‘सीए’ची गरज कोणाला?

03 Feb 2023 14:26:40
Who needs 'CA'?

प्राप्तिकर संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी सध्या लगबग पाहायला मिळते. नोकरदारांनी त्यांचा प्राप्तिकर वाचावा, प्राप्तिकर सवलत मिळाली म्हणून जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचे पुरावे नोकरीच्या ठिकाणी देण्याचा हा कालावधी आहे. काही कर भरायला लागणारे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलनंतर योग्य गुंतवणूक कुठे करायची याचे नियोजन करतात, तर काही घाईघाईत शेवटच्या घटकेला गुंतवणूक करतात. परिणामी, गुंतवणुकीचे निर्णय चुकीचेही ठरू शकतात. निर्णय चुकीचे ठरू नयेत, योग्य ठिकाणीच गुंतवणूक व्हावी, म्हणून वित्तीय सल्लागार, कर सल्लागार किंवा ‘सीए’ (चार्टर्ड अकाऊंटंट) यांची मदत घेता येते. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया...

कित्येक जण कर किती भरावा लागणार, किती वाचू शकणार, कर वाचविण्यासाठी कुठल्या सवलती घ्यायच्या व शेवटी ‘रिटर्न’ फाईल करणे, ही कामे स्वतःच करतात. तुमच्या रिटर्न फायलिंगची प्रक्रिया सोपी असेल व तुम्हाला प्राप्तिकर कायद्याचे व्यवस्थित ज्ञान असेल, तर अशांनी स्वतः रिटर्न फाईल करावा. एखाद्याला बर्‍याच मार्गांनी उत्पन्न मिळत असेल, विविध मालमत्ता असतील, कॅपिटल गेन्स किंवा ‘लॉस’ यांचे व्यवहार असतील, तर करविषयक आर्थिक नियोजनासाठी तसेच रिटर्न फाईल करण्यासाठी ‘सीए’ची मदत घेता येईल.

‘सीए’ कधी हवा?
एखाद्याच्या उत्पन्नाचे मार्ग बरेच असतील ते म्हणजे- पगार, मिळणारे भाडे, कॅपिटल गेन्स, मिळणारा/मिळणारे लाभांश, वेगवेगळ्या मालमत्तातून अल्प मुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे झालेले ‘कॅपिटल गेन्स/लॉस’, त्या आर्थिक वर्षांत संपत्तीची विक्री किंवा खरेदी झाली असल्यास वर्षभर सतत शेअर बाजारात व्यवहार होत असतील, तर परदेशात मालमत्ता असल्यास किंवा परदेशातून उत्पन्न मिळत असल्यास एडजझ संबंधित करविषयक प्रकरण असल्यास, ज्ञात नसणार्‍यांकडून भेटी मिळालेल्या असल्यास, प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आली असल्यास, तसेच करधारक, सल्लागार किंवा फ्रिलान्सर म्हणून काम करीत असल्यास अशांनी ‘सीए’ची मदत घ्यावी. वर उल्लेखलेल्या बाबी सामान्य माणूस स्वतःहून हाताळू शकणार नाही.
योग्य ‘सीए’ कसा निवडावा?
सर्वप्रथम यासाठी आपल्या मित्रांना किंवा नातलगांमध्ये विचारणा करावी. यातून चांगला ‘सीए’ मिळू शकतो. वित्तीय सल्लागाराशी संपर्क साधून त्याच्याकडून माहिती घ्यावी.बर्‍याच वर्तमानपत्रांत ‘सीए’ लेखन करतात. ते लेख वाचावेतव त्या लेखात लिहिलेला मजकूर तुमच्या आर्थिक व्यवहारांशी मिळताजुळता वाटत असेल, तर अशा ‘सीए’ची निवड करता येईल. ‘सीए’चे इतर ग्राहकही तुमच्यासारखेच असल्यास त्या ‘सीए’चा विचार करण्यास हरकत नाही. कोणताही ‘सीए’हा सर्व विषयांतील सर्व ज्ञानी नसतो, हेही लक्षात ठेवावे.
‘सीए’साठींचा साधारण खर्च
प्राप्तिकर रिटर्न फायलिंगचे काम करून दिल्यास प्रत्येक करधारकामागे ‘सीए’ साधारणपणे रुपये १५०० ते रुपये चार हजार इतके शुल्क आकारतात. छोट्या शहरांत, छोट्या ‘सीए’ कंपन्या याहून कमी शुल्क आकारतात. व्हिडिओ कॉलवर ‘सीए’ला जर करदात्याने काही शंका विचारल्यास, ३५ ते ४० मिनिटांच्या सल्ल्यासाठी/व्हिडिओ कॉल संभाषणासाठी ‘सीए’ रुपये एक हजार ते दोन हजार रुपये इतके शुल्क आकारतात. करविषयक सल्ले व फायलिंग रिटर्न यासाठी वर्षाला ‘सीए’ दहा हजार ते ३० हजार रुपये इतके शुल्क आकारतात. हे शुल्क दर पगारदारांसाठी आहेत. ‘सीए’ला करविषयक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतल्यास, शंकेप्रमाणे ‘सीए’ उत्तर देण्याचे शुल्कही आकारतात.

करदात्यांना प्राप्तिकर कायद्यातील सर्व तरतुदी माहिती नसतात. प्राप्तिकर कायद्याचा तेवढा अद्ययावत अभ्यासही नसतो. अशावेळी ‘सीए’चीच साहजिकच मदत घ्यावी लागते. उदाहरण द्यायचे तर ‘कॅपिटल गेन्स’वर ‘अ‍ॅडव्हान्स’ कर भरावा लागतो. तो जर भरला नाही, तर व्याज आकारले जाते. बँका ठेवींवरील व्याजावर ‘टीडीएस’ (टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स-मूलस्रोत कर कपात) दहा टक्के कापतात. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे व ज्यांना करआकारणी वरच्या ब्रॅकेटनुसार होते, अशांनी ‘अ‍ॅडव्हान्स टॅक्स’ भरावयास हवा, नाहीतर व्याज आकारले जाते. वरिष्ठ नागरिकांना ‘अ‍ॅडव्हान्स टॅक्स’ भरावा लागत नाही. त्यांना कायद्यात तशी सूट देण्यात आलेली आहे. एडजझ व्यवहारांत दोनदा कर भरावा लागतो. प्रवेश करताना तसेच विकताना. एडजझ जर भारतातील ‘लिस्टेड’ कंपनीची नसेल, तर ती परदेशीमालमत्ता गणली जाते व प्राप्तिकर रिटर्नमध्ये नमूद करावे लागते, अशा प्रकारची एडजझ विकली नसेल, ‘होल्ड’ असेल तरी प्राप्तिकर रिटर्नमध्ये समाविष्ट करावी लागते.

\सोने, शेअर, प्रॉपर्टी यांचे अल्प मुदतीचे किंवा रिटर्न मुदतीचे कॅपिटल गेन्स/लॉन्स यांची मोजणी करणे थोडेसे कीचकट स्वरूपाचे काम असते. या अशा व्यवहारांसाठी ‘सीए’ची गरज घेणे योग्य. बरेच करदाते नातलगांच्या किंवा मित्रांच्या शिफारशींनुसार ‘सीए’ निवडतात. ‘सीए’ कधीही बदलण्याचा निर्णय करदाता घेऊ शकतो. ‘सीए’ची निवड शक्यतो ऑनलाईन करू नये. करदाता म्युच्युअल फंड वगैरेंनी गुंतवणूक वित्तीय सल्लागाराच्या मदतीने करतात. परिणामी, वित्तीय सल्लागार चांगल्या ‘सीए’चा पर्याय ठरवू शकतो. ‘सीए’ची निवड करण्यापूर्वी त्याच्याशी बोलावे व तुम्हाला‘सीए’ची गरज नेमकी कशासाठी आहे, ते त्याला सांगावे व जर तुम्हाला वाटले हा ‘सीए’ तुमच्या गरजेनुसार अनुरुप आहे, तरच त्याची निवड करावी.

तसेच ‘सीए’चे कार्यक्षेत्रही विचारात घ्यावे. समजा, ‘सीए’ किरकोळ दुकान मालक किंवा छोटे उत्पादक यांची कामे प्रामुख्याने करीत असेल, त्याच्यांकडे या ग्राहकांची संख्या जास्त असेल, तर पगारदारांनी असा ‘सीए’ निवडताना तो यासाठी किती फी आकारणार आहे, हे निश्चित विचारावे.खिशाला परवडणार्‍या ‘सीए’चीच निवड करावी. या देशात डॉक्टर,वकील, ‘सीए’ अन्य स्वतंत्र व्यावसायिक यांनी किती फी आकारावी, याबाबतचे नियम नाहीत व अशा बर्‍याच व्यक्ती त्यांचे खरे उत्पन्न जाहीर न करता प्राप्तिकर कमी भरतात, असे बर्‍याच भारतीयांचे त्यांच्याबद्दलचे मत आहे.करदात्याच्या कर विषयक प्रश्नांचे निरसन, कर वाचचिण्यासाठीचा सल्ला व त्यासाठी कुठे गुंतवणूक करायची, याचे मार्गदर्शन करदात्याच्या उत्पन्नाचा आर्थिक आढावा, अडचणीचे किंवा किचकट आर्थिक व्यवहार या बाबींसाठी ‘सीए’ हवा.

ज्यांना करसल्ला ऑनलाईन हवा असेल, तर ही सेवा पुरविणार्‍या ‘क्लिअर’, ‘इंडिया फायलिंग्ज’, ‘वकिलसर्च’ व अन्य काही कंपन्या आहेत. ‘क्लिअर’ ही ‘रजिस्टर ई-रिटर्न इंटरमिजीअरी’ कंपनी आहे. ‘क्लिअर पोर्टल’ वर लॉग-ईन करून या कंपनीच्या सेवा घेता येतात. ही कंपनी करदात्यांना रिटर्न फाईल कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन ऑनलाईन करते. या सेवा सशुल्क आहेत. बर्‍याच जणांच्या मते, साधा प्राप्तिकर रिटर्न फाईल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया योग्य, तर गुंतागुंतीच्या व्यवहारांसाठी ऑफलाईन प्रक्रियाच चांगली. करभरणा हे वैयक्तिक आहे. त्यामुळे ‘सीए’हवा की नको, हे प्रत्येकाने स्वत: ठरवावे. कोणता ‘सीए’ चांगला, हेही स्वत:च काळजीपूर्वक ठरवावे.

भारतील प्राप्तिकर कायदे अगोदरपासूनच बरेच क्लिष्ट आहेत व प्रत्येक केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताना यात बदल होत असतात. त्यामुळे भारतीय राज्यघटना व भारतीय प्राप्तिकर कायदे यांना वकिलांचे नंदनवन असे म्हटले जाते. त्यामुळे बहुतेकांना ‘सीए’ची मदत घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही. प्राप्तिकराच्या नोटिसांना मुद्देसूद व योग्य उत्तर देणे तितकेसे सोपे नसते. परिणामी ‘सीए’ची सेवा फायदेशीर ठरू शकते.




Powered By Sangraha 9.0