मुंबई : कांदा आणि कापसाच्या प्रश्नांवरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. “विरोधकांचे शेतकर्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. त्यांची नौटंकी सुरू आहे. सरकार चांगल्या पद्धतीने उत्तर देतेय, ते विरोधकांना नकोय,” असे खडेबोलही आ. प्रवीण दरेकर यांनी सुनावले.
विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेतेअंबादास दानवे यांनी, २८९नुसार कांद्याच्या प्रश्नावर सरकारने चर्चा करावी, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या गोंधळामुळे सुरुवातीला१५ मिनिटांसाठी त्यानंतर २५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सभागृहाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. यावेळी आ. प्रवीण दरेकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. “शेतकर्यांच्या महत्त्वाच्या विषयावर उपमुख्यमंत्री स्वतः उत्तर देत आहेत. याबाबत तपशीलवार उत्तर देत असताना विरोधकांना केवळ नाटक करायचे आहे, त्यांना उत्तर नको आहे. शेतकर्यांबाबत विरोधकांना कळवळा नाही. विरोधकांचे शेतकर्यांप्रती पुतना मावशीचे प्रेम असून त्यांनी शेतकर्यांची थट्टा चालवली आहे,” असेही दरेकर यावेळी म्हणाले.