हत्ती आणि कार्बन शोषण

07 Feb 2023 11:31:13
 
Elephant
 
जमिनीवरील सर्वांत मोठा सस्तन प्राणी म्हणून हत्तीची ओळख. जगातील सात खंडांपैकी दक्षिण आफ्रिका या खंडात या हत्तींचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. दक्षिण आफ्रिकेतील जंगल हे जगातील दुसरे मोठे वर्षावन आहे. त्याचे संवर्धन करायचे असेल, तर हत्तींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे अलीकडेच काही अहवालांतून स्पष्ट झाले आहे. तेव्हा, यानिमित्ताने या अहवालाच्या खोलात जाण्याआधी हत्ती आणि त्यांच्या अधिवासाविषयी थोडी माहिती अधिक जाणून घेऊया.
 
हत्ती हे प्राणी जंगलनिर्मितीमध्ये मोठा हातभार लावत असतात. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या सवयींनुसार, हत्ती छोटी झाडे, वनस्पती मुळासकट उपटून खातो. यामुळे जंगलात असणार्‍या इतर मोठ्या वृक्षांना सूर्यप्रकाश व इतर महत्त्वाचे नैसर्गिक घटक चांगल्या प्रमाणात मिळतात आणि त्यांची वाढ चांगली होते. तसेच , हत्तीने खाल्लेल्या फळांचे पूर्ण पचन होत नाही आणि त्यांच्या विष्ठेतून या बिया जंगलात इतरत्र पसरून त्याची झाडे उगवतात. यामुळे हत्ती हा प्राणी जंगल संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.जंगले, वर्षावने वाचवणे हे वातावरणातील हवामान बदलाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
 
आधीच धोक्याच्या क्षेत्रात असलेले हत्ती नामशेष झाले, तर दक्षिण आफ्रिकेतील जंगलांमधील कार्बन शोषण्याचे प्रमाण सहा ते नऊ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. संशोधकांनी दिलेल्या अहवालानुसार, वातावरणातील अधिक कार्बन साठवण्यासाठी आणि आफ्रिकेतील जंगलांची जैवविधता राखण्यासाठी हत्तींचा महत्त्वाचा वाटा आहे. सेंट लुई विद्यापीठाने हत्ती आणि कार्बनवरील हा अहवाल दिला आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे जंगलांची कार्बन शोषणाची क्षमता घटल्याने ग्रहांचे तापमान वाढेल, असे सांगितले आहे.
 
जंगलात, काही झाडांना हलके लाकूड (कमी कार्बन घनतेची झाडे) असतात, तर काही जड लाकूड (उच्च कार्बन घनतेची झाडे) असतात. कमी कार्बन घनतेची झाडे त्वरित वाढतात, सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी इतर वनस्पती आणि झाडांच्या वरती वाढतात. दरम्यान, उच्च कार्बन घनतेची झाडे हळूहळू वाढतात, कमी सूर्यप्रकाशाची गरज असते आणि सावलीत वाढण्यास सक्षम असतात. हत्ती आणि इतर महाभक्षक प्राणी कमी कार्बन घनतेच्या झाडांना जास्त प्रमाणात आहार देऊन या झाडांच्या विपुलतेवर परिणाम करतात. जे जास्त कार्बन घनतेच्या प्रजातींपेक्षा अधिक रुचकर आणि पौष्टिक असतात. यामुळे, झाडांमधील स्पर्धा कमी होते आणि जास्त प्रकाश, जागा आणि मातीची पोषक द्रव्ये जास्त कार्बनयुक्त झाडे वाढण्यास मदत करतात.
 
हत्ती हे उच्च कार्बन घनतेच्या झाडांच्या बिया उत्कृष्ट विखुरणारे प्राणीदेखील आहेत. ही झाडे अनेकदा मोठी पौष्टिक फळे देतात, जे हत्ती खातात. त्या बिया हत्तींच्या आतड्यांमधून सहजपणे जातात आणि शेणातून बाहेर पडल्यावर ते उगवतात आणि जंगलातील काही सर्वांत मोठ्या झाडांमध्ये वाढतात. उच्च कार्बन घनतेची झाडे कमी कार्बन घनतेच्या झाडांपेक्षा वातावरणातील जास्त कार्बन त्यांच्या फांद्यांमध्ये साठवतात, ज्यामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चा सामना करण्यास मदत होते. याचप्रकारे आशियाई हत्ती, इतर उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये उच्च कार्बन घनतेच्या झाडांच्या वाढीस हातभार लावू शकतात.
 
जागतिक वातावरणाच्या समतोलाच्या प्रक्रियेमध्ये वन हत्तींची भूमिका हा प्रश्न दुर्लक्षित करण्याजोगा नक्कीच नाही. कार्बन शोषणासाठी आवश्यक असलेले उच्च घनतेची झाडे वाढवणे, पर्यायाने जंगल वाढवणे आणि त्यासाठी हत्तीचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. जंगलांच्या नाशामुळे इतर जैवविविधतेतील घटकांनाही त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. आफ्रिकन हत्तीप्रमाणे आशियाई हत्तींवर अभ्यास करून त्यांचे संवर्धन करणे ही गरजेचे आहे. जेणेकरून, जंगलनिर्मिती प्रक्रियेत मोठा वाटा उचलणार्‍या हत्तींना वाचवून वातावरण बदलाचा समतोल राखला जाईल.
 
 
Powered By Sangraha 9.0