नवी दिल्ली : ’हिंडेनबर्ग रिसर्च‘च्या अहवालामध्ये अदानींनी शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर काँग्रेसने ’अदानी कुणाचे मित्र?‘ असा सवाल भाजपला विचारला होता. त्याचा समाचार घेताना भाजपने एक ‘व्हायरल’ होत असलेल्या व्हिडिओकडे अंगुलीनिर्देश करत काँग्रेसवर पलटवार केला आहे.
विरोधकांकडून गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप यांच्या कथित मित्रत्वाच्या संबंधांवरून रान पेटवले जात आहे. त्यात आता भाजपचे दिवंगत नेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा एक व्हिडिओ ‘व्हायरल’ होत आहे.
सत्ताधारी भाजप आणि खुद्द ‘अदानी समूहा’कडूनही वारंवार अशा प्रकारच्या कोणत्याही मित्रत्वाच्या संबंधांचा फायदा किंवा झुकते माप ‘अदानी समूहा’ला मिळाले नसल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकरांचा जुना व्हिडिओ ’व्हायरल’ होऊ लागल्यामुळे नव्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ 2015नंतरचाच असल्याचे व्हिडिओतील पर्रिकरांच्या भाषणावरून दिसून येत आहे. मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्यांनी गोवा विधानसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. या भाषणात गौतम अदानींचे भाजपशी मित्रत्वाचे संबंध असल्याच्या काँग्रेसच्या टीकेचा मनोहर पर्रिकर समाचार घेत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी गोव्यातील मोर्मूगाव पोर्टचे कंत्राट अदानींना कसे मिळाले? याविषयी मनोहर पर्रिकर आपल्या भाषणात भाष्य करत असल्याचे दिसून येत आहे.
मनोहर पर्रिकर यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना त्या व्हिडिओत म्हटले आहे की, “अदानींना तुम्ही भाजपचे जवळचे मित्र म्हणता. त्यांना सर्व आदेश तुमच्या कार्यकाळात मिळाले आहेत. दि. 15 मे,2010 रोजी या विमानतळाच्या प्रकल्पाला हिरवा झेंडा राज्य सरकारकडून देण्यात आला. नरेंद्र मोदी तेव्हा पंतप्रधान नव्हते. गोव्यात तेव्हा भाजपचे सरकारही नव्हते, ही सगळी कामे काँग्रेसच्या कार्यकाळात अदानींना देण्यात आली. मग ते कुणाचे मित्र झाले? आमचे मित्र झाले का? त्यांनी या प्रकल्पाचे काम मार्च 2014 ला पूर्ण केले, 2010ला प्रकल्प सुरू केला होता, चार वर्षं लागली तो पूर्ण व्हायला,” असेही पर्रीकरांनी यात नमूद केले आहे.
राहुल गांधी खोटारडे! ‘जीव्हीके’ने केला खुलासा
मुंबई विमानतळाची मालकी ’अदानी समुहा’ला देण्यासाठी मोदी सरकारने ’जीव्हीके’ कंपनीवर दबाव आणला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या आरोपांवर ‘जीव्हीके’ कंपनीने केलेल्या खुलाशामुळे राहुल गांधी खोटारडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई विमानतळाची मालकी ‘अदानी समूहा’ला देण्यासाठी मोदी सरकारने ‘जीव्हीके’ कंपनीवर दबाव आणला, असा आरोप राहुल गांधी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केला होता. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपावर ‘जीव्हीके’ कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यासंदर्भात वृत्तवाहिनीशी बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष संजीव रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. संजीव रेड्डी म्हणाले, “‘अदानी समूहा’बरोबर झालेल्या हस्तांतरणाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. हे हस्तांतरण होण्यापूर्वी आम्ही बंगळुरू विमानतळाचे अधिग्रहण केले होते. त्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्यानंतर कोरोनाचे संकट आले आणि तीन महिने मुंबई विमानतळ बंद होते. आमचे उत्पन्न ठप्प झाले होते. आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आमच्यावर कर्जही होते. त्यामुळेच आम्ही ‘अदानी समूहा’बरोबर करार केला. राहुल गांधींच्या आरोपाबाबत बोलायचे झाल्यास, त्यावेळी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, अशी प्रतिक्रिया संजीव रेड्डी यांनी दिली.
मोदी-अदानी मैत्रीवर केलेले भाषण राहुल गांधींना पडले महागात
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेवेळी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेमके संबंध काय आहेत, या प्रश्नाचं उत्तर देशाला जाणून घ्यायचे आहे, असे विधान केले. मात्र, पंतप्रधान मोदींवर आरोप करणे राहुल गांधींना महागात पडले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, “7 फेब्रुवारी रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय संसदेत पंतप्रधानांवर आरोप केले. त्यांचे आरोप चुकीचे, दिशाभूल करणारे होते.” यासोबत निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना राहुल गांधींवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांनी ‘दस्तावेजीय पुराव्याशिवाय’ पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य करून सभागृहाची दिशाभूल करून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.