पदमभूषण कनक रेळेंनी घेतला अखेरचा श्वास, कलासृष्टी शोकसागरात बुडाली

22 Feb 2023 18:25:39
kanak rele 
 
मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८५ व्य वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि नृत्य सेवा थांबवली. मोहिनीअट्टम आणि कथकली या नृत्यप्रकारात त्या पारंगत होत्या. त्यांच्या नृत्य कारकिर्दीसाठी त्यांना पदमभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता.
 
१९६६ साली त्यांनी मुंबईत नालंदा डान्स अँड रीसर्च सेन्टर आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना केली. गरीब घरातल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी या संस्थांचं शुल्कही कमी ठेवलं होतं. कनक रेळे यांना पद्मभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आलं आहे.
 
डॉ. कनक रेळे 
डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरू पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत इ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.
 
नालंदा नृत्यकला महाविद्यालय
गरीब घरातल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्यासाठीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘नालंदा केंद्रा’चे शुल्कदेखील कमी ठेवले आहे. त्यामुळे आजही या संस्थेत आदिवासी भागातील कित्येक मुली नृत्याच्या प्रेमाखातर शिकण्यासाठी येतात. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुली ‘नालंदा’ मधून नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतात. या केंद्रात प्रशस्त अभ्यासिका व ग्रंथालयदेखील आहे. याव्यतिरिक्त या केंद्रात योगासनांचे व संस्कृतचे शिक्षणही दिले जाते. ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’स थेट भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून वैज्ञानिक व औद्यागिक संशोधन केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे.
 
’नालंदा’ ही नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी कनक रेळेंना खूप कष्ट करावे लागले. १९७२ साली मुंबई विद्यापीठात नृत्यासाठीर स्वतंत्र पदवी सुरू करण्यासाठी सर्वाचा विरोध होता. वेश्यांसाठी पदवी सुरू करीत असल्याची वाईट प्रतिक्रियाही त्यांना ऐकावी लागली होती. मात्र नृत्यावरील प्रेमाखातर नृत्य हा अभ्यासाचा विषय म्हणून मुंबई विद्यापीठात रुजू करण्यासाठी रेळे यांनी पाठपुरावा केला.
 
पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणाऱ्या पात्रांना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. २०१६ साली या पात्रांमध्ये एकलव्य व नंदनार यांची भर पडली आहे.
 
सुरुवातीचे जीवन
डॉ कनक रेळे यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्यांचे बालपण शांतिनिकेतन आणि कोलकाता येथे आपल्या काकांच्या घरी गेले. शांतिनिकेतन इथे असताना त्यांना कथकली आणि मोहिनीअट्टमची नृत्ये पाहण्याची संधी मिळाली. त्या नृत्यांनी कनक रेळेना आपल्या कलाभावनांना आकार देण्यास मदत केली.
 
मोहिनीअट्टम कलाकार
डॉ.कनक रेळे वयाचा सातव्या वर्षापासून गुरुकुल पांचाली करुणाकर पणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथकली शिकत होत्या. त्यानंतर अनेक वर्षांनी कनक रेळे यांनी कलामंडलम राजलक्ष्मी यांच्याकडून मोहिनीअट्टममची दीक्षा घेतली. संगीत नाटक अकादमी आणि नंतर फोर्ड फाऊंडेशनच्या अनुदानाने आपल्या आवडीच्या मोहिनीअट्टमम या विषयाचा त्यांनी अधिक सखोल अभ्यास केला. १९७० - ७१ च्या काळात त्यांनी कुंजुकुट्टी अम्मा, चिन्नम्मू अम्मा आणि कल्याणीकुट्टी अम्मा यासारख्या केरळीय चित्रकला निपुणांचे दर्शन घेतले. या प्रोजेक्टने त्यांना मोहिनीअट्टमची माहिती गोळा करण्यास मदत केली. कनक रेळे यांनी त्याच्या पारंपरिक व तांत्रिक शैलीचे रेकॉर्डिंग केले. या रेकाॅर्डिंगचा त्यांना नृुत्य शिक्षण पद्धती विकसित करण्यास उपयोग झाला.
 
शैक्षणिक कारकीर्द
मुंबई विद्यापीठातील फाईन आर्ट्‌स विभागाच्या सुरुवातीच्या काळात डॉ.कनक रेळे यांनी डीन म्हणून काम केले. १९६६ साली रेळे यांनी नालंदा नृत्य संशोधन केंद्र व १९७२ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालयची स्थापन केली. विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारे नालंदा नृत्य संशोधन केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. डॉ.कनक रेळे यांनी भारत सरकारच्या संस्कृती विभागाचे नवनियंत्रण आणि सल्लागार म्हणून देखील काम केले आहे आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अभ्यासक्रम, विकास संघ, भारतीय व परदेशी विद्यापीठांच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
कनक रेळे यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले. भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या कनक रेळे या पहिल्या अभ्यासक आहेत.
 
पुरस्कार
कालिदास सन्मान
संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड
एम.एस. सुब्बलक्ष्मी ॲवॉर्ड
मुंबई विद्यापीठाची डी.लिट.
जीवनगौरव पुरस्कार
नाट्य विहार ॲवॉर्ड
कुलपती ऑफ मोहिनी अट्टम ॲवॉर्ड
भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
पुणे महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार
 
 
 
Powered By Sangraha 9.0