दोघांशी कसे लढणार?

02 Mar 2023 20:57:35
congress-convention

 संघ विचारधारेशी काँग्रेसला लढायचे आहे. प्रत्येक विषयाला काँग्रेसला पर्याय द्यावा लागेल. काँग्रेस शहाणी असेल, तर तिने या नसत्या भानगडीत पडू नये. राजकीय पक्ष म्हणून सत्तेची लढाई तिने लढावी. भाजपशी दोन हात करावेत. त्यामुळे शक्तिक्षय होणार नाही आणि कार्य एकलक्षी होईल.


काँग्रेस पक्षाचे महाअधिवेशन रायपूर येथे नुकतेच पार पडले. काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली होती. या यात्रेची समाप्ती झाल्यानंतर हे अधिवेशन झाले. मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवड झाली. गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष निवडला गेला. २०२४ ला सार्वत्रिक निवडणुका आहेत. राजपुत्र राहुल गांधी यांची पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. तिची पूर्तता होण्यासाठी अधिवेशनाची रचना करण्यात आली होती.या अधिवेशनातील काही ठळक विषय असे आहेत - सोनिया गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, “माझ्या कारकिर्दीची समाप्ती ‘भारत जोडो यात्रे’ने होणार आहे.” त्याचा राजकीय अर्थ असा केला गेला की, सोनिया गांधी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार आहेत, असे काही होणार नाही, असा खुलासा नंतर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला. या अधिवेशनाचे दुसरे वैशिष्ट्य राजकीय ठरावाचे आहे. या ठरावात एकूण ५८ मुद्दे असून विरोधकांच्या राजकीय एकजुटीचा जसा विषय आहे तसा आर्थिक परिस्थितीचा विषय आहे.

भाजपच्या उणिवा काढण्याचेही विषय आहेत. काँग्रेस कार्यसमितीची निवडणूक होणार होती. (काँग्रेस वर्किंग कमिटी) ही समिती पक्षातील सर्वांत महत्त्वाची समिती असते आणि ती पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय करते. निवडणूक झाली असती, तर गांधी परिवाराला आव्हान देणारे नेते निवडले गेले असते. ही गोष्ट गांधी परिवाराला चालणारी नसल्याने त्यांनी निवडणूक रद्द केली आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना कार्यकारिणीचे सभासद नेमण्याचे सर्वाधिकार देण्यात आले. गांधी परिवाराच्या सल्ल्याने मल्लिकार्जुन खर्गे या अधिकाराचा वापर करतील, हे वेगळे सांगायला नको.सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांचा भाजपवर आरोप असतो की, भाजपमुळे लोकशाही तुटत आलेली आहे. पक्षांतर्गत लोकशाही टिकविण्यासाठी कार्यकारी समितीच्या निवडणुका आवश्यक होत्या. त्या न घेता हुकूमशहाप्रमाणे कार्यकारिणीचे सभासद निवडण्याचा अधिकार मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आला. ही काँग्रेसची लोकशाहीची व्याख्या आहे.

पक्षाच्या सर्व स्तरावर अनुसूचित जातीजमाती, ओबीसी, अल्पसंख्य महिला आणि तरुण यांना ५० टक्के जागा राखीव ठेवाव्यात, असा पक्षाने निर्णय केला आहे. काही पत्रकारांनी याचे वर्णन ‘सामाजिक न्यायाचे कार्ड’ असा केला आहे. ही गोष्ट भाजपने २०१४ पासूनच करायला सुरुवात केली आणि त्याचे परिणामही चांगले झालेले आहेत. काँग्रेसला भाजपशी लढायचे आहे आणि लढण्याची घोषणा करता करता काँग्रेसने भाजपची नक्कल करायला सुरुवात केली. नक्कल कधी अस्सल होत नसते.उदयपूरला काँग्रेसचे चिंतन शिबीर झाले होते. त्यात एका व्यक्तीला पक्षात एकच जागा मिळेल, एका परिवाराला एकच तिकीट मिळेल, असे ठरविण्यात आले. या अधिवेशनात उदयपूरला जे ठरले त्याचा उल्लेखही झाला नाही आणि त्याची अंमलबजावणी कशी चालू आहे, हे देखील झाले नाही. पक्षात एका परिवाराला एक जागा याची अंमलबजावणी करायची म्हटली, तर पक्षात तीन गांधी कसे चालतील? आणि तीन गांधींशिवाय पक्ष चालू शकत नाही किंवा चालवू द्यायचा नाही, असा काही जणांचा निर्णय असल्यामुळे ठराव केवळ कागदावरच राहिलेला आहे.

 
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दलित आहेत, ही गोष्ट काँग्रेसचे नेते विसरत नाहीत. ‘द प्रिंट’च्या संकेतस्थळावर डी. के. सिंग यांचा लेख आहे. लेखाच्या सुरुवातीला त्यांनी दलित किस्सा दिलेला आहे. अधीररंजन चौधरी मल्लिकार्जुन खर्गे यांची स्तुती करताना म्हणाले, “काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सभासदांची नियुक्ती करण्याचे अधिकार त्यांना देण्यात काय चूक आहे? ते आता ८० वर्षांचे झाले आहेत आणि ते दलित आहेत.” वयाचा आणि दलिततत्त्वाचा काही संबंध आहे का? लेखक पुढे लिहितो, “चौधरी यांना हे माहीत नसावे की, नवीन अध्यक्ष आपल्या सदर्‍याच्या बाहीवर दलितत्त्वाचा बिल्ला लावून फिरत नाहीत.” “अरे क्या दलित दलित करता हैं? माझ्या दलितत्त्वामुळे मी सक्षम आहे, असे आहे का?” असे त्यावर खर्गे म्हणाले.या अधिवेशनात राहुल गांधी बोलायला उभे राहिल्यानंतर सावलीसारखे त्यांची पाठराखण करणारे वेणू गोपाल यांनी व्यासपीठावरील सर्वांना उभे राहायला सांगितले. राहुल गांधी यांच्या ४७ मिनिटांच्या भाषणात ‘मी, माझे, माझ्यासाठी...’ हे शब्द ११२वेळा येऊन गेले. ही माहितीदेखील डी. के. सिंग यांनी आपल्या लेखात दिली आहे.

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे या तिघांनीही आपल्या भाषणात भाजपवर तर तोंडसुख घेतलेच. पण, संघावरदेखील शरसंधान केले. आरोपात नावीन्य काहीच नव्हते. अल्पसंख्य, दलित, आदिवासी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यावर हल्ले होतात. संघ आणि भाजपची विचारधारा देश तोडणारी आहे. संविधान धोक्यात येत चालले आहे. देशातील सर्व लोकशाही संस्थांवर या विचारधारेच्या लोकांनी कब्जा मिळविला आहे, नागरी स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे हे सर्व आरोप आहेत. त्यात नावीन्य काहीच नाही. पंडित नेहरू हेच आरोप करीत राहिले. इंदिरा गांधी यांनी आपल्या वडिलांच कित्ता गिरविला, राजीव गांधी यांची कारकिर्द लहान असल्यामुळे हा कित्ता गिरविण्याची संधी त्यांना मिळाली नाही आणि राहुल गांधी प्रतीक्षा सूचित असल्यामुळे आणि बोलण्यासाठी अन्य काही विषय नसल्यामुळे तेच ते तेच ते बोलत राहातात. या अधिवेशनात एक घोषणा दिली गेली, ‘वे जब चल रहे थे बीजेपी, आरएसएसवाले जल रहे थे।’ काही जणांनी राहुल गांधींचा उल्लेख राहुल गांधी हे ‘त्याग-तपस्येची मूर्ती आहेत’ या शब्दात केला.


मल्लिकार्जुन खर्गे यांचा उल्लेख एकाने ‘या युगातील आंबेडकर’ असा केला. श्रोत्यांचे भाग्य थोर यावेळी महाभारत आणि रामायणातील थोर पुरुषांची लेबलं काँग्रेसच्या नेत्यांना लावली गेली नाहीत.अशा प्रकारे हे महाअधिवेशन उत्साहात पार पडले, असे म्हणावे लागते. जमलेल्या १५ हजार श्रोत्यांमध्ये किती उत्साह होता? उत्स्फूर्तपणे नारेबाजी कितीवेळा झाली? नेत्यांविषयी विश्वास प्रगट करणार्‍या घोषणा किती वेळा झाल्या? जे या अधिवेशनात होते त्यांची उत्तरे अशी आहेत की, एकूणच थंड प्रतिसाद होता. याचे कारण काय? याची कारणे खूप गंभीर आणि खोलवरची आहेत. काँग्रेसमध्ये बुद्धिमान लोकांची कमतरता नाही. सत्तेच्या राजकारणाचे ज्ञान असणारे काँग्रेसमध्ये कमी लोकं नाहीत, परंतु त्यांना मुक्त विचार करण्याची आणि तो धाडसाने मांडण्याची संधी काँग्रेसमध्ये नसते. भाजप किती लोकांचा आवाज बंद करतो, हा संशोधनाचा विषय आहे आणि काँग्रेसमध्ये किती लोकांचे आवाज बंद होतात, हा बघण्याचा विषय आहे.
 

शशी थरूर यांनी पक्षाच्या मूलभूत विचारधारेची आठवण सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस ही राष्ट्रीय होती. राष्ट्राचा विचार करणारी होती. त्यामुळे ती विचारधारा आताची काँग्रेस स्वीकारू शकत नाही. आताची विचारधारा गेलेली सत्ता कशी प्राप्त करून घ्यायची याची आहे. आताच्या कँाग्रेसला असे वाटते की, जर आपण सेक्युलर, समाजवादी नेत्यांना एकत्र केले, तर भाजपला आव्हान देता येऊ शकतं. हे दोन्ही शब्द आणि त्यातून व्यक्त होणार्‍या विचारधारा २०१४ साली जनतेने नाकारल्या. २०१९ साली पुन्हा नाकारल्या आणि २०२४ साली नाकारणार आहेत. समाजवाद म्हणजे नोकरशाही, भ्रष्टाचार आणि नोकरशहांची प्रचंड श्रीमंती. सेक्युलॅरिझम म्हणजे, हिंदूद्वेष, संस्कृतीद्वेष, सनातन मूल्य विद्वेष आणि ख्रिश्चन व मुलसमानांचे लांगूलचालन. लोकांना ते आता नको आहे.

 
काँग्रेसला भाजपशी लढायचे आहे. तसे संघाशीदेखील लढायचे आहे. भाजप हे वेगळे संघटन आहे आणि संघ हे वेगळे संघटन आहे. एकाच वेळी दोघांशी काँग्रेसवाले कसे लढणार? भाजपशी लढाई निवडणुकांच्या रणांगणात आहे आणि तिथे मोदींना पर्याय देईल, असा समर्थ चेहरा हवा. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, केसीआर अशा चेहर्‍यांची चर्चा चालू असते. संजय राऊत यांना वाईट वाटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांचे देखील नाव टाकायला हरकत नाही. प्रथम या सर्वांची एकजूट झाली पाहिजे. एक समान कार्यक्रम ठरविला पाहिजे आणि सर्वांना मान्य होईल, असा नेता निवडला पाहिजे. बेडकांचे वजन करण्यासारखा हा प्रकार आहे.

संघाशी लढण्याचे रणांगण निवडणुकांचे नाही. संघाशी वैचारिक लढा द्यावा लागेल. संघाच्या विचारधारेला पर्याय द्यावा लागेल. तेवढी प्रतिभा असणारा एकही प्रतिभावंत काँग्रेसमध्ये नाही. कावकाव करणारे भरपूर आहेत. त्याने काही होत नाही. संघाचा आजचा विचार हे एक सनातन राष्ट्र आहे. या राष्ट्राची एक संस्कृती आहे, ती सर्वसमावेशक आहे, सर्वग्रही आहे. या संस्कृतीला आपले मानणारे, परंपरा-मूल्य यांना स्वीकारणारे सर्व भारतीय आहेत. आपले संविधान राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सर्वांना बांधून ठेवणारे संविधान आहे. या संघ विचारधारेशी काँग्रेसला लढायचे आहे. प्रत्येक विषयाला काँग्रेसला पर्याय द्यावा लागेल. काँग्रेस शहाणी असेल, तर तिने या नसत्या भानगडीत पडू नये. राजकीय पक्ष म्हणून सत्तेची लढाई तिने लढावी, भाजपशी दोन हात करावेत. त्यामुळे शक्तिक्षय होणार नाही आणि कार्य एकलक्षी होईल. काँग्रेसच्या या प्रयत्नास आपण शुभेच्छा देऊया!







Powered By Sangraha 9.0