माथेरानमध्ये पहिल्यांदाच गव्याचे दर्शन

19 Mar 2023 20:14:11



wild gaur




मुंबई (प्रतिनिधी):
रानगव्यांचा अधिवास हा प्रामुख्याने कोयना, राधानगरी, चांदोली आणि दाजीपूर अभयारण्यासाठी प्रसिद्ध होता. मात्र, आता हा गवा पहिल्यांदाच माथेरान येथील लुईसा पॉईंट येथे आढळुन आला आहे. काही दिवसांपुर्वी डोंबिवलीतील येथे दिसलेलाच हा रानगवा असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपुर्वी तळोज्यामध्ये रानगवा आढळुन आला होता. त्यानंतर, तळोज्यातील हा गवा डोंबिवलीतील मलंगगड परिसरात आढळुन आला होता. नागरी वस्तीत गवा फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. दि. १९ मार्च रोजी माथेरान येथील लुईसा पॉईंट येथे प्रथमच रानगवा आढळुन आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच हा गवा डोंबिवलीतीलच मलंगगडचा असावा अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते.

पश्चिम घाटाच्या दक्षिणेपुरते मर्यादित असलेले गवे गेल्या काही वर्षांमध्ये समुद्र किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात दिसून येत आहेत. संगमेश्वर, रत्नागिरी, गावखडीचा किनारा या परिसरांमध्ये गव्यांचा वावर आढळून आला आहे. बारवी आणि माहूली गडाचा परिसरातही काही वर्षांपूर्वी गवे आढळून आले होते. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडे असलेल्या ’फणसाड अभयारण्या’तही गव्यांच्या अधिवासाचा शास्त्रीय पुरावा मिळाला आहे. ऑगस्ट, २०१८ मध्ये अभरण्यातील सूपेगावाजवळ गवे दिसल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावेळी वन्यजीव संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये गव्यांची पदचिन्हे आणि विष्ठा आढळली. मात्र, सप्टेंबर २०१९ मध्ये संशोधकांना सर्वेक्षणादरम्यान गव्यांची छायाचित्रे मिळाली. यावेळी कळपामध्ये असलेल्या नऊ गव्यांची छायाचित्रे टिपण्यात आली. ‘फणसाड अभयारण्या’त गव्यांचा अधिवासाचा हा २०१९ चा पहिलाच पुरावा आहे.



19 March, 2023 | 20:17

Powered By Sangraha 9.0