‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित झाल्यानंतर माझ्या मनात उठलेले हे सगळे भावतरंग आहेत. आज माझे वडील हयात असते, तर संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना आकाश ठेंगणे झाले असते. माझ्या थोरल्या बंधूंनादेखील खूप खूप आनंद झाला असता. अशा सर्व ज्ञात-अज्ञात, कार्यकर्ते माझ्यावर खूप खूप प्रेम करणारे यांच्या चरणी हा पुरस्कार मी अर्पित करतो.
पूर्वनिर्धारित कार्यक्रमासाठी २५ जानेवारीला मी गोव्याला चाललो होतो. विमानतळाच्या प्रवासात असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयातून मला फोन आला की, ‘पद्म’ पुरस्कार यादी सायंकाळी जाहीर होईल, त्यात तुमचेही नाव आहे. तुम्ही पुरस्कार स्वीकारणार का, मी त्यांना म्हटले ,“जरूर, स्वीकारेन.” त्यांनी फोनवर मला जे सांगितले ते मी सर्वप्रथम माझ्या पत्नीला आणि छोट्या मुलीला कळविले. ‘पद्म’ पुरस्कार हा व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनातील खूप आनंदाचा विषय असल्यामुळे सर्वांना आनंद झाला, हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.या आनंदात मी मात्र आत्ममग्न झालो. गुंदवलीतील झोपट्टीतील घर ते ‘पद्मश्री’, फ्रॉम ‘नोबडी टू समबडी’ हा माझा प्रवास मी पाहत राहिलो आणि सर्वप्रथम मला आठवण झाली ती माझ्या आईची. तिने मला लिहायला आणि वाचयला शिकविले आणि त्यानंतर मन:चक्षुसमोर एकेक चेहरे यायला लागले.
गुंदवलीतील आमचे शेजारी होते, प्रभाकर खणगण. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. तेव्हा मी अकरावीत होतो. त्यांच्या पत्नीला आम्ही वहिनी म्हणतो. या माऊलीने मला प्रेमाने अकरावीची परीक्षा होईपर्यंत दुपारी जेऊ घातले. त्यांची सांपत्तिक परिस्थिती आमच्यापेक्षा किंचित बरी. पण, भावनिक नाते असे काही निर्माण झाले की, त्या ब्राह्मण- पुरोहित कुटुंबातील, मी शिंपी हा जातीभेद रसातळाला गेला. ‘समरसता’ हा शब्दप्रयोग येण्यापूर्वीच समरसतेचे भोजन त्या माऊलीने मला ममतेने भरविले. त्या आज हयात आहेत, मी त्यांना भेटायला चेंबूरला गेलो. त्या आता मुलाकडे असतात. त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
असेच दुसरे नाव आले ते म्हणजे अंधेरीतील माझ्या शाखेचे शिक्षक चंद्रकात दिवाकर, तेही ब्राह्मण, पुणेरी ब्राह्मण. मी शाखेतील त्यांचा फार लाडका स्वयंसेवक होतो. माझ्यावर खोलवरचे संघ संस्कार त्यांनी बालवयातच केले. समग्र हिंदू समाज आपला आहे, ही भावना ते स्वतः जगतच होते आणि आम्हाला ती कशी जगायची, हे शिकवत होते. पुढे मी मोठा झालो. तारुण्यात पदार्पण केले. त्यावेळी पार्ले नगराचे कार्यवाह महेंद्र शृंगी यांचा सहवास घडला. त्यांनी माझ्यात काय पाहिले माहीत नाही. संघकामाच्या जबाबदार्या त्यांनी माझ्यावर टाकल्या आणि जबाबदार्या पेलतापेलताच मी प्रौढ होत गेलो. आणीबाणीत कारागृहात गेलो. ते महेंद्र शृंगी आज हयात नाहीत. परंतु, त्यांच्या आठवणीने मन आज व्याकूळ होते.
मला संघकामासाठी भरपूर वेळ मिळावा. घरच्या आर्थिक विंवचनेत मी गुरफटू नये, म्हणून पार्ल्याचेच वसंतराव देव यांनी दर महिन्याला ठरावीक रक्कम माझ्या घरी पाठविण्यास सुरुवात केली. रक्कम पाठविण्याची तारीख त्यांनी कधी चुकवली नाही किंवा मी काही महान त्याग करतो आहे, असे त्यांनी चुकूनही जाणवू दिलं नाही. डोंबिवलीला त्यांचा कारखाना आहे आजही आहे. परंतु, वसंतराव आज हयात नाही. रमेशला ‘पद्मश्री’मिळाल्याचा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला किती आनंद झाला असता, हे शब्दात सांगणे फार अवघड आहे.
ठाणे कारागृहात हिमालयाची शिखरे ठरावीत, असे पांडुरंगपंत क्षीरसागर, बाबासाहेब घटाटे आणि रामभाऊ बोंडाळे यांच्यासारखी ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळी होती. त्यांचा सहवास हा माझ्या जीवनातील सुवर्णकाळ आहे. या तिघांचीही उंची शब्दाने मोजणे अशक्य आहे. संघभाव कसा जगायचा, समर्पण म्हणजे काय, सर्व भूतमात्रांविषयी प्रेमभावना कशी ठेवायची, निरहंकारी असणे म्हणजे काय, या सर्वांचे ते चालतेबोलते आदर्श होते. पुढे आयुष्यात संघकार्य करीत असताना असंख्य कार्यकर्त्यांशी संबंध येत गेले. काही कर्तृत्वाने मोठे, काही बुद्धीने मोठे, काही वकृत्वाने मोठे, काही संघटन कौशल्याने मोठे. परंतु, अशांपैकी अनेकांच्या जवळ गेल्यानंतर त्यांचे मातीचे पाय दिसायला लागतात. अशा वेळी मानसिक धक्के बसतात आणि मग ही हिमालयाची शिखरे आठवतात.
आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे, हे बुद्धी, मनाला सांगते आणि मग कार्यात चित्त स्थिर होतं. अशी नावांची संख्या खूपच मोठी आहे. भाई मयेकर, प्रभाकरपंत गायतोंडे, काका दामले, भास्करराव मुंडले, भाऊराव बेलवलकर, मधुकरराव मोघे, डॉ. परळकर, ही तर अशी नावे आहेत की, ज्यांच्या संघसमर्पणावर अनेक ‘पद्मश्री’ ओवाळून टाकाव्यात. समाजाच्या दृष्टीने ते अनामिक आहे. मला मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा माझ्या एकट्याच्या कर्तृत्वाचा मुळीच नाही. हा पुरस्कार अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या समाज समर्पणाला शासनाने दिलेली पोचपावती आहे. संघ प्रवासात येथे संघ म्हणजे समरसता मंच, ‘भटके-विमुक्त विकास परिषद’, ‘विवेक’ आणि अनेक अनुषांगिक कामे असा अर्थ केला, तर हजारो घरांशी संपर्क आला. किती माता-भगिनींनी मला प्रेमाने आणि आग्रहाने जेऊ घातले असेल, याची मोजदाद करणे कठीण आहे. त्या सर्वांनी भरविलेल्या ममतेच्या घासाला मिळालेला हा पुरस्कार आहे, असे मी मानतो.
संसारी माणूस एकटा काही करू शकत नाही. त्याला पत्नीची फार उत्तम साथ असावी लागते. सार्वजनिक कार्य म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकर्या भाजण्याचे काम असते आणि या कामात पत्नीची साथ नसेल, तर सार्वजनिक काम सोडून द्यावे लागते. माझ्या जीवनात तसा प्रसंग आला नाही. अत्यंत सुखवस्तू परिवारात जन्मूनदेखील माझ्याबरोबर माझी पत्नी मधुरा हिने मिळालेल्या उत्पन्नात संसार केला. तिन्ही मुलींचे उत्तम संगोपन केले. त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. या मुली आता कारखानदार झालेल्या आहेत. माझे लेखन, वाचन, मनन, चिंतन, याला माझ्या पत्नीने आणि मुलीने सर्व प्रकारे साह्य केले. मला लागणारी पुस्तके माझी सर्वांत लहान मुलगी पल्लवी हिने ‘अॅमेझॉन’वरून उपलब्ध करून दिली. ‘विचारवंत’ म्हणून लोक माझा परिचय करून देतात. पण, संघातील स्वयंसेवक ‘विचारवंत’ कसा होतो, त्यामागे न दिसणारे किती हजारो चेहरे असतात, हे परिचय करून देणार्याला माहीत नसतं. या पुरस्कारत त्यांचे देखील फार मोठे श्रेय आहे.
‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित झाल्यानंतर माझ्या मनात उठलेले हे सगळे भावतरंग आहेत. आज माझे वडील हयात असते, तर संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना आकाश ठेंगणे झाले असते. माझ्या थोरल्या बंधूंनादेखील खूप खूप आनंद झाला असता. अशा सर्व ज्ञात-अज्ञात, कार्यकर्ते माझ्यावर खूप खूप प्रेम करणारे यांच्या चरणी हा पुरस्कार मी अर्पित करतो.