाने जपताना मी बाबांना पाहिलंय. मत्स्यपालनाचा प्रयोगही त्यांनी ‘बॅक्टेरिया’ युक्त पाण्यासाठी केला. प्रत्येक वेळी त्यांनी या सर्व घटकांचा आपापसात कसा फायदा होईल किंवा नैसर्गिकरित्या या घटकांची साखळी कशी टिकून राहील, याचाच विचार करत ते अनेक प्रयोग करत राहिले; हीच त्यांच्या सहजीवनाची व्यापक व्याख्या होती.
मधमाश्यांनी एकत्र येऊन पोळं बनवणं, मुंग्यांनी एकत्र येऊन वारूळ बनवणं, वाघाला पुरे पडण्यासाठी कुत्र्यांचे झुंडीत राहाणे, असे प्राणी-पक्ष्यांचे कळपातल्या सहजीवनाच्या शक्तीचे आणि एकीचे महत्त्व दर्शवणारी असंख्य उदाहरणे त्यांच्याकडे असायची, निसर्ग कधी साठेबाजी शिकवत नाही, माणूस सोडला तर कुठलाही घटक साठेबाजी करत नाही. कारण, साठेबाजी तुम्हाला स्वार्थी बनवते, मग तिथे सहजीवन निर्माण तरी कसे होईल, त्यामुळे निसर्गाची व्यापक जीवनशैली काय आहे ती समोर ठेवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत राहिले.
॥ एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि॥ त्यांचे त्यांस न देता जो खाय तो ऐक चोर चि॥ रांधिती अपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती॥
हा ‘गिताई’तला विचार त्यांनी नेहमी जोपासला, वाढवला आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
-रश्मी वाडेकर- भातखळकर