आदिवासींना ‘हिंदू’ म्हटल्याने योगिता साळवींना धमक्या

05 Feb 2023 19:19:16
 
Yogita Salvi
 
मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना दि. 28 जानेवारीपासून अज्ञात दूरध्वनी क्रमांकावरून तसेच व्हॉटसअ‍ॅप संदेशावरूनही धमकी देण्यात येत होती. त्यानंतर फोन आणि व्हॉटसअ‍ॅपवरून संदेश पाठवणार्‍या चार व्यक्तींविरोधात शनिवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावेळी योगिता साळवी यांच्यासोबत त्यांना कायदेशीर सहकार्य करणारे अ‍ॅड. मदन गुप्ता उपस्थित होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माणसं’ हे एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये दि. 17 जानेवारी रोजी वारली समाजबांधव नरेश मराड यांच्यावर साळवी यांनी ‘रग रग हिंदू मेरा परिचय’हा लेख लिहिला होता.
 
या लेखाखाली योगिता साळवी यांचा मोबाईल क्रमांक नमूद होता. काही अज्ञात लोकांनी हा नंबर अनेकांना पाठवला. त्यानंतर 28 जानेवारीपासून साळवी यांना अनेक अज्ञात व्यक्तींकडून फोन आणि व्हॉटसअ‍ॅप मेसेज यायला सुरुवात झाली. त्यामध्ये वारली व्यक्तीला हिंदू का म्हटले? तसेच आदिवासींना वनवासी का म्हटले, असे म्हणत धमकी दिली जात होती. तसेच, व्हॉटसअ‍ॅप संदेशामध्ये हिंदू धर्माबद्दल अतिशय हिणकस शब्दात लिहिलेले लेख पाठवले गेले.
 
एकाने हिंदू म्हणजे ‘गालीगलोच’ असा अर्थ असून शंकर आणि लिंग याबाबतचे काही आपत्तीजनक शब्द असलेला लेख पाठवला, तर विविध संघटनांचा दाखला देत दोन व्हॉटसअ‍ॅप संदेशांमध्ये लिहिले की, आदिवासींना वनवासी आणि हिंदू म्हटले म्हणून तुम्ही तत्काळ आमच्या समाजाची माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. सातत्याने येत असलेले धमकीवजा व्हॉटसअ‍ॅप संदेश आणि हिंदू समाजाविरोधातले लेख वाचून धार्मिक भावना दुखत असल्याने शेवटी उपसंपादिका साळवी यांनी फोन आणि संदेश पाठवणार्‍या चार जणांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
Powered By Sangraha 9.0