शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि ठाकरे परिवारातील व्यक्तींना राजकीयदृष्ट्या ‘टार्गेट’ केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील विभक्त झालेले सदस्य असो, ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश असतील किंवा बाळासाहेबांची सेवा करणार्या थापाने शिंदेंना दिलेला पाठिंबा असेल, शिंदे विविध मार्गांनी ठाकरेंना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेंचा गटकडून माजी मंत्री आणि ठाकरे घराण्याचे वंशज असलेले वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. नुकताच कोळीबांधवांच्यावतीने फडणवीस-शिंदेचे अभिनंदन करण्यासाठी एक जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. सरतेशेवटी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या हजेरीमुळे हा कार्यक्रम राजकीय असल्याचेच बोलले जात होते.वरळीतील नागरिकांनी गेल्या तीन वर्षांत सातत्याने आंदोलने आणि समाजमाध्यमातून स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंवरील आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. ‘कोस्टल रोड’ बाधितांनी केलेल्या आंदोलनानंतर आणि त्यांच्या रेट्यामुळे प्रकल्पाचे काम थांबविल्यानंतर ठाकरेंच्या विरोधात जनसामान्यांमध्ये किती तीव्र नाराजी आहे, हे अधोरेखित झाले होते. ठाकरे गट असो किंवा इतर कुणीही सर्वसामान्य मतदार असलेल्या वरळीतील नागरिकांना गृहीत धरून कुणालाही राजकारण करता येणार नाही, हे वास्तव प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे आणि त्यानुसारच आपली रणनीती आखायला हवी, अन्यथा कपाळमोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. वरळीत सध्या आदित्य ठाकरेंच्या जोडीला सचिन अहिर आणि सुनील शिंदे असे एकूण तीन आमदार आहेत. शिंदेंना अजून म्हणावासा सक्षम पर्याय वरळीत गवसलेला नाही. मात्र, या द्वंद्वात भाजपची स्वतंत्र वाटचाल आहे तशी सुरू राहिली, तर येत्या काळात भाजपसाठी वरळी महत्त्वाचे सत्ताकेंद्र बनू शकते. त्यामुळे शिंदे असो ठाकरे असो व भाजप ’मैदान-ए-वरळी’चे रणांगण लढणे सर्वपक्षीयांसाठी आव्हानात्मक असणार आहे.
"
ठाकरे गृहयुद्धाच्या द्वंद्वात!
एका दाक्षिणात्य चित्रपटामध्ये ’सियासत में शिकस्त हो तो शान जाती हैं, लेकिन जंग में शिकस्त हो तो जान जाती हैं’ असा सुप्रसिद्ध संवाद आहे. राजकारणात पराभव झाला, तर तुमच्या प्रतिमेवर परिणाम होतो. पण, युद्धात जर तुमचा पराभव झाला, तर तिथे तुमच्या जीवावर बेतते, असा त्याचा थोडक्यात अर्थ. अशीच काहीशी वेळ आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारावर आली आहे. आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी मतदारसंघातून ठाकरे कुटुंबातील आणखी एका सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न शिंदेंकडून केले जात आहेत. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरेंच्या निकटवर्तीय नेते आणि पदाधिकार्यांना आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवलेच, पण त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या राजकीय उदयानंतर बाळासाहेबांपासून आणि परिवारापासून दुरावलेल्या ठाकरे कुटुंबीयांना जवळ करण्यातही एकनाथ शिंदेंना यश आले आणि खर्या अर्थाने हा उद्धव यांच्यासाठी मोठा झटका मानला गेला. उद्धव ठाकरेंचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा मागितल्यानंतर आता शिंदे गट आदित्य यांचा विधानसभेत जाण्याचा वरळीतील मार्ग बंद करण्याच्या तयारीत असून त्यासाठी रणनीती आखली जात आहे. यासाठी शिंदे गट निहार बिंदुमाधव ठाकरे यांना पुढे करण्याची तयारी करत असून आदित्य ठाकरेंच्या विरोधात त्यांना उमेदवारी देण्याची शिंदे गटाची मानसिकता असल्याचे सांगितले जात आहे.दुसरीकडे कधीकाळी शिवसेनेची सूत्र हाती घेण्याची तयारी करणार्या आणि त्यानुसार त्यांची पाऊलही पडायला सुरुवात झाली होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या उदयानंतर त्या शिवसेनेतूनच काय, पण ‘मातोश्री’च्याही बाहेर फेकल्या गेल्या. शिवसेनेतील बंडाळीनंतर स्मिता आणि निहार दोघेही शिंदेंच्या मेळाव्यात दिसून आले होते. त्यामुळे एकीकडे शिंदेंकडून पक्षावर केला जाणारा दावा आणि दुसरीकडे वरळीत आदित्य यांच्यासमोर ठाकरे बंधूलाच समोर उभा करून उद्धव ठाकरेंसमोर पक्षीय आणि कौटुंबिक स्पर्धा लावून आदित्य यांच्या वरळीत गृहयुद्धाच्या द्वंद्वात अडकवण्याचा शिंदेंचा प्रयत्न फलद्रुप होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.