महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व असताना श्रेयवादाच्या जाणिवेचा स्पर्शदेखील नामदार एकनाथ शिंदे यांनी ‘समर्थ’च्या बाबतीत जाणवू दिला नाही. त्यांच्या प्रती आम्हाला असलेला आदर त्यांना मनोमन ठाऊक असल्याने कधी कार्यबाहुल्यामुळे उद्घाटक म्हणून येता आले नाही, तर हमखास वेळ काढून नामदार एकनाथ शिंदे कार्यक्रमाला आर्शीवाद देण्यासाठी येत असत. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ आणि नामदार एकनाथ शिंदे यांचे नातं औपचारिकतेच्या पलीकडे वृद्धिंगत होत गेले.
सेंट्रल मैदानाच्या विस्तीर्ण पटागंणावर ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा निनादत होत्या. अंगावर रोमांच आणणार्या या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी भल्या पहाटे 4 वाजता हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. क्रूरकर्मा इंग्रज कलेक्टर जॅक्सनला यमसदनी पाठवणार्या कृष्णा कर्वे, अनंत कान्हेरे आणि विनायक देशपांडे यांना दि. 19 मार्च, 1910 रोजी ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्या बलिदानाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या त्यानिमित्ताने ठाण्यात शौर्यपर्व शताब्दी अभिवादन सोहळा ‘समर्थ भारत व्यासपीठ’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
क्रांतिकारकांना 100 वर्षांपूर्वी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात आली होती. ठाण्यातील सेंट्रल मैदानात जॅक्सन वधावर आधारित ‘दीपक मंडख’ या नाट्य कंपनीने बसविलेले भव्य नाटक सकाळी 5 वाजता सादर केले जाणार होते आणि त्याचे उद्घाटन सध्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार होते. जय्यत तयारी झालेली. फक्त शिंदे साहेब नक्की येतील का, अशी चर्चा सुरू असताना बरोबर भल्या पहाटे 4.30 वाचता कपाळावर भगवा टिळा लावलेले शिंदेसाहेब प्रसन्न चेहर्याने नाटकाच्या उद्घाटनासाठी रंगमंचावर दाखल झाले आणि नाटकाला सुरुवात झाली. इतिहासात घडले त्याप्रमाणे ठीक 7 वाजता कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्याचा प्रसंग कलावंतांनी नाटकात साकारला व शिंदेसाहेब आणि संपूर्ण श्रोते जागेवर उभे राहिले आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. दिवसभर अनेक दौरे, बैठका करून शिंदेसाहेब आनंदाश्रमात रात्री 1 वाजता आले. नंतर तेथेही जवळपास 2.30 वाजेपर्यंत लोकांच्या भेटी साहेब घेत होते. 3 वाजता झोपले असावेत आणि पुन्हा पहाटे 4.30 वाजता सेंट्रल मैदानात नाटकांच्या उद्घाटनासाठी ते हजर झाले. त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेने अनेकदा अचंबित व्हायला होते.
‘समर्थ भारत व्यासपीठ’ संस्थेला ठाण्यातील कामाच्या 20 वर्षांच्या प्रवासात नामदार एकनाथ शिंदे यांना विविध अंगांनी अनुभवात आले. गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापनाचा अभिनव प्रयोग ठाण्याने महाराष्ट्राला दिला. गेल्या 16 वर्षांत न चुकता ठाण्यातील विविध गणेशोत्सव घाटावर काम करत असलेल्या ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या सफाई सेवकांना भेटल्याशिवाय शिंदेसाहेब राहत नाहीत.
माणसं एका रात्रीत मोठी होत नसतात. त्याच्या मागे असंख्य वर्षांची साधना, वैचारिक कटिबद्धता, सर्वस्व झोकून काम करण्याची तयारी या गुणांमुळे व्यक्तीचे सामर्थ्य वाढत राहते. नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे या गुणांव्यतिरिक्त सर्वसमावेशकता, गुणग्राहकता यांची अलौकिक दैवी देणगी असल्याचा अनुभव आम्हाला गेल्या अनेक वर्षांत येत राहिला.
सिग्नल शाळेची दोन मुले जेव्हा दहावी पास झाली, तेव्हा साहेबांनी व्यक्तीश: या मुलांना आनंदाश्रमात बोलवून त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याची घोषणा केली. लाखो मुलांचा दहावीचा निकाल त्या दिवशी लागलेला. मात्र, नामदार शिंदे यांच्यातील गुणग्राहकता आणि त्यांच्यातील अंत्योदयाची प्रेरणा किती जाज्वल्य आहे, याचे द्योतक म्हणजे साहेबांनी सिग्नल शाळेच्या मुलांवर केलेली निरपेक्ष माया होय. खा. श्रीकांत शिंदे यांच्या लग्नाच्यावेळी फक्त सिग्नल शाळेच्या मुलांसाठी शिंदेसाहेबांनी वेगळा स्वागत समारंभ ठेवलेला व शिंदेसाहेबांनी स्वतः मुलांसोबत भोजन केले. हा स्नेह संस्था कधीच विसरू शकत नाही.
‘अरे’ ती आपली संस्था आहे, आपली माणसं आहेत, चांगलं काम करतात, त्यांच काम हे समाजासाठीचे आहे, त्यांना लागेल ती मदत करत राहायला हवी, असे प्रत्येक चर्चेच्यावेळी म्हणतात आणि आम्हाला आपलेसे करून लढण्याचे, काम करण्याचे बळ देतात.
राजकारणातील नामदार एकनाथ शिंदेंपेक्षा राजकारणाच्याही पलीकडे असलेले नामदार एकनाथ शिंदे ज्यांनी ज्यांनी अनुभवले, त्यांनी त्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या वाट्याला राजकारणी एकनाथ शिंदे कधीच आले नाही. आमच्यासाठी ते नेहमीच पालक, हितचिंतक असेच राहिले. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ कार्यालयाचे उद्घाटन जेव्हा झाले तेव्हा ते मंत्री होते आणि व्यासपीठावरच्या प्रेमापोटी कार्यालयाच्या बाहेर पदपथावर टाकलेल्या दहा बाय दहाच्या मंडपात संपन्न झालेल्या कार्यक्रमातही ते मनापासून सहभागी झाले. ‘ठाणे निर्धार परिषद’, ‘वेन्डेक्स’, ‘ती महोत्सव’, ‘ग्रीन आयडिया’ प्रदर्शनसारख्या ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या असंख्य कार्यक्रमांचे शिंदेसाहेब पाठीराखे राहिले.
महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व असताना श्रेयवादाच्या जाणिवेचा स्पर्शदेखील नामदार एकनाथ शिंदे यांनी ‘समर्थ’च्या बाबतीत जाणवू दिला नाही. त्यांच्या प्रती आम्हाला असलेला आदर त्यांना मनोमन ठाऊक असल्याने कधी कार्यबाहुल्यामुळे उद्घाटक म्हणून येता आले नाही, तर हमखास वेळ काढून नामदार एकनाथ शिंदे कार्यक्रमाला आर्शीवाद देण्यासाठी येत असत. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ आणि नामदार एकनाथ शिंदे यांचे नातं औपचारिकतेच्या पलीकडे वृद्धिंगत होत गेले. हरित कचरा व सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्पांना नामदार शिंदे यांचा पाठिंबा कायम मिळत राहिला. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ आर्थिक अपेक्षेने नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे कधीही गेली नाही. याचा आवर्जून उल्लेख करत, प्रत्येक वेळी ते आमच्यात आत्मविश्वास भरत राहण्याचे काम करत राहिले. ‘समर्थ भारत व्यासपीठ, ठाणे’ यांचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी व नामदार एकनाथ शिंदे यांचे गुरू-शिष्यासारखे संबंध होते. ते पुढेही तसेच वृद्धिंगत होत गेले. सध्याचे संचालक अजय जोशी, उल्हास कार्ले यांच्यासह ‘समर्थ’च्या सगळ्या कार्यकर्ते, हितचिंतक शहर हिताच्या दृष्टीने सामूहिक वाटचाल करण्यात नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा नेहमीच लाभ होत असतो.
आज ते मुख्यमंत्री झाले हा ठाण्याचा, महाराष्ट्राचा आणि जनसामान्यांतील प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचा गौरव आहे. हा गौरव असाच वृद्धिंगत होत राहावा, अशा आमच्या शुभेच्छा! माणसांवर प्रेम करत राहिले तर ते तुमच्यावर करत राहतात, तुमच्या सुख-दुःखात पहाडासारखे तुमच्यामागे प्रत्येक कसोटीच्या क्षणी उभे राहतात. हा अनुभव आज नामदार एकनाथराव शिंदे घेत आहेत. व्यापक हिताच्या दृष्टीने आमच्यासारख्या तमाम संस्था त्यांच्या राष्ट्रहिताच्या प्रत्येक संघर्षांत कायम सोबत राहतील, यात शंकाच नाही.
जय हिंद, वंदे मातरम्