‘वाघा बॉर्डर’ क्रॉस करून लाहोर बसने अटलबिहारी वाजपेयी लाहोरला गेले असता, राष्ट्रप्रमुखाच्या स्वागताला सेनादलाचे अधिकारी उपस्थित असावे लागतात, मुशर्रफ गैरहजर राहिले. अटलबिहारी वाजपेयी यांना मी ‘सॅल्युट’ करणार नाही, ही त्यांची घमेंड होती. कारगील युद्धात त्याच अटलजींच्या डाव्या हाताची त्यांच्या थोबाडीत बसली. अटलबिहारी वाजपेयी यांना ‘राष्ट्ररत्न’ अशी उपाधी दिली जाते आणि त्यांच्यासोबत भांडण करणार्या मुशर्रफ यांना ‘पाकिस्तान नाशक’ अशी उपाधी दिली पाहिजे.
पाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांचे रविवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. आपली परंपरा अशी आहे की, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर वैर विसरून त्याला आदरांजली व्हावी. प्रभूरामचंद्रांचे वचन आहे - ‘मरणान्तानि वैराणी.’ रावण मेल्यानंतर रावणाचा सन्मानपूर्वक दाहसंस्कार रामांनी केला.असे जरी असले, तरी परवेज मुशर्रफ यांना विसरता येणार नाही. काही लोकांना त्यांच्या सद्गुणांमुळे आणि नैतिक कामामुळे विसरता येणे अशक्य असते, अशी थोर मंडळी लोकांच्या भावविश्वाचा भाग होतात. आपल्या सर्वांच्या भावविश्वात अशी असंख्य नावे आहेत. परवेज मुशर्रफ या श्रेणीत बसत नाहीत. त्यांच्यावर मृत्यूलेख लिहिताना त्यांच्या भयानक दुर्गुणांचे स्मरण करावे लागते. नियती काही व्यक्ती अशा घडवते की, त्यांच्या विषयी चांगले लिहिणे किंवा बोलणे शक्यच होऊ नये. याच नियतीचा हेतू असाही असावा की, टोकाचे वाईट काम आहे हे समोर आणल्यानंतर मनुष्याची प्रवृत्ती चांगले शोधण्याकडे व्हावी.
नवाझ शरीफ लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या राज्यघटनेप्रमाणे ते निवडून आले. परवेज मुशर्रफ यांनी कट करून त्यांना बाजूला केले आणि सत्ता आपल्या हाती घेतली (१९९९) त्यांचे हे कृत्य लोकशाहीविरोधी, घटनाविरोधी, मानवी मूल्यविरोधी होते. व्यक्ती एकदा सत्ताधीश झाली की, त्यात ती जर हुकूमशहा असेल, तर ती सर्व कायद्यांच्या पलीकडे जाते. मुशर्रफ यांचा हा गुन्हा न्यायाची आणि कायद्याची कसोटी लावली असता फाशी देण्याच्या योग्यतेचा होता. पण, हुकूमशहाला कोण फाशी देणार? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, कायदा मूक होतो आणि न्याय झोपी जातो.
मुशर्रफ यांचे दुसरे पाप म्हणजे, त्यांनी भारतावर कारगील युद्ध लादले. या युद्धात भारताचे ५४३ जवान हुतात्मा झाले. या युद्धात पाकिस्तानचा नेहमीप्रमाणे पराभव झाला. परंतु, मुशर्रफ यांची मस्ती जिरली नाही. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी ते आग्र्याला आले आणि शेवटच्या क्षणी अचानक पाकिस्तानला निघून गेले.मुशर्रफ यांचे तिसरे पाप म्हणजे, त्यांनी ओसामा बिन लादेन याला अबोदाबाद येथे लपवून ठेवले. ‘९/११’च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जगाला धमकी दिली की, या युद्धात एकतर तुम्ही आमच्याबाजूने आहात किंवा आमच्या विरोधात आहात? तिसरी भूमिका घेण्याला त्यांनी पर्याय ठेवाला नाही.
परवेज मुशर्रफ यांच्या पुढे त्यांनी सात अटी ठेवल्या त्या पुढीलप्रमाणे...
१) बिन लादेन याचा रणनीतीसंबंधातील पाठिंबा बंद करा, सीमेवरील ‘अल कायदा’च्या कारवाया बंद करा. ‘अल कायदा’ला मिळणारी शस्त्रे जप्त करा.
२) पाकिस्तानी भूमीवरून विमानहल्ले करण्यासाठी आवश्यक ते साहाय्य करा.
३) पाकिस्तानच्या नाविकतळाचा, सैनिकी विमानअड्ड्यांचा आणि सामारिक महत्त्वाच्या सीमेवरील तळांचा उपयोग दहशतवाद्यांच्याविरुद्ध करण्यास मोकळा करा.
४) अमेरिकेला तत्काळ दहशतवाद्यांची गुप्त माहिती देण्यात यावी, त्यांच्या साहाय्यकर्त्यांना ही माहिती देण्यात यावी.
५) अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार सतत करीत राहा. दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याची कोणतीही अंतर्गत कृती केली जाता कामा नये.
६) तालिबान यांना देण्यात येणारा तेलपुरवठा बंद करा, तालिबानींना देण्यात येणारे स्वेच्छासैनिका बंद करा.
७) ओसामा बिन लादेन आणि अफगाणिस्तानचे तालिबानी सरकार यांचा अमेरिकेवरील हल्ल्यात निर्विवाद हात आहे, असे सिद्ध झाल्यास पाकिस्तानने अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध तोडून टाकावेत.
मुशर्रफ यांनी त्या मसुद्यावर आज्ञाधारक मुलाप्रमाणे सही केली. वर्तमानपत्रांनी मुशर्रफ यांचे नाव बदलून ‘बुशर्रफ’ असे ठेवले.या दहशतवादी युद्धात मुशर्रफ डबल गेम खेळत राहिले. अफगाणिस्तानातील दहशतवादी अड्डे त्यांचे पुढारी या सर्वांना त्यांनी सुरक्षित ठेवले, ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात लपवून ठेवले. जोपर्यंत ओसामा बिन लादेन जीवंत आहे, तोपर्यंत अमेरिका आपल्याला साहाय्य करीत राहील. ओसामा बिन लादेन सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हे त्यांनी जाणले.
मुशर्रफ यांचे चौथे पाप म्हणजे त्यांनी बेनझीर भुट्टो यांना नाहीसे करून टाकले. बेनझीर भुट्टो बॉम्बस्फोटात गेल्या. त्या भारताच्या मित्र होत्या, असे नाही. पण, त्या पाकिस्तानच्या मित्र जरूर होत्या. त्या लोकशाहीवादी होत्या, त्या जर जीवंत राहिल्या असत्या, तर मुशर्रफ आणि लष्कराची सत्ता समाप्त झाली असती. त्यांच्या हत्येची यथायोग्य चौकशी झालेली नाही. तथापि, काही राजनैतिक हत्या अशा असतात की हत्यारे कोण असावे, हे चौकशी न करताही लोकांना समजते. अत्यंत घमेंडीत वावरणार्या मुशर्रफ यांना पाकिस्तानी जनतेने लाथ मारून हाकलून लावले. त्यांच्यावर भयानक आरोप ठेवण्यात आले त्यातून वाचण्यासाठी मुशर्रफ दुबईला पळाला आणि अनेक पापाच्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला.
मुशर्रफच्या पापाची फळे आजचा पाकिस्तान भोगतो आहे. पाकिस्तानने तालिबानी निर्माण केले, इस्लामी दहशतवादी निर्माण केले. या इस्लामी दहशतवाद्यांना काश्मीरचे स्वातंत्र्यसैनिक संबोधून त्यांनी त्यांना भारतात पाठवले. ते इस्लामी भस्मासूर आता पाकिस्तानच भस्मसात करायला निघाले आहेत. या इस्लामी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळविला आहे, उद्या हे दहशतवादी पाकिस्तानवरदेखील कब्जा मिळवतील. त्यानंतर पाकिस्तानचे काय होईल? तो अस्तित्वात राहील का? का त्याचे नामोनिशाण नकाशावरून पुसले जाईल? हे येणारा काळ सांगेल.
मुशर्रफच्या रूपाने जगाने अत्यंत उर्मट, घमंडी, इस्लामी भूताने पछाडलेला राज्यकर्ता पाहिला. भारतद्वेष म्हणजे हिंदूद्वेष याचा अर्थ म्हणजे परवेज मुशर्रफ होता. ‘वाघा बॉर्डर’ क्रॉस करून लाहोर बसने अटलबिहारी वाजपेयी लाहोरला गेले असता, राष्ट्रप्रमुखाच्या स्वागताला सेनादलाचे अधिकारी उपस्थित असावे लागतात, मुशर्रफ गैरहजर राहिले. अटलबिहारी वाजपेयी यांना मी ‘सॅल्युट’ करणार नाही, ही त्यांची घमेंड होती. कारगील युद्धात त्याच अटलजींच्या डाव्या हाताची त्यांच्या थोबाडीत बसली. अटलबिहारी वाजपेयी यांना ‘राष्ट्ररत्न’ अशी उपाधी दिली जाते आणि त्यांच्यासोबत भांडण करणार्या मुशर्रफ यांना ‘पाकिस्तान नाशक’ अशी उपाधी दिली पाहिजे.
मुशर्रफ यांचा एक धडा पाकिस्तानी जनतेसाठीदेखील आहे. अर्थात, ही जनता शहाणी असेल, तर या धड्याचा उपयोग आहे. नाहीतर ‘गाढवा पुढे वाचली गीता...’ आणि गाढव म्हणतोे, कालचा गोंधळ बरा होता. तो धडा असा की, पाकिस्तानी जनतेने लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत जगले पाहिजेत. त्यातील एक सिद्धांत हे सांगतो की, सर्व सत्तेचा उगम जनतेत असतो. जनता सर्व सत्ताधीश असते. पाकिस्तानी जनतेने लष्कराला सर्वसत्ताधीश केले आहे. हे लष्करशहा जनतेला कधी सार्वभौम होऊ देत नाहीत.त्यांना पाकिस्तानात टिकून राहायचे असल्यामुळे भारतद्वेषाशिवाय त्यांना टिकून राहता येत नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दलित चळवळीतील एखाद-दुसरा गट सोडला, तर बाकीच्यांच्या जीवंत राहाण्याचा मंत्र हिंदुत्व द्वेष असतो. जवळजवळ तिच स्थिती पाकिस्तानातील लष्कराची आहे. हिंदुस्थानाचा द्वेष केल्याशिवाय पाकिस्तानच्या लष्कराला जीवंत राहाता येत नाही. लष्करशहांना ‘फाईव्ह स्टार’ जीवन जगता येत नाही आणि म्हणून या लष्कराला कधी आयुब खान, तर कधी याह्या खान तर कधी मुशर्रफ ऊर्फ ‘बुशर्रफ’ लागतो.
हे किती काळ सहन करायचे? याचा निर्णय पाकिस्तानी जनतेने करायचा आहे. पाकिस्तानी जनता जर जागृत झाली आणि तिला जर याचा साक्षात्कार झाला की, विश्वाचा सार्वभौम अल्ला असेल, तर पाकिस्तानचे सार्वभौम आम्ही आहोत आणि हे सार्वभौमत्व या जनतेने अभिव्यक्त करायला सुरुवात केली पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी म्हणत असत की, पाकिस्तान आमचा शेजारी आहे, तो सुस्थिर आणि संपन्न असावा, अशी आमची इच्छा आहे. त्याचा नाश व्हावा, ही आमची इच्छा नाही. पाकिस्तानी जनतेनेच आपण सुस्थिर राहायचे व सुसंपन्न राहायचे, याचा निर्णय करायचा आहे. लष्करशहाने पाकिस्तानला अमेरिकेची बटीक बनविले आहे, या स्थितीत राहायचे की, स्वाभिमानाने जगायचे, हे पाकिस्तानच्या जनतेने ठरवायचे आहे.
भारतद्वेष आणि हिंदूद्वेष हा मुशर्रफ यांचा वारसा आहे. हा वारसा पाकिस्तानला खड्ड्यात घेऊन जाईल. पाकिस्तानी जनतेने आपल्या मुळांचादेखील शोध घेतला पाहिजे. महम्मद बिन कासीमपूर्वी आम्ही कोण होतो? आमच्या डोक्यावर गोल टोपी आणि चेहर्यावर आखुड दाढी आणि स्त्रियांना बुरखा कुठून आला, कोणी आणला? तक्षशीला, पाणिनी आणि सिंधू संस्कृती यांच्याशी आमचा संबंध कोणता? याचा शोध घेतला पाहिजे. आम्हाला मुशर्रफचे बुशर्रफ व्हायचे, की महम्मदाकडून महादेवाकडे जायचे? याचा निर्णयही त्यांना करायचा आहे. मुशर्रफ मेल्याचा शोक पाकिस्तान करेल असे वाटत नाही, लष्कर शोक करेल. पण, जनतेने मात्र निश्चय केला पाहिजे की, पाकिस्तानच्या इतिहासात मुशर्रफ हा शेवटचा असेल.