शहरी विकासाचा ‘रॅपिड’ मार्ग

28 Feb 2023 18:21:44
'Rapid Rail' way of urban development


महानगरकेंद्रित विकासाचे मॉडेल आज भारतात प्रस्थापित झालेले दिसते. मोठ्या महानगरांभोवती असलेल्या ‘टिअर टू’ किंवा ‘टिअर थ्री’ शहरांमधील लोक रोजगारासाठी महानगरांकडे जातात. त्यासाठी रस्तेमार्गाऐवजी वेगवान रेल्वेचाच पर्याय हा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच दिल्ली - मेरठ या मार्गावर धावणारी ‘रॅपिड रेल्वे’ ही ‘गेमचेंजर’ ठरु शकते. त्याविषयी...


देशातील अनेक राज्यांमध्ये महत्त्वाच्या शहरात मेट्रोचे जाळे उभे राहिलेले सध्या दिसते. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास टाळून कमीत कमी वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे शक्य होत आहे. त्याचप्रमाणे आता दोन शहरांमधील अंतर कमीत कमी वेळेत पार करण्यासाठी ‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ अर्थात ‘आरआरटीएस’ प्रकल्प देशभरात राबविण्यात येणार आहेत. त्यातील पहिला प्रकल्प दिल्ली ते मेरठदरम्यान राबविण्यात येणार असून, त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अंतर अवघ्या ६० मिनिटांमध्ये कापणे आता शक्य होणार आहे.

देशाची राजधानी दिल्लीपासून १०५ किमी अंतरावर असलेल्या मेरठमधून दररोज हजारो लोक रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीत दाखल होतात. त्यासाठी दिल्ली-मेरठ या वेगवान द्रुतगती महामार्गाचा (एक्सप्रेस वे) वापर केला जातो. या महामार्गाद्वारे सध्या किमान दोन तास प्रवासासाठी लागतात. हा महामार्ग अतिशय प्रशस्त असल्याने अपवाद वगळता तेथे वाहतूककोंडीचा सामना सहसा करावा लागत नाही. मात्र, तरीदेखील दोन तासांचे अंतर कमी झाल्यास वेळ, पैसा आणि इंधन यांची नक्कीच बचत होणार आहे. त्यासाठी ‘आरआरटीएस’ प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.
 
‘आरआरटीएस’ प्रणालीमध्ये १८० किमी प्रतितास वेग असलेल्या रेल्वेगाड्या पाच ते दहा मिनिटांनी उपलब्ध असतील आणि एका तासात सुमारे १०० किमी अंतर कापतील. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ ‘आरआरटीएस कॉरिडोर’मुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. यामुळे राष्ट्रीय राजधानी परिसराचाही विस्तार होणार असून शाश्वत व संतुलित विकास होणार आहे. यामध्ये मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकेही परस्परांना जोडली जाणार आहेत. विशेष म्हणजे, १८० किमी प्रतितास वेग, १६० किमी प्रतितास ‘ऑपरेशनल स्पीड’ आणि १०० किमींच्या सरासरी वेगासह ’आरआरटीएस’ रेल्वे भारतातील आतापर्यंतची सर्वांत वेगवाने रेल्वे ठरणार आहे.

दिल्ली-गाझियाबाद-मेरठ या ८२.१५ किमी लांबीच्या ’आरआरटीएस कॉरिडोर’चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर दुहाई आणि मोदीपुरम येथील दोन डेपो आणि जंगपुरा येथे एक ‘स्टॅबलिंग यार्ड’सह एकूण २४ स्थानके असतील. प्रकल्पातील उन्नत मार्गिकेचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर सध्या ११०० हून अधिक अभियंते आणि १४ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी-कामगार कार्यरत आहे. त्याचप्रमाणे सराय काले खान, न्यू अशोक नगर, आनंद विहार, दिल्ली युपी बॉर्डर, साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई, मुरादनगर, मोदीनगर दक्षिण, मोदीनगर उत्तर, मेरठ दक्षिण, शताब्दी नगर, मेरठ मध्य, बेगमपुल, मेरठ उत्तर, मोदीपुरम असा ‘आरआरटीएस’चा मार्ग असणार आहे.

 
प्रकल्पाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे


- प्रकल्पाची लांबी : ८२.१५ किमी
 
- कमाल वेग १८० किमी प्रतितास
 
- प्रवासी दिल्लीहून मेरठला ६० मिनिटांत पोहोचू शकतील.
 
- या प्रकल्पाची अंदाजे किंमत ३०,२७४ कोटी रुपये आहे.

 
- दुहाई आणि मोदीपुरम येथील दोन डेपोसह २४ स्थानके.

 
- अ‍ॅर्गोनॉमिकली डिझाईन केलेले २ द २ ट्रान्सव्हर्स कुशन सीटिंग.
 
- उभे राहण्यासाठी विस्तृत जागा, सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा.

 
- ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे

- लॅपटॉप व मोबाईल चार्जिंग सुविधा.

- ’हिटिंग व्हेंटिलेशन’ आणि वातानुकूलन प्रणाली.

- महिलांसाठी आरक्षित डबा.

- प्रीमियम वर्गाचा एक डबा.

देशातील अनेक प्रमुख महानगरांमध्ये आसपासच्या म्हणजे किमान १०० किमी अंतरावरील छोट्या शहरातील लोक रोजगारासाठी येत असतात. त्यांच्यासाठी रस्तेमार्ग उपलब्ध आहेच. मात्र, ‘आरआरटीएस’मुळे महानगरे ते ‘टिअर टू’ आणि ‘टिअर थ्री’ शहरांमधील दळणवळण वेगवान करणे शक्य आहे. त्यामुळे छोट्या शहरांचा विकास होण्यासोबतच ‘आरआरटीएस’च्या मार्गावरही छोटे छोटे औद्योगिक केंद्रे उभारणे शक्य होणार आहे. असे झाल्यास विकासाचे विकेंद्रीकरण साध्य होणार आहे. त्यासाठी दिल्लीचे मॉडेल हे देशासाठी दिल्ली मेट्रोप्रमाणेच आदर्श ठरणार आहे. कारण, आगामी काळात दिल्ली-अलवर, दिल्ली-पानिपत, गाझियाबाद- खुर्जा, दिल्ली-रोहतक आणि गाझियाबाद -हापूड या मार्गांवरही ‘रॅपिड रेल्वे’ सुरू होणार आहे. त्यामुळे दिल्लीसोबत हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे दळणवळण अधिक वाढणार आहे. दिल्लीप्रमाणेच हा प्रयोग महाराष्ट्रातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कानपूर, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आदी शहरांमध्ये राबविल्यास त्याचा मोठा लाभ होऊ शकतो.


’रॅपिड रेल्वे’द्वारे १०० ते १५० किमी अंतरावरी शहरे जोडली जाणार आहे. त्याचप्रमाणे १०० किमींपेक्षा कमी अंतर असलेली शहरे जोडण्यासाठी ‘वंदे मेट्रो’चे जाळे उभारले जाणार आहे. त्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असून त्यासाठी युद्धपातळीवर काम केले जाणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. हा प्रकल्प शहरांतर्गत दळणवळणासाठीच्या मेट्रो प्रकल्पाचीच पुढची आवृत्ती असणार आहे. उदाहरणादाखल सांगायचे, तर दिल्लीमध्ये मेट्रोचे ३९०.१४ किमीचे जाळे आहे, ते लवकरच ५०० किमी होणार आहे. ‘दिल्ली मेट्रो’द्वारे संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिसर जोडला गेला आहे. दिल्ली मेट्रोद्वारे हरियाणातील गुरुग्राम, उत्तर प्रदेशातील नोएडा ही महत्त्वाची आणि साधारणपणे ४० किमीवर असणारी शहरे जोडली गेली आहेत. या जाळ्यास ‘वंदे मेट्रो’ची जोड मिळाल्यास दिल्लीपासून १०० किमीपर्यंत असणारी शहरे जोडून त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार आहे.




 
Powered By Sangraha 9.0