PM Modi Parliment : २००४ ते २०१४ पर्यंत देशातले नागरिक असुरक्षित होते!
08 Feb 2023 15:45:37
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अदानी कंपनीच्या शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या राजकीय हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आज समस्या सोडवण्याचे माध्यम बनत आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले होते की, एकेकाळी आपल्या बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत आता जगाच्या समस्या सोडवण्याचे माध्यम बनत आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येने ज्या मूलभूत सुविधांसाठी अनेक दशके वाट पाहिली, त्या या वर्षांत मिळाल्याचेही त्यांनी भाषणात सांगितले. मोठ मोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार या समस्यांपासून देश आता मुक्त होत आहे, ज्यातून देशाची सुटका व्हायची होती. धोरण लकव्याच्या चर्चेतून बाहेर पडून देश आणि देशाची ओळख झपाट्याने होणारा विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेले निर्णय यातून होत आहे."
पीएम मोदींची राहुल गांधींवर काव्यात्मक टीका...
"ये कह कहकर हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं।"
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता काव्यात्मक पद्धतीने टीका केली. "काही जण भाषणानंतर खुप खुश होते. त्यांना झोप पण खुप चांगली असेल. एका बड्या नेत्याने तर राष्ट्रपतींचा अपमान केला आहे. आदिवासी समाजाप्रती द्वेषही दाखवला आहे. टीव्हीवर अशा गोष्टी बोलल्या गेल्या की आत द्वेषाची भावना निर्माण होते, सत्य बाहेर येत राहतं. " अस मोदी म्हणाले.
"पुरवठा साखळीच्या बाबतीत भारत पुढे गेला आहे. भारत एक 'मॅन्युफॅक्चरिंग हब' म्हणून विकसित होत आहे. भारताच्या समृद्धीत जगाला त्याची भरभराट दिसत आहे. निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. 140 कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना पाहायला मिळत नाही. गेल्या नऊ वर्षांत ९० हजार स्टार्टअप्स भारतात आले आहेत. आज आपण स्टार्टअप्सच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. देशातील टियर-3 शहरांमध्ये मोठी स्टार्टअप इकोसिस्टम पोहोचली आहे. इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात 108 युनिकॉर्न तयार झाले. युनिकॉर्न म्हणजे सहा-सात हजार कोटींपेक्षा जास्त किंमत. आज भारत मोबाईल बनवणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मी आणखी एक उदाहरण देतो. या कोरोनाच्या काळात भारतनिर्मित लस तयार करण्यात आली. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात घेण्यात आली. आपल्या करोडो नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले. संकटाच्या या काळात, आम्ही 150 हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लस पोहोचवल्या आहेत जिथे त्यांची गरज होती. आज जगातील अनेक देश जागतिक पटलावर भारताबद्दल अभिमानाने सांगतात, भारताचा गौरव गातात. तिसरा पैलू म्हणजे आज भारताची डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत आहे. त्यातून ताकद दाखवली आहे. संपूर्ण जग त्याचा अभ्यास करत आहे. बाली येथील G-20 मध्ये डिजिटल इंडियाचे कौतुक करण्यात आले. कोरोनाच्या काळात जगातील मोठ्या देशांना त्यांच्या नागरिकांना आर्थिक मदत करायची होती. हजारो कोटी रुपये एका सेकंदात ट्रान्सफर करणारा हा देश आहे. एक काळ असा होता जेव्हा देश अगदी लहान तंत्रज्ञानासाठीही तळमळत होता. आज देश पुढे जात आहे."
आव्हानांशिवाय जीवन नाही: पंतप्रधान मोदी
"आव्हानांशिवाय जीवन नाही, आव्हाने येतात, मात्र १४० कोटी देशवासीयांची भावना आव्हानांपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आव्हानांपेक्षा त्याची ताकद मोठी आणि मजबूत आहे. अनेक देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. तीव्र महागाई आहे. खाण्यापिण्याचे संकट आहे. आपल्या आजूबाजूलाही ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा स्थितीत कोणता भारतीय या गोष्टीचा अभिमान बाळगणार नाही की आजही हा देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आज संपूर्ण जगात भारताबद्दल सकारात्मकता आहे, आशा आहे, विश्वास आहे. आज भारताला जगातील श्रीमंत देशांच्या G-20 गटाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, हीही आनंदाची बाब आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. 140 कोटी देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पण आधी असे वाटले नव्हते, पण आता असे दिसते की काही लोकांना यामुळे वाईट वाटत आहे. ज्यांना याचा त्रास होत आहे ते कोण आहेत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे."