परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द, नवनवीन कल्पनांचा अंगिकार करण्याची वृत्ती आणि व्यवसायात उतरुन तो यशस्वी करण्याचे धाडस व कला या बाबी एकत्र आल्या म्हणजे उद्योजकतेचा पाया घातला जातो. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात यश मिळवून हे सिद्ध केलंय…!
मनीषा यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. घरच्या शेती व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण यासाठी त्यांची खूप ओढाताण होत असे. तीन मुले असल्याने त्यांच्या शिक्षणासाठीच्या खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण होते. काहीतरी व्यवसाय करुन कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांचा विचार पाहून मावसबहिणीने डंका घेऊन मसाले कुटून देण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २०१९ मध्ये एक लहान मसाला यंत्र घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहकांचे मसाले कुटून देण्याचे काम केले.
ग्राहकांची गरज लक्षात घेऊन मनिषा यांनी पती संतोष कामथे यांच्या मदतीने बाजारातून चांगल्या प्रकारची मसाल्याची साधनसामुग्री आणून विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. मग व्यवसायाला आणखी जोड म्हणून शेवई यंत्र खरेदी करुन शेवई तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. मसाले, शेवई तयार करुन देत असतानाच स्वत:ही हे पदार्थ तयार करुन विक्रीदेखील सुरू केली. एक वेगळी आणि अस्सल चव राखल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला.