रशियाची परदेशी शब्दबंदी

02 Mar 2023 20:29:16
Putin

शब्दावाचुन कळले सारे
शब्दांच्या पलिकडले...


मंगेश पाडगावकरांचे बोल आणि जितेंद्री अभिषेकी यांचे संगीत लाभलेल्या या मंथरलेल्या ओळी... शब्दांच्या पलीकडची भावनांना वाट मोकळी करून देणारी भाषा ही तितकीच महत्त्वाची. त्यात आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अगदी जगातली कुठलीही भाषा सहज समजून घेणे हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. अशा या जागतिक खेड्यात त्यामुळे भाषेची सरमिसळही ओघाने आलीच. त्यामुळे शब्दांची विविध भाषांमध्ये देवाणघेवाण ही म्हणा अत्यंत सामान्य बाब.

जागतिक भाषा म्हणवल्या जाणार्‍या इंग्रजीतही कित्येक विदेशी भाषांचा समावेशही झालेला दिसतो. जसे की, ‘जंगल’, ‘पायजमा’, ‘चाट’, ‘बंगलो’, ‘ठग’, ‘लूट’ आणि असे बरेचसे हिंदी शब्द आज इंग्रजीत अगदी सर्रास वापरले जातात. इतके की, हे मूळचे हिंदी शब्द आहेत, याचाच मुळी विसर पडावा. तेव्हा, जागतिक पातळीवरही संस्कृतीप्रमाणे भाषांची, शब्दांचीही सरमिसळ ही एक निरंतर प्रक्रियाच म्हणावी लागेल. त्यातच तंत्रज्ञानाने जगाला जसे जवळ आणले, तसेच भाषांनाही एकाच धाग्यात गुंफले. म्हणूनच आज ‘गुगल ट्रान्सलेट’च्या माध्यमातून दोन विभिन्न देशांतील अनोळखी मंडळीही दोन वेगळ्या भाषांतून एकमेकांशी अगदी सहज संवाद साधू शकतात. एकीकडे भाषांची क्षितिजे अशी विस्तारताना, दुसरीकडे यामुळे मूळ भाषाच लोप पावेल, तिचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी एक ओरडही होताना दिसते. अशीच काहीशी आवई रशियातही उठवून पुतीन सरकारने एक निर्णय घेतला.
 
रशियातील सरकारी अधिकार्‍यांना इतर कुठल्याही भाषांमधील शब्दांचा वापर करून लेखी संवाद साधण्यास मनाई करण्यात आली आहे. रशियन भाषेला पाश्चिमात्त्यांच्या भाषिक प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी पुतीन सरकारने हा अजब निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले.आता पुतीन यांचा अमेरिका आणि युरोपद्वेष काही लपून राहिलेला नाहीच. त्यातच युक्रेन युद्धामुळे या पश्चिमी देशांनी रशियालाच जबाबदार धरत कित्येक निर्बंधही लादले. त्यामुळे आता खवळलेले पुतीन या ना त्या मार्गाने या पश्चिमी देशांचे रशियातील महत्त्व कमी करण्यासाठीचा खटाटोप करताना दिसतात. त्याच अंतर्गत आता त्यांनी रशियन भाषेमधील विदेशी शब्दांची घुसखोरी सहन केली जाणार नाही, अशी तंबीच आपल्या सरकारी अधिकार्‍यांना दिली आहे. त्यामुळे सरकारी अधिकार्‍यांना शासकीय दस्तावेजांत रशियन भाषा लिहिताना आता विदेशी शब्दांना फाटा द्यावा लागेल. पण, हे करताना ज्या रशियन शब्दांना कुठलेच पर्यायी शब्द उपलब्ध नाहीत, ते वापरण्याची मुभा मात्र रशियन सरकारतर्फे देण्यात आली आहे, हेही नसे थोडके! असे असले तरी यासंदर्भातील कुठलीही यादी ना तेथील सरकारने जाहीर केली किंवा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना काय शिक्षा होणार, त्याबाबतही स्पष्टता नाही.

यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की, पुतीन यांचा हा परदेशी शब्दबंदीचा निर्णय फक्त सरकारी कर्मचार्‍यांपुरता लागू असून सर्वसामान्य रशियन नागरिकांचा त्याच्याशी फार संबंध नाहीच. त्यामुळे अशाप्रकारे परदेशी शब्द फक्त सरकारी कामकाजातून हद्दपार करून रशियन भाषाशुद्धी कितपत होईल, हे पुतीनच जाणो!राहता राहिला प्रश्न भाषेचा, तर रशियन भाषा ही ‘स्लाव्हिक’ वर्गातील भाषा. फक्त रशियाच नाही, तर पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या अधिपत्याखाली असलेल्या ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन यांसारख्या देशांतही ही भाषा आजही तग धरून आहे. रशियाव्यतिरिक्त बेलारुस, किर्गिझस्तान, कझाकस्तान या देशांमध्येही रशियनला अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त आहे.

एका आकडेवारीनुसार, जवळपास २५ कोटींहून अधिक नागरिक जगाच्या कानाकोपर्‍यात रशियन भाषेत संवाद साधतात. पण, त्याचबरोबर हेही तितकेच खरे की, इंग्रजीच्या तुलनेत रशियन भाषा तितकीशी शब्दसमृद्ध नाही. पण, म्हणून ती दुय्यम ठरावी किंवा त्यामुळे या भाषेचा र्‍हास होतो आहे, असे मानण्याचे कारण नाही.परंतु, राजकारणात नेहमीच संस्कृती, सांस्कृतिक मूल्ये ही आपसुकच भरडली जातात. भाषासुद्धा त्याला अपवाद नाहीच. रशियामध्येही पुतीन यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतर ही बाब पुनश्च अधोरेखित झाली. मातृभाषेच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी ही सामूहिकच. पण, म्हणून परदेशी शब्दबंदी हा त्यावरील दूरगामी उपाय ठरु शकत नाही, हेही तितकेच खरे!



 
Powered By Sangraha 9.0