लक्ष्मण यांचे क्रीडाकौशल्य

26 Feb 2023 19:55:16
Laxman Ingle

ठाणे जिल्ह्यात खेळाचा दर्जा प्राप्त झालेली पहिली महापालिका म्हणून कल्याण-डोंबिवलीचे नाव घेतले जाते. यासाठी योगदान देणारे आणि खेळाडूंच्या हक्कांसाठी लढणारे लक्ष्मण इंगळे यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा...


लक्ष्मण इंगळे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे बालपण डोंबिवलीत गेले. सुरूवातीला ते डोंबिवलीतील सागाव परिसरात राहत होते. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सागाव येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर ते स्टार कॉलनी या विभागात वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी सातवीपासूनचे शिक्षण रा. वि. नेरूरकर विद्यालयात घेण्यास सुरूवात केली. पेंढरकर महाविद्यालयातून त्यांनी बीए इतिहास या विषयात पदवी संपादन केली. महाविद्यालयीन जीवनातदेखील त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना म्हणजेच १९९१ साली त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेतून निवडून येण्याचा मान मिळाला होता. त्याकाळी निवडणूक पद्धतीने निवड केली जात होती.

लक्ष्मण यांचे वडील शंकर हे ‘टेक्सटाईल’ कंपनीत नोकरी करीत होते, तर आई अंजना या गृहिणी आहेत. त्यांचे आई-वडील कोल्हापूर येथे सध्या त्यांची शेती सांभाळत आहेत. लक्ष्मण यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. घरात लक्ष्मण हे थोरले आहेत. याशिवाय त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. लक्ष्मण यांना लहानपणापासूनच वेगवेगळी कामे करून आपले शिक्षण ही घ्यावे लागत होते. मात्र, त्यांनी शिक्षण कधीच सोडले नाही. पदवी संपादन केल्यानंतर ही त्यांनी नगर परिषदेत काम केले होते. लक्ष्मण हे मिळेल ते काम करीत होते. अगदी वह्या, फटाके विकण्यापासून त्यांनी कामे केली आहेत. त्यांना प्रा. शशिकांत देशमुख यांचे मोलाचा मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी बी.पी.एडचे शिक्षण १९९८ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर एमए. एम. पी. एड् हे शिक्षण देखील पूर्ण केले. लक्ष्मण यांचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर ते कधीच कोणत्या कामात माघार घेत नाहीत हे सांगता येईल.

 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयात त्यांना नोकरी मिळाली. प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक महाजन यांचे त्यांना चांगले सहकार्य मिळाले. याशिवाय माजीमंत्री नकुल पाटील आणि पुष्पलता पाटील यांनीदेखील त्यांना मदत केली. तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचेदेखील लक्ष्मण यांना वेळोवेळी सहकार्य लाभले. गेली १८ वर्षे क्रीडा संचालक म्हणून ते प्रगती महाविद्यालयात कार्यरत आहेत. याशिवाय बारावीच्या परीक्षेत गेल्या १८ वर्षापासून ‘प्रेस कंडक्टर’ म्हणून काम पाहात आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पॉवर आणि वेटलिफ्टींगमध्ये कमिटी सदस्य तसेच मुंबई विद्यापीठात २००१-०२ व २००२ते ०३ या काळात सॉफ्टबॉल संघव्यवस्थापक म्हणून काम पाहिले. २००४-०५ पासून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयात काम पाहत आहेत. याशिवाय त्यांनी कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ कल्याणचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा टेनिस हॉलीबॉल असो. ठाणे उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा ‘टी २०’ क्रिकेट असो.

ठाणे, ठाणे जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन, ठाणे, ठाणे जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन, चे सदस्य, ठाणे जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन, ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सदस्य म्हणून ही त्यांनी काम पाहत आहेत. कोरोना महामारीनंतर शालेय क्रीडा स्पर्धामध्ये खेळाडूंकरिता शुल्क कमी केले जात असताना ठाणे विभागात विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंचे शुल्क वाढवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू होता. त्यावरून गरीब व होतकरू खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे धोरण दिसत असताना डोंबिवलीतील सर्व क्रीडा शिक्षक एकत्र आले होते. त्यात लक्ष्मण यांचा देखील सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून गरजू व गरीब विद्याथ्र्याकरिता ते कार्य करीत आहेत. ते स्काऊट अ‍ॅड गाईड यांचे आजीव सभासद त्यातून वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेत असतात. कडोंमपा क्रीडा समिती सदस्य म्हणून लक्ष्मण यांचा विविध खेळांच्या आयोजन व नियोजनामध्ये सहभाग असतो. कल्याण तालुका शारीरीक शिक्षण शिक्षक मंडळांच्या माध्यमातून कोरोना काळात विनाअनुदानित व ज्या शिक्षकांना गरज होती अशांना क्रीडा शिक्षकांच्या व समाजातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मदत केली आहे.

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा यात त्यांनी मुलींच्या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. या मुलींच्या संघाची आता ‘खेलो इंडिया’साठी निवड झाली आहे. निलेश शिंदे, नितेश जोशी यासारख्या अनेक खेळाडू घडविण्यात लक्ष्मण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिकेला २००८ मध्ये खेळाचा दर्जा मिळावा यासाठी लक्ष्मण इंगळे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ठाणे जिल्हयातील खेळाचा दर्जा प्राप्त झालेली जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेला दर्जा प्राप्त झाला. त्यांच्या या कार्याची दखल सर्वत्र घेतली गेली. त्यातूनच लक्ष्मण यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणार्‍या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. मुंबई तरूण भारतकडून हार्दिक शुभेच्छा.


 
Powered By Sangraha 9.0