संस्कारांची गुढी उभारूया!

    22-Mar-2023
Total Views |
Sanskar Gudi

आपल्या प्राचीन आदर्श संस्कारांची गुढी प्रत्येकाने आपल्या घरी, दारी व समाजात मोठ्या प्रमाणात उभारावी. कारण, याच 16 संस्कारांच्या माध्यमाने व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व विश्वाची नवनिर्मिती होणार आहे. संस्कारच नसतील, तर आपले जीवन हे सर्व काही मिळूनदेखील शून्य ठरणारे आहे. यासाठीच 16 संस्काररुपी प्रखर नंदादीपाच्या प्रकाशाने आपण आपले व इतरांचे अंतर्बाह्य जीवन उजळूया.

 
असंमृष्टो जायसे मात्रो:
शुचिर्मन्द्र: कवरुदतिष्ठो विवस्वत:।
घृतेन त्वावर्धयन्नग्न आहुत,
धूमस्ते केतुरभवद् दिवि श्रित:॥
(ऋग्वेद-5.11.3)
 
अन्वयार्थ


(आ+हुत अग्ने!) तू (मात्रो:) तू द्यौ आणि पृथ्वी या उभय मातांच्या मध्ये (अ सम् भ्रष्ट:) अशुद्ध रुपाने (जायसे) जन्मला आहेस. पण, आई, वडील आणि इतर परिजन हे (त्वा) तुला (घृतेन) तूप इत्यादी पदार्थांनी (अवर्धयन्) वाढवित असतात. तसेच तू (विवस्वतः) सूर्य, ज्ञानी मंडळी आणि आचार्यांच्याद्वारे (शुचि:) शुद्ध, पवित्र (मन्द्र:) आनंदी, (कवि:) बुद्धिमान, मेधावी (उत् अतिष्ठ:) प्रगतिशील होत असतोस. (ते) तुझा (दिवि श्रित:) द्युलोकात, बुद्धीमध्ये विद्यमान असलेला (धूम:) धूर हा नेहमी (केतु:) प्र+ज्ञानाच्या रुपाने, (अभवत्) वृद्धिंगत होत असतो.

विवेचन

 
या मंत्रात मानवाच्या संस्कारासाठी पूरक माहिती विशद करण्यात आली आहे. अग्निहोत्र करताना होमकुंडातील ज्या अग्नीत समिधा, सामग्री, तूप वगैरे सुगंधित द्रव्यांच्या आहुती दिल्या जातात, त्याला ‘आहुत अग्नी’ असे म्हणतात. ‘आहुत अग्नी’मध्ये जर शुद्ध व सुगंधित पदार्थांच्या आहुती दिल्या गेल्या, तर त्याचा दरवळ परिसरातील सर्व भागात पसरतो. पण, जर काय अशुद्ध व दुर्गंधयुक्त आहुत्या दिल्या गेल्या, तर सारे वातावरण प्रदूषित होते. असेच मानवी जीवनाचेदेखील आहे.माणसाची सुरुवात ही आईच्या उदरातून होते. गर्भस्थ शिशु हादेखील ’आहुत अग्नी’ आहे. मातेच्या प्रत्येक अंगा-अंगातून आहुती दिली जाते. आईचे खानपान, आचारविचार व व्यवहार यांच्यापासून गर्भस्थ बालक संस्कारशील होतो. तशीच तो आकृतीदेखील धारण करतो. म्हणजेच आई ही निर्मितीचे केंद्र आहे. गर्भात असताना ज्याप्रमाणे बाळासाठी आईकडून आहारविहाराच्या व मानसिकतेच्या आहुती प्रदान केल्या जातात, तशीच बाळाची निर्मिती होत असते.
 
 
वेदमंत्र म्हणतो, जीव हा द्युलोक आणि भूलोक या दोन मातांच्या मध्ये मानवरूपाने जन्माला तर येतो, पण अशुद्ध शरीर घेऊन! त्याच्या अंतःकरणामध्ये अज्ञानरूपी धूर साचलेला असतो, त्याचे बाह्य शरीर हे अस्वच्छ असते. दाई किंवा इतर स्त्रिया या बाळाला धुवून, पुसून स्वच्छ करतात. पण, त्याच्या अंतर्मनांच्या धुराला नाहीसे करण्याचे सामर्थ त्यांच्याकडे नसते. म्हणूनच आता यापुढे जन्मास आलेल्या त्या बाळाच्या जीवनाची संस्कार व ज्ञानसाधना सुरू होते. हे संस्कार व ज्ञान देण्याची जबाबदारी आई-वडील व कुटुंबातील इतरांची असते. घर हे मुलासाठी पहिली शाळा. नंतर बाळ जेव्हा या जगास बघू लागतो, तेव्हा त्यासाठी आचार्य किंवा इतर शिक्षक, तसेच परिसरातील ज्ञानी लोक हे त्या बाळाच्या बाह्य पर्यावरणाचे कारण ठरतात. या सार्‍या विश्वाला पाहून त्या छोट्याशा बाळांमध्ये शुद्ध चारित्र्याचे, सद्व्यवहाराचे, मानवतेचे, पवित्रतेचे संस्कार रुजू लागतात. जसा परिसर तसे त्या मुलाचे जीवन. याचाच अर्थ चांगला मानव घडण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत.

संस्कार महात्म्य


मानवाच्या निर्मितीचे मूलभूत आधार म्हणजे संस्कार होय. पण, हे संस्कार आजच्या युगात पूर्णपणे दुर्लक्षिले जात आहेत. सध्याच्या धावत्या भोगवादी वातावरणात संस्कारासारख्या पवित्र संपदेची धूळधाण होताना पाहून प्रखर सत्यनिष्ठा व सामाजिकता अंगी बाळगणारी असंख्य सहृदयी मने खिन्न होत आहेत. यासाठीच लुप्त होत चाललेले संस्कारांचे शुद्ध स्वरूप, महत्त्व आणि त्यांची गरज ओळखून त्यांचा अंगीकार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण, व्यक्ती, समाज, राष्ट्र व समग्र विश्वाची प्रगती ही संस्कारातच दडली आहे. विकास किंवा प्रगती साधणे म्हणजे म्हणजे तरी नेमके काय? अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या म्हणजे विकास साधला, असे मुळीच म्हणता येणार नाही. दुर्दैवाने आज मात्र चहूकडे सुसंस्कारांना बाजूला ठेवून केवळ भौतिक विकासाच्या गोष्टी होत आहेत. तळे व बंधारे बांधणे, रस्ते बनविणे, रेल्वेमार्ग उभे करणे, नवनवीन कारखाने सुरू करणे, भव्य इमारती उभ्या करणे, उद्योग व व्यवसाय इत्यादींच्या निर्मितीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे किंवा त्यासाठी विविध योजना व प्रकल्प राबविणे इत्यादी गोष्टी झाल्या म्हणजे विकास झाला काय?



जगण्यासाठी हे आवश्यक असले जरी असले, तरी सुखसुविधा उपभोगत जगणारा माणूस जर काय संस्कारविहीन, विवेकभ्रष्ट किंवा अनैतिक बनून स्वैर वागू लागला, तर या सर्व अफाट प्रगतीचे अधोगतीत रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आदर्श माणूस घडला पाहिजे. संस्कारशील असा सुयोग्य मानव बनला, तर या सर्व भौतिक साधनांचा तो सदुपयोग करेल. याच साधनांच्या माध्यमाने हा भौतिक प्रगती बरोबरच आध्यात्मिक प्रगतीदेखील साधू शकेल. आपल्या जीवनाचे मोक्षरूप लक्ष प्राप्त करण्यात तो यशस्वी ठरेल. म्हणूनच तर प्राचीन ऋषिमुनींनी 16 संस्कारांची संकल्पना मांडली आहे. विशेष म्हणजे, या संस्कारांच्या मूलभूत खुणा वेदांमध्ये दडलेल्या दिसून येतात. वेदप्रमाणित षोडशसंस्कारांच्या प्रचार व प्रसारानेच समग्र विश्वातील मानवाची नवनिर्मिती होऊन सर्वत्र सुखसंपदा नांदू शकेल.


प्रस्तुत मंत्रात म्हटले आहे- माणूस जन्माला येण्याच्या अगोदर तो शिशुरूपात जेव्हा आईच्या उदरात असतो, तेव्हा आईकडून सात्विक व शुद्ध असे सुयोग्य खानपान, पवित्र विचार, शुद्ध चिंतन आणि बौद्धिक ऊर्जा यांची आहुती पडावयास हवी. म्हणजेच आईच्या माध्यमाने बाळावरचे पहिले संस्कार. त्यानंतर शिशुजन्माला आल्यानंतर आईसह पिता व इतरांनीदेखील उत्तम प्रकारच्या आहुत्या द्याव्यात. मुखामध्ये शुद्ध व सात्त्विक अन्न पदार्थांची, कानांमध्ये सत्य व मधुर शब्दांची, डोळ्यांमध्ये सुंदर, पवित्र व निर्मळ दृश्यांची आहुती दिल्यास ते वाणी, कान, नेत्र व इतर इंद्रियांनी पवित्र होतील. त्यानंतर क्रमांक येतो तो आचार्यांचा. त्यांसाठी शब्द आला आहे विवस्वान्. म्हणजेच वि (विविध) + वसु (ज्ञान धन)+ वान् (परिपूर्ण). सर्व प्रकारच्या ज्ञानधनांनी जे परिपूर्ण असतात, असे शिक्षक किंवा आचार्य, अशा सूर्यासमान तेजस्वी बुद्धी असलेल्या व सर्वदृष्टीने ज्ञानैश्वर्यशाली असलेल्या आचार्यांच्या प्रेमळ छायाछत्राखाली शिष्य राहिले, तर निश्चितच ते पवित्र आनंदी व बुद्धिमान बनतात.वरील आशयातून हे लक्षात येते की, मानवाची नवनिर्मिती करण्यासाठी अंतर्बाह्य म्हणजेच घर आणि घराबाहेरील वातावरणाचे संस्कार अतिशय मोलाचे ठरतात. यासाठीच वैदिक 16 संस्कारांचे प्रतिपादन करण्यात आले आहे.


‘सम्’ उपसर्गपूर्वक ‘कृ’ धातूपासून ‘संस्कार’ शब्द तयार होतो. ‘संस्क्रियते अनेन इति संस्कार:।’ म्हणजेच ज्या बाबींद्वारे व्यक्ती अथवा वस्तू शुद्ध, स्वच्छ, पवित्र व सुंदर होते, त्यास ‘संस्कार’ असे म्हणतात. आयुर्वेदाचे आचार्य महर्षी चरक म्हणतात, ‘संस्कारो हि गुणान्तराधानम् उच्यते।’ म्हणजेच पूर्वी असलेल्या वाईट, अनावश्यक अथवा अनिष्ट दोषांचा किंवा दुर्गुणांचा त्याग करून त्या जागी उत्तम गुण, कर्म व संस्कार धारण करणे, ही प्रक्रिया म्हणजेच संस्कार होय. यादृष्टीने आपल्या वैदिक संस्कृतीत मानवाच्या सर्वांगीण विकासाकरिता 16 संस्कारांचे विधान केले गेले आहे. याचाच अर्थ असा की, मानवी जीवनाला 16 वेळा बदलण्यासाठी व त्याच्या नवनिर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतात. एक सद्गुणसंपन्न असा आदर्श मानव घडण्यास व त्याद्वारे एक सभ्य समाज निर्मिण्यास या संस्कारांतून मदत मिळते. या 16 संस्कारांतील गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन व जातकर्म हे चार संस्कार बाळाच्या जन्मापूर्वीचे, तर नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ, संन्यास आणि अंतेष्टी हे 12 संस्कार जन्मानंतरचे असतात. आपल्या प्राचीन आदर्श संस्कारांची गुढी प्रत्येकाने आपल्या घरी, दारी व समाजात मोठ्या प्रमाणात उभारावी. कारण, याच 16 संस्कारांच्या माध्यमाने व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व विश्वाची नवनिर्मिती होणार आहे. संस्कारच नसतील, तर आपले जीवन हे सर्व काही मिळूनदेखील शून्य ठरणारे आहे. यासाठीच 16 संस्काररुपी प्रखर नंदादीपाच्या प्रकाशाने आपण आपले व इतरांचे अंतर्बाह्य जीवन उजळूया. आपल्या वैदिक 16 संस्कारांची वैभवशाली ज्ञानसंपदा मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी कितपत पूरक आहे, हे आगामी लेखांच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. प्रत्येक संस्काराचे महत्त्व व त्यांच्या विशुद्ध स्वरूपांचे प्रतिपादन आगामी लेखश्रृंखलेतून शब्दबद्ध होईल. संस्कारप्रिय वाचकवृंद आमच्या या प्रयत्नाचे स्वागत करतील, ही अपेक्षा...
 

 
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.