कुत्रं पिसाळलं तर चावतात का? त्याला औषध देऊन शांत करू ना!
20 Feb 2023 14:06:52
मुंबई : "आपण कुत्रा चावला म्हणून त्याला चावणार का त्याच्यावर औषध देऊन इलाच करतो. लवकरच ती वेळही येईल.", असा इशारा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे. राऊतांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून गुन्हे दाखल होण्याची सुरुवात झाली आहे. वेळ आल्यावर राऊतांची खासदारकीही रद्द करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना मात्र, त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत.
"शिवसेनेचे ५६ आमदार यांना व्हीपचे पालन करावेच लागेल. व्हीप झुगारल्यास पक्षविरोधीकारवाई केलीच जाईल. त्यानुसारच आजची बैठक घेण्यात आली. आम्ही शिवसेना भवनावर कुठल्याही प्रकारचा अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. जेव्हा जेव्हा आम्ही तिऊन जाऊ तेव्हा शिवसेना भवनासमोर नतमस्तक होऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रमुखपदावर नेमण्याचा विचार हा एकनाथ शिंदे आणि पक्ष ठरवणार आहे.", अशी प्रतिक्रीया आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
ते म्हणाले, "उद्धव ठाकरे-संजय राऊत यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तशी तक्रार करावी, उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. मात्र, संजय राऊत यांना कुत्रा चावला आहे. आपण कुत्रा चावला म्हणून त्याला चावणार का त्याच्यावर औषध देऊन इलाच करतो. लवकरच ती वेळही येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे."
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण अधिकृतरित्या मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. विधीमंडळातील कार्यालयात सोमवारी दुपारी महत्वाच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विधीमंडळ अधिवेशनाला व्हीप काढण्यात येणार असल्याचे संकेत आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. पूर्णवेळ शिवसेना आमदारांनी हजर रहावे, आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडावेत. तसेच पूर्णवेळ सभागृहात बसावे, अशा सूचना शिवसेना प्रतोदांनी दिली आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.
जिल्हानिहाय्य प्रतोदांचीही नेमणूक होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. शिवसेना विधीमंडळ कार्यालयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "शिवसेनेचे विधीमंडळ अधिकृत कार्यालय हे आमचेच आहे. त्यामुळे ते कायदेशीररित्याच आम्हाला मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच निवडणूक आयोगाने हे नाव आणि चिन्ह दिलेले असल्याने पूर्णपणे ताबा आमच्याकडेच आहे. मुंबई महापालिकेतील शिवालय असो वा अन्य कुठल्याही प्रकारचे अधिकृत कार्यालये असतील ती प्रतक्रीया एकनाथ शिंदे पाहून घेतील."