मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरु आहे. यंदा, गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर कासवांच्या घरट्यांची विक्रमी नोंद झाली आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर १०९ घरटी सापडली असुन कासव संवर्धनासाठी काम करणाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र वन विभागाच्या वतिने सह्याद्री निसर्ग मित्र फाऊंडेशनने २००३ साली कासव संवर्धन मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी ऑलिव्ह रिडले कासवांची सर्वाधिक ५० घरट्यांची नोंद झाली होती. यंदा, या मोहिमेला २० वर्ष पुर्ण होत असुन याच वर्षी गुहागर येथील समुद्र किनाऱ्यावर कासवांची घोडदौड शतकपार गेली असुन आत्तापर्यंतची सर्वाधिक १०९ घरच्यांची नोंद केली आहे. हा आत्तापर्यंतच्या कामातील कोकण किनारपट्टीवरील घरट्यांचा उच्चांक ठरला आहे.
"२००३ साली सुरु केलेल्या कासव संवर्धन मोहिमेला यंदा २० वर्ष पुर्ण होत असतानाच ही आकडेवारी ऐकायला मिळणं सुखावह आहे. गुहागरमध्ये झालेली घरच्यांची शतकपार विक्रमी नोंद ही आत्तापर्यंत केलेल्या कामाचे यश अधोरेखित करते. कारण किनारपट्टीवरुन जाणारे कासव १५ वर्षांनी परिपक्व होऊन विणीच्या हंगामात पुन्हा त्याच किनाऱ्यावर येते. याचाच अर्थ सुरुवातीच्या काळात सोडलेली कासवे आता किनाऱ्यावर येत आहेत, आणि हे कासव संवर्धन मोहिमेचे यश आहे",असे मत सह्याद्री निसर्ग मित्र फाऊंडेशनचे भाऊ काटदरे यांनी व्यक्त केले आहे.
कासव संवर्धन मोहिमेसाठी कार्यरत असणारे इतर अनेक हात आणि कासव प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण असुन त्यांना काम करायला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे यात शंका नाही.