नवी दिल्ली : जगभरात आता ६जी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भारतानेही आता कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या शुभदिनी भारताचे ६जी व्हिजन जारी केले आहे. त्यामुळे आत स्वदेशी ६जी तंत्रज्ञानादवारे भारताचे या क्षेत्रातील स्थान महत्वाचे ठरणार आहे.
भारताच्या या नव्या यशाविषयी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’चे उपाध्यक्ष आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील तज्ज्ञ जीवन तळेगावकर यांच्याशी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ५जी तंत्रज्ञान वापरणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होते. सर्वांत महत्वाचे म्हणजे भारतातील काही कंपन्यांनी करोना काळात स्वतःचे ५जी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे ज्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केवळ युरोपीय आणि चिनी कंपन्यांची मक्तेदारी होती, त्यामध्ये प्रवेश करून स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. आतादेखील भारताने ६जी व्हिजन डॉक्युमेंट जारी करून आणि आयटीयु, ६जी टेस्टबेडची सुरूवात करून आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेश युनियनच्या भारतातील कार्यालयाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले आहे. याद्वारे ६जी तंत्रज्ञानात काय असावे, हे ठरविण्याचा अधिकार भारतीय कंपन्यांनी प्राप्त झाला आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखून त्याद्वारे भारताने आपले धोरण तयार केले आहे.
नव्याने विकसित होत असलेल्या ६जी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार असल्याचे तळेगावकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सॉफ्टवेअरनिर्मितीमध्ये भारत अग्रेसर आहेच. त्याचप्रमाणे हार्डवेअरनिर्मितीसाठी पीएलआयसारख्या योजनांची घोषणा करून केंद्र सरकारने सुयोग्य इकोसिस्टीम तयार केली आहे. याद्वारे ५जी आणि ६जी हार्डवेअरदेखील भारतातच तयार होणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षातच भारत हे तंत्रज्ञान जगभरातील विविध देशांना विकून शकणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर प्रभावी ठरणाऱ्या कंपन्यादेखील यामुळे भारतात तयार होणार आहेत.
६जीद्वारे या क्षेत्रात क्रांतीकारी बदल
१. रोबोटिक हेल्थकेअर
२. ऑनलाईन पोलिस सेवा
३. स्मार्ट इलेक्ट्रिक उपकरणे
४. स्मार्ट क्लास आणि डिजीटल शाळा
५. अॅग्युमेंटेडे आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी
६. ई – कॉमर्स
७. अतिउच्च दर्जाचे दळणवळण (कनेक्टिव्हिटी)
८. स्मार्ट कचरा व्यवस्थापन
९. सुरक्षित पीओएस सेवा
१०. स्वयंचलित सार्वजनिक वाहतूक
११. प्रगत कृषी तंत्रज्ञान
१२. डिजिटल पोस्ट ऑफिस