एखाद्या चोराने जर चोरी केली आणि त्याला पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं, तर आपला गुन्हा लपविण्यासाठी तो इतरांनाच दोष देतो किंवा आपण चोरी केलीच नसल्याचा दावा करून नामनिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. यालाच म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा.’ असाच काहीसा दावा राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. संजय राऊत असोत जितेंद्र आव्हाड असोत किंवा गेला बाजार काही प्रमाणात स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेत्या सुषमा अंधारे.. या सगळ्या मंडळींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाटेल त्या भाषेत अश्लाघ्य शब्दांचा वापर करून गरळ ओकली जात आहे. आता या जहाल विधानांवर जेव्हा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली तेव्हा मात्र या मंडळींना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि आपल्या जीविताची चिंता सतावू लागली. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला आपल्यावर हल्ला करण्यासाठी खंडणी दिल्याची तक्रारच ठाकरे गटाचे खासदार वाचाळवीर संजय राऊतांनी केली. मुळातच राऊतांच्या विधानांवरून ते कायमच अनेकांचा रोष ओढवून घेत असल्याचे सिद्ध झालेले आहे. कधी मराठा समाजाला अपमान करणारे व्यंगचित्र काढायचे, तर कधी बंडखोर महिला आमदारांना वेश्या म्हणून अपमानित करायचे. प्रत्येक वेळी आपल्या बरळण्याची बिनदिक्कतपणे चालूच ठेवायची, पण त्यावर प्रतिक्रिया उमटल्या की मात्र अभिव्यक्ती आणि राजकीय भाष्य करण्याच्या स्वातंत्र्याच्या कुबड्या पुढे करून रडीचा डाव खेळायचा, हे राऊतांसह काही मंडळींचे सूत्र आता संपूर्ण महाराष्ट्राला पाठ झाले आहे. आव्हाडांनी चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांची कॉलर पकडणे आणि महिला कार्यकर्त्यांना प्रताडित करण्याचे प्रकार केल्यावर जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, तेव्हा मात्र ते आपल्या कुटुंबाला पुढे आणून भावनिक राजकारण करतात. तसेच सुषमा अंधारेही रामकृष्णाला शिव्या घालून कालांतराने हिंदुत्वाला सर्वोच्च मानायचे नाटक करून स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आव्हाड असो अंधारे असोत व संजय राऊत, आधी बरळायचे आणि मग बनवाबनवी करायची याला चोराच्या उलट्या बोंबाच म्हणावं लागेल!
कोश्यारींचे गंभीर दावे!
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारींची कारकिर्द जितकी लोकप्रिय आणि चर्चेत राहिली तशीच ती महाविकास आघाडीसोबतच्या त्यांच्या वादांमुळेही लक्षात राहणारी ठरली. ‘लोकराज्यपाल’ ही पदवी मिळावी इतक्या सहजतेने कोश्यारींनी राजभवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले. मविआसोबत झालेल्या वादांवर त्यांनी नुकत्याच काही माध्यमांना मुलाखती दिल्या असून त्यात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी मंजूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला पाठवलेल्या पत्रात वापरलेली भाषा आक्षेपार्ह आणि धमकीभरी होती, असा दावा कोश्यारींनी केला आहे. तसेच उद्धव यांच्या नेतृत्वातील आमदार काही वेळा आपल्याला भेटून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारही करत होते आणि आपल्याला या त्रासातून सोडवण्याची विनंतीही मला करता असल्याचा दावा कोश्यारी यांनी मुलाखतीत केला. राज्यपाल पदावर काम करणार्या व्यक्तीची नेमणूक स्वतः राष्ट्रपतींच्या आदेशानुसार होत असते. कोश्यारी हे आधी एक मोठे राजकीय नेते आणि त्यानंतर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे राज्यपाल राहिले आहेत. त्यामुळे कोश्यारींनी पदावरून बाजूला झाल्यावर आपल्या कारकिर्दीत मविआने आपल्याला कसा त्रास दिला आणि सरकारच्या कामकाजाचे स्वरूप आणि मुख्यमंत्र्यांची वागणूक यावर जर काही दावे केले असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही. पहाटेच्या शपथविधीवरूचाही त्यांनी संदर्भ देत अजित पवारांकडे अंगुलीनिर्देशकेला आहे. संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी शपथविधी कसा उरकला, असा आरोप करणार्यांना त्यांनी जोरदार चपराक लगावली आहे. माजी राज्यपाल म्हणून कोश्यारी यांना मर्यादा आहेत, पण त्या मर्यादा नसत्या तर कदाचित यापेक्षाही अधिक गंभीर खुलासे आणि गौप्यस्फोट ते करू शकले असते. याचे तात्पर्य हेच की, महाविकास आघाडीने केलेले आरोप आणि राज्यपाल म्हणून कोश्यारींना दिलेली अपमानास्पद वागणूक, याचे वाभाडेच कोश्यारींनी जाहीरपणे काढले आहेत आणि त्यातून उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या आधीच डागाळलेल्या प्रतिमेला आणखी तडे गेले आहेत, हे निश्चित.