चित्रपट आणि मालिकांचे कथा, संवादलेखन, पटकथा लेखन कसे केले जाते? लेखन कसे, केव्हा, कुठे, कधी करायला हवे, या विषयावर ’जागो मोहन प्यारे’, ’एक घर मंतरलेलं’, ’येऊ कशी तशी मी नांदायला’, ’नकुशी’, ‘वैजू नंबर वन’, ’तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांचे पटकथा लेखक तसंच ’जिंदगी नॉट आऊट’, ’शुभमंगल ऑनलाईन’, ’कन्यादान’, ‘भाग्य दिले तू मला’, ’खाद्यभ्रमंती’ मालिकेचे संवादलेखक त्याचबरोबर ’पुष्पक विमान’ आणि ’खारी बिस्कीट’ चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखक अशा अनेक भूमिका बजावलेले चेतन सैन्दाणे यांच्याशी खास बातचीत...
समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे की, ’दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.’ अर्थात, उत्तम लिहिण्यासाठी आधी उत्तम वाचन हे ओघाने आलेच. तेव्हा लेखनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या वाचनाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल?
खरंतर लिखाण हे मुळात सुचण्यावर अवंलबून आहे. त्यामुळे उत्तम सुचण्यासाठी उत्तम वाचन करणे गरजेचे आहे आणि मुळात एखादी गोष्ट तुम्हाला सुचण्यासाठी त्या प्रकारातील काहीतरी वाचने गरजेचे असेत. उदा. भयपटाचे लिखाण करताना सर्वात प्राथमिक निकष असतो की, चित्रपट पाहणारे प्रेक्षक घाबरायला हवेत. त्यामुळे तशा पद्धतीचे लेखन करण्यासाठी त्या प्रकारातील किमान ज्ञान आपल्याजवळ असायला हवे. त्यामुळे माझ्या मते, लेखक होऊ इच्छिणार्यांने आधी ९० टक्के वाचन करायला हवे. त्यामुळे सुरूवातीला तुम्ही दहा टक्के लिखाण केले तरी ते पुरेसे आहे. पण तुम्ही जे लिहिताय ते कसदार असायला हवे आणि याउलट ९० टक्के लिखाण आणि दहा टक्के वाचन करायला गेलो, तर त्या लिखाणात हवी तितकी परिपूर्णता येत नाही.त्यामुळे वाचनाने पाया मजबूत करत मगच लेखनाची सुरूवात करावी. तसेच तुम्ही केलेलं वाचन हे तुमच्या लिखाणातून झिरपले पाहिजे.
बरेचदा कथालेखन आणि पटकथालेखन यांची गल्लत होताना दिसते. तेव्हा, या दोन्हींमधला नेमका फरक काय?
कथालेखन आणि पटकथालेखन या दोन्ही गोष्टींमध्ये तांत्रिक फरक आहे. पट म्हणजे ‘स्क्रिन.’ अर्थात, स्क्रिनवर मांडली जाणारी कथा म्हणजे पटकथा होय. म्हणजे रामायण ही कथा आहे. परंतु, पटकथा म्हणजे कागदावर त्याच रामायणातील दृश्याची आखीवरेखीव बांधणी पटकथेत केली जाते आणि याच प्रक्रियेला पटकथा असे म्हणतात.
दैनंदिन मालिका म्हटलं की, लेखकावरही आपसूकच थोडा ताण येतोच. त्यातच एकापेक्षा अधिक मालिकांच्या लेखनाचे काम हाती असेल, तर वेळेच्या मर्यादा येतात. तेव्हा, तुम्ही हे सगळं नेमकं कसं निभावून नेता?
पहिली गोष्ट अशी की, जे काम आपल्याला आवडते त्यांचा व्यवसाय करायला सुरुवात केली की, त्या कामाचा थकवा कमी जाणवतो. परंतु, तरीही मालिकालेखन करताना तुम्हाला वैयक्तिक आयुष्य काही काळ बाजूला ठेवावे लागते. याचे कारण असे की, मालिका चित्रित करत असताना दिग्दर्शक सेटवर पोहोचू शकला नाही, तरी सहाय्यक दिग्दर्शक तो दिवस निभावून नेऊ शकतात. परंतु, लेखकाला अशी मुभा नसते. कारण, लेखकाने लिहायचे थांबवले, तर चित्रिकरण थांबू शकते. त्यामुळे त्या चित्रीकरणावर पोट भरणार्या लोकांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो. त्यामुळे बरेचदा लेखक हे तणावात दिसतात. मात्र, जबाबदारी आणि आपल्या कामामुळे होणार्या समाधानाची जाणीव हीच आपल्याला बर्याच वेळा त्या तणावातून बाहेर काढते. त्यामुळे प्रेक्षकांच्या तणावाला मनोरंजनाची झालर चढवणार्यांनी स्वत: तणावात राहता कामा नये, असे मला वाटते.
मालिका अथवा चित्रपटांचे संवाद लेखन करताना नेमक्या कोणत्या निकषांचा प्राधान्याने विचार केला जातो?
संवादलेखन करताना निरीक्षण करणे हे फार गरजेचे आहे. कारण प्रत्येकांची कथा सारखी असली, तरी त्या व्यक्तीची जडणघडण ही तुमच्या संवादलेखनात दिसली पाहिजे. तसेच त्या पात्राच्या कुटुंबाची ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी तसेच घडलेल्या प्रसंगात सध्याची त्या पात्राची मानसिकता समजून घेऊनच लेखकाला संवादलेखन करावे लागते. त्यामुळे आपण लिहीत असलेल्या पात्राची ओळख सर्वप्रथम संवादलेखक म्हणून स्वत:ला झाली पाहिजे.
मालिका अथवा चित्रपटांमध्ये लेखनकार्य करताना नेमके काय करावे, याबाबत बरेचदा सविस्तर मार्गदर्शन केले जाते. पण, नेमके काय करु नये, काय टाळावे याविषयी फार कुणी बोलताना दिसत नाही. तेव्हा, तुमचा आजवरचा अनुभव याबाबत काय सांगतो?
लेखन करताना काय करू नये असं विचाराल, तर लेखनाचा कंटाळा करू नये. तसेच आज बरेचदा लेखक दुसर्यांच्या कामावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे बर्याच वेळा लेखक म्हणून आपले काम प्रेक्षक कशाप्रकारे स्वीकारत आहेत, याकडे लेखकाचे लक्ष नसते. म्हणून असे न करता लेखकाने स्वत:चे काम लक्षपूर्वक पाहणे गरजेच आहे. तसेच लेखक म्हणून आव्हानांना घाबरू नये. तणावात राहूनसुद्धा मानसिक त्रास न करून घेता उत्तम लिखाण कसे करता येईल, याचा विचार लेखकांनी करावा. तसेच पैशांच्या मागे न धावता आपल्या मेहनतीने आपल्या कामामुळे आपल्याला अपेक्षित पैसे कसे मिळवता येतील, याकडे लेखकांनी लक्ष द्यावे.
कथेच्या मागणीनुसार बरेचदा बोलीभाषेतही लेखन करावे लागते. उदा. तुमच्या ’पुष्पक विमान’ सिनेमात तुम्हाला खान्देशी बोलीभाषेचा वापर करावा लागला. मग अशावेळी लेखक म्हणून हे आव्हान तुम्ही कसे पेलता?
असे म्हणतात की, ‘कोस कोस पर बदले पानी और चार कोस पर वाणी’ मुळात लेखकाला बोलीभाषेचे प्राथमिक ज्ञान असायलाच हवे. आज सगळीकडे बोलीभाषा आणि प्रमाणभाषा असा वाद सुरू आहे. पण जोपर्यंत भाषा हे संवादाचे माध्यम आहे. तोपर्यत शुद्ध-अशुद्ध असे ठोकताळे मांडणे चुकीचे आहे. पंरतु जेव्हा लिपीचा विचार करतो तेव्हा ते शुद्ध असायलाच हवी. कारण, जर समजा समाज माध्यमांवर ‘मी खूण करेन’ याऐवजी ‘मी खून करेन’ असे लिहून तुम्ही एखाद्याला पाठवले, तर समोरील व्यक्तीचा तुमच्याबदल गैरसमज होईल. त्यामुळे लिखाणात शुद्ध-अशुद्ध या गोष्टीला फार महत्त्व आहे. तसेच बोलीभाषा महत्त्वाची आहे. कारण, संवादलेखक म्हणून तुम्हाला अनेक पात्राचे संवाद लिहावे लागतात. त्यामुळे मिळेल तिथून बोलीभाषेचा खजिना लेखकाने मिळेल तेव्हा लुटायला हवा. बोलीभाषेचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत म्हणजे वेगवेगळ्या बोलीभाषेतील साहित्याचे वाचन करणे. तसेच भाषा हे लेखकांचे शस्त्र आहे, हे लक्षात घेऊन लेखकाने योग्य वेळी स्वत:च्या भात्यातील बोलीभाषेच्या बाणांच्या शक्तीचा परिचय इतरांना करून द्यावा.
मालिकांचा दर आठवड्याला ‘टीआरपी’चा आकडा समोर येत असतो. तेव्हा हा ’टीआरपी’ नेमका काय असतो आणि त्याचा परिणाम खरोखरच मालिकेवर होत असतो का?
प्रेक्षक आणि लेखक तसेच कलाकार यांना जोडणारा दुवा म्हणजे निर्माता असतो. यामुळेच मालिकांचे आर्थिक गणित फार महत्त्वाचे असते आणि हेच आर्थिक गणित ’टीआरपी’वर अवलंबून असते. त्यामुळे मालिका लेखन करताना प्रेक्षकाला केंद्रस्थानी ठेवले जाते. यामुळे लेखकाला नेहमी प्रेक्षक आणि निर्माता या दोघांचा विचार करून सुवर्णमध्य गाठावा लागतो आणि हे सगळं करत असताना ‘टीआरपी’चे भूत लेखकांच्या मानगुटीवर बसलेले असते. त्यामुळे दर गुरूवारी येणारा ‘टीआरपी’ हा तुमच्या मालिकेचे भविष्य आणि मालिकेचा प्रवास ठरवत असतो.
मालिका किंवा चित्रपटांमध्ये ज्यांना लेखनसंबंधी ‘करिअर’ करायचे आहे, अशा इच्छुकांनी नेमकी या सगळ्याची सुरुवात कुठून करावी? ’करिअर’ म्हणून या क्षेत्रातील संधींविषयी काय सांगाल?
मालिका आणि चित्रपटामध्ये लेखन करायचे असेल तर भरपूर वाचन करावे. भाषेवर प्रभुत्व मिळवून आपल्याला वाटेल, त्या विषयावर लेखन करायला सुरूवात करावी. तसेच लेखनाची आवड निर्माण करत राहायला हवे. परंतु, हे सगळं करत असताना आपण करत असलेले लिखाण कोणाला आवडेल का? लिखाण कुठे प्रसिद्ध होईल का? या गोष्टीचा विचार न करता आपण समर्थांच्या म्हण्याप्रमाणे, दिसामाजी काहीतरी लिहीत राहावे. तसेच मालिका किंवा चित्रपट क्षेत्रात करिअर म्हणून अनेक संधी आहेत. नवोदित लेखकांनी सुरूवातीला एकांकिका लेखन, निबंध लेखन, अशा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि स्वत:ला आजमावून पाहावे. त्यानंतर आपले प्रसिद्ध झालेले लिखाण वाचकांपर्यत पोहोचवावे. साहाय्यक लेखक म्हणून एखाद्या लेखकांकडे काम करावे. जेणेकरून तुम्ही चुकांमधून नवीन गोष्टी शिकाल. तसेच नवीन लेखन आणि नवीन संकल्पनांना नक्कीच संधी मिळते हे लक्षात घ्यावे.