पवारांच्या नादी लागले आणि पुरते बुडाले...

20 Feb 2023 20:43:56
Uddhav Thackeray's situation because of Pawar
 
शिवसेनेच्या विचारधारेशी हाडवैर असलेल्या काकाशी युती करणे फार धोकादायक आहे, हे उद्धव ठाकरेंनी कधी लक्षातच घेतले नाही. राजकीय बुद्धिमत्ता कमी पडली. नेता तोच, जो ऐकतो सर्वांचं, जो सर्वांचे सल्ले घेतो. परंतु, निर्णय त्याचा असतो. कुणाच्या तरी सांगण्यावरून निर्णय करणारा नेता हा कधीही ‘लोकनेता’ होत नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. उद्धव ठाकरे यांचा विचार करता, हा अतिशय धक्कादायक निर्णय आहे. स्वाभाविकच त्यांची त्यावरील प्रतिक्रिया अतिशय कडवी असणार हे ओघाने आलेच. ते म्हणाले, “आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून, आमच्यावर होणार्‍या प्रत्येक अन्यायाचा बदला आता केवळ शिवसैनिकच नाही, तर महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. कौरव एकत्र आले म्हणून पांडवांचा पराजय झाला नव्हता आणि आजही होणार नाही. चोरी पचली म्हणून काहींना आनंद झाला आहे. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. काहीही झाले आता शिवसैनिक मागे हटणार नाही. आपला विजय निश्चित असून आता जिंकल्याशिवाय माघार नाही.”

जशा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्या या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया आहेत, तशा सामान्य माणसांच्या प्रतिक्रियादेखील महत्त्वाच्या आहेत. माझ्याशी संवाद करणार्‍या एका वाचक भगिनीची प्रतिक्रिया- ‘पवारांच्या नादी लागले आणि पुरते बुडाले,’ अशी एका वाक्याची आहे. मी तिला विचारले, “शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे, यात पवारांचा संबंध येतो कुठून?” ती मिश्किल हसत म्हणाली, “हा संबंध फार खोलवरचा आहे.” मी तिला म्हटले, “मला थोडं समजून सांग.” तिने जे सांगितले ते असे.ती म्हणाली की, “पवारांच्या राजकारणाचे सूत्र सदैव सत्तेच्या जवळ राहण्याचे आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती होती. ही युती जोपर्यंत राहील तोपर्यंत सत्तेच्या जवळ जाणे शक्य नाही. म्हणून युती तोडली पाहिजे. भाजपला हात लावता येत नाही. कारण, हा पक्ष ठाम विचारांवर उभा असलेला पक्ष आहे आणि संघाची सर्व वैचारिक ताकद या पक्षाच्या मागे उभी असते. या पक्षातून पाच-दहा आमदार फुटले, तर त्यांचे राजकीय जीवनच समाप्त होते. त्यांना कुणी विचारत नाही म्हणून भाजपला हात लावता येणार नाही, शिवसेनेचा मासा गळाला लागू शकतो.”

चाणाक्ष पवारांनी हे हेरले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांच्या घरातूनच या महत्त्वाकांक्षेला खूप पाणी घालण्यात आले. म्हणून २०१९च्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर संजय राऊत यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा पवारांनी फुलवली. त्रिपक्षीय वाटाघाटी सुरू झाल्या. उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास संपादन करण्यासाठी आपले पुतणे अजितदादा पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटेची शपथ घ्यायला लावली आणि नंतर हात वर केले. उद्धव ठाकरेंना असा संदेश दिला की, मी तुमच्याबरोबर युती करण्यासाठी माझ्या पुतण्याचाही बळी द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरे हे हरभर्‍याच्या झाडावरून शेवग्याच्या झाडावर चढले आणि ते काकांना एकदमच शरण गेले.मंत्रिमंडळ बनवण्याचा निर्णय झाला. काकांनी आपल्या नवपुतण्याला बाजूच्या खोलीत नेले आणि सांगितले की, “मुख्यमंत्री तुला व्हावे लागेल अन्य कुणा शिवसेना नेत्याच्या हाताखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काम करू शकणार नाहीत. नवपुतण्या शेवग्याच्या झाडाच्या टोकाला गेला. महत्त्वाकांक्षा सफल झाली. घरात दिवाळी साजरी झाली. शेवग्याचे झाड हे फार नाजूक असतं. ते फार वजन पेलू शकत नाही. महत्त्वाकांक्षेच्या वजनाने ते कोलमडले आणि अडीच वर्षांत सरकार गेले, नाव गेले, आणि चिन्हही गेले.

ती माझी वाचक भगिनी पुढे म्हणाली, यात कोण जिंकलं?, यात शरद पवार जिंकले. त्यांनी युती तोडली आणि शिवसेनेला होत्याची नव्हती केली. अत्यंत कुशल राजकारणी आपल्याला जे करायचे आहे, ते तिसर्‍याकडून करून घेतो. ‘इदं न मम्’ असे तो म्हणत राहतो आणि आपली प्रतिमा तयार करतो. ‘या खेळात माझा काहीच हात नाही. मी तर शिवसेनेला सन्मानाची भूमिका द्यायला तयार झालो होतो,’ असे म्हणून तो नामनिराळा राहतो. शरदराव पवार नामनिराळे आहेत. परंतु, राजकीय घडामोडीचे ज्यांना थोडेबहुत आकलन असते, त्यातील प्रत्येकजण सांगतो की, पवार विजयी झालेले आहेत. काहीजण कुत्सितपणे लिहितात की, जो पवारांबरोबर गेला त्याचा कार्यभाग बुडाला. तशा प्रकारच्या भरपूर पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर वाचू शकता.या माझ्या वाचक भगिनीचे हे विश्लेषण विचार करायला लावणारे आहे. आता प्रश्न असा आहे की, पुढे काय? उद्धव ठाकरे अस्तित्त्वरक्षणासाठी त्यांना जमेल व झेपेल तेवढा संघर्ष करतील. शिंदे गट फुटल्यापासून ते नाव आणि निशाणी जाईपर्यंतच्या घटनाकाळात सामान्य शिवसैनिक कधी रस्त्यावर उतरलेला नाही. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेविरूद्ध काही घडल्यास त्याच्या प्रतिक्रिया फारच तीव्र असत. तोडफोड, जाळपोळ, बंद या मार्गाने तो आपली प्रतिक्रिया देई. तुरुंगात जाण्याची त्याला भीती वाटत नसे. अनेक खटले तो अंगावर घेत, असे यावेळी काहीही घडलेले नाही.

काही शिवसैनिक ‘मातोश्री’वर गोळा होतात, तसेच काहीजण शिवसेनभवनाभोवती गोळा होतात. त्यातील आपणहून आलेले किती आणि आणलेले किती? याचा शोध घेतला पाहिजे. आणलेले लोक तेवढ्यापुरती घोषणाबाजी करतात आणि घरी जातात.उद्धव ठाकरे यांना ऊर्जा हरवलेल्या शिवसैनिकांत ऊर्जा निर्माण करावी लागेल. सकाळ-संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन, कौरव-पांडवांचे दाखले देऊन अशी ऊर्जा निर्माण होत नाही. तसेच विरोधकांना त्यातही भाजपला खूप शिव्या देऊन ऊर्जा निर्माण करता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी धनुष्यबाण आपल्या देवघरात ठेवले आणि त्याची पूजा ते करू लागले. उद्धव ठाकरे यांनी अशी पूजा करून धनुष्यबाणात शक्ती निर्माण होणार नाही. मारूतीची गदा देवघरात ठेवून पूजा केल्याने मारूतीचे सामर्थ्य निर्माण होत नाही. मारूतीचे सामर्थ्य त्याच्या रामभक्तीत होते, त्याच्या समर्पण वृत्तीत होते, त्याच्या प्रकांड बुद्धिमत्तेत होते, त्याच्या धर्मशरण आयुष्यात होते, यापैकी उद्धव ठाकरे यांच्याकडे काय आहे?सत्तेच्या राजकारणात अनेक चाली खेळाव्या लागतात. शरदराव पवार या राजकारणातील कसलेले मल्ल आहेत. त्यांच्याकडे कोणता विचार नाही, विचाराची बांधिलकी नाही, बांधिलकी फक्त सत्तेशी आहे. शिवसेना ही विचारावर चालणारी संघटना होती. तो विचार हिंदुत्त्वाचा विचार आहे. हिंदुत्त्वाचा विचार मुसलमानांचे लांगूलचालन स्वीकारीत नाही. तसेच, पांढर्‍या झग्याचे नको ते कौतुक करीत नाही. हा विचार ब्राह्मणांचा द्वेष शिकवित नाही आणि दलितांचा वापर कसा करायचा, याचे धडे देत नाही. हे सर्व काम शरदराव पवार फार कौशल्याने करतात.

शिवसेनेच्या विचारधारेशी हाडवैर असलेल्या काकाशी युती करणे फार धोकादायक आहे, हे उद्धव ठाकरेंनी कधी लक्षातच घेतले नाही. राजकीय बुद्धिमत्ता कमी पडली. नेता तोच, जो ऐकतो सर्वांचं, जो सर्वांचे सल्ले घेतो. परंतु, निर्णय त्याचा असतो. कुणाच्या तरी सांगण्यावरून निर्णय करणारा नेता हा कधीही ‘लोकनेता’ होत नाही.नाव आणि चिन्ह गेल्यामुळे शिवसेना म्हणजे ‘शिवसेना’ नावाचा विचार हा संपणारा विचार नाही. तो जीवंतच राहील, प्रश्न फक्त एवढाच राहील की, त्याचे नेतृत्त्व कोण करणार? नेतृत्त्व उद्धव-आदित्य-ठाकरे करणार की एकनाथ शिंदे करणार, हा आहे आणि त्याचे उत्तर जोपर्यंत निवडणुका होत नाही, तोपर्यंत सांगणे अवघड आहे. लोकशाही राजवटीत अंतिम निर्णय लोकांनीच करायचा असतो. २०२४च्या निवडणुकींचा विचार करता आणि हिंदुत्वाचा विचार करता, बहुसंख्य हिंदू जनता नरेंद्र मोदी यांच्या मागे जाणार हे निश्चित आहे आणि जे मोदींबरोबर राहतील ते तरतील आणि जे मोदींच्या विरोधात उभे राहतील, ते राहुल गांधींच्या मार्गाने जातील. जनमानस आजतरी मोदीमयच आहे. मोदींना तुम्ही जेवढ्या शिव्या घालाल तेवढे मोदी सशक्त होत जातील. म्हणून जनसमर्थन प्राप्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना स्वतंत्र बुद्धीने स्वतःचा मार्ग शोधावा लागेल.




Powered By Sangraha 9.0