मुंबई : ”राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात पोलीस आणि यंत्रणा हाताशी धरून माझ्यावर अन्याय केला हे उघड आहे. मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन सर्वसामान्य नागरिकाला मारहाण केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून महाराष्ट्रातील विद्यमान राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालय आता मला न्याय देईल,” अशी अपेक्षा याचिकाकर्ते अनंत करमुसे यांनी व्यक्त केली आहे.
अनंत करमुसे यांनी सोमवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या तीन वर्षांच्या काळात आपल्यावर विविध प्रकारचे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपण ते झुगारून पुढे आलो ते सर्वसामान्यांच्या पाठबळानेच हेही त्यांनी नमूद केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती तत्कालीन परिस्थितीत कशी होती, हे या घटनेवरुन उघड झाल्याचेही ते म्हणाले.
मला जीवे मारण्याचा आव्हाडांचा प्रयत्न
आव्हाडांच्या बंगल्यावर झालेल्या प्रकारावर बोलताना ते म्हणाले की, ”५ एप्रिल २०२० च्या रात्री पोलिस मला माझ्या घरातून उचलून घेऊन गेले आणि आव्हाडांच्या बंगल्यावर मला बेदम मारहाण करण्यात आली. मला ही जीवघेणी मारहाण होत असताना स्वतः मंत्री जितेंद्र आव्हाड हा सगळा प्रकार बघत होते. या मारहाणीत मी दोन वेळा बेशुद्ध झालो. मात्र, मला शुद्धीवर आणून त्यानंतरही मारहाण करण्यात आली. लाठ्या-काठ्या, फायबर काठ्या आणि अशा अनेक हत्यारांनी माझ्यावर हल्ले करण्यात आले. त्यावेळी हे प्रकरण इथेच मिटवण्याची विनंतीही मी आव्हाडांना केली होती. मात्र, बळजबरी करत माझ्याकडून माफी मागत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेण्यात आला आणि त्यानंतर मला पोलिसात देण्यात आले. वास्तविक त्या रात्री मला जीवे मारण्याचा आव्हाडांचा प्रयत्न होता,” असा गंभीर आरोप करमुसे यांनी केला आहे.
आरोपींना सोडण्यासाठी आव्हाडांकडून प्रयत्न
”जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या हाताखालील गुंड आणि तत्कालीन परिस्थितीत त्यांच्या तैनातीत असलेल्या पोलिसांनी मला मारहाण केली हे कालांतराने पुराव्यानिशी सिद्ध झाले. त्यावेळी संबंधित आरोपींना जामीन मिळावा आणि त्यांची सुटका व्हावी यासाठी आव्हाडांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. ऐन कोरोनाच्या काळात जेव्हा वैद्यकीय चाचण्याचे अहवाल येण्यासाठी काही दिवस लागत असताना आरोपींच्या कोरोना टेस्टचे निकाल ताबडतोब देण्यात आले. गंभीर बाब म्हणजे या आरोपींना जामीन मिळण्यासाठी संबंधितांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात यावे, अशी शिफारस जितेंद्र आव्हाड यांनी आपण स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून केली होती. त्यामुळे आरोपींना सोडवण्यासाठी आणि न्याय मिळण्यात विलंब व्हावा यासाठी आव्हाडांकडून अनेक प्रयत्न झाले,” असा दावाही करमुसे यांनी केला आहे.