मुंबई : डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमाला हा कार्यक्रम शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या पाणिनी सभागृहात पार पडला. सदर व्याख्यानमालेचे हे छत्तीसावे पुष्प सुप्रसिद्ध गायिका व संगीतकार स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांच्या मार्फत गुंफले गेले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, सौ. सुमेधा बेडेकर, उपप्राचार्य डॉ. महेश पाटील हे उपस्थित होते. प्रा. मानसी जंगम यांनी स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांची मुलाखत घेतली.
डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेची समृद्ध परंपरा आणि त्यातून होणारे विचारमंथन याविषयी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी वक्तव्य केले. त्यानंतर सौ. सुमेधा बेडेकर यांनी डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. जनसंवाद व पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांर्थीनी गार्गी गोरेगावकर हिने कार्यक्रमाच्या अतिथी पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची ओळख करून दिली.
पद्मजा ताईंनी आपल्या आयुष्यातील अनेक विलक्षण आठवणींना या संवादातून उजाळा दिला. सदर कार्यक्रमत संवाद साधत असताना त्यांनी " संगीत हेच माझं अध्यात्म आणि संगीत हिच माझी प्रेरणा असे वक्तव्य केले. संवादा बरोबरच बालपणी गायलेल्या "केव्हातरी पहाटे, रूणु झुणु रे भ्रमरा, केव्हा तरी येतो वारा" या गीतातील ओळी गाउन त्यांनी हि मैफिल अधिक सुरेख केली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ,उपप्राचार्य व डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे प्रमुख डॉ. महेश पाटील व प्रा. मानसी जंगम व जनसंवाद व पत्रकारिता विभागाच्या स्वयंसेवकांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा.मानसी जंगम यांनी सदर कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.