गांधी गोडसे : एक युद्ध

18 Feb 2023 20:54:41
gandhi godse ek yudh


दि. २७ जानेवारी रोजी ‘गांधी गोडसे : एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. विवादास्पद ठरेल अशी अपेक्षा असताना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ’बॉक्स ऑफीस’वर बर्‍यापैकी त्याने खेळी केली. अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेल्या या चित्रपटाविषयी...

अनेकांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याविषयीचे ज्ञान हे ’सत्याचे प्रयोग’, ’मी नथुराम गोडसे बोलतोय’ इथपर्यंतच मर्यादित असते. त्याच्या आधारावर म. गांधींना मानणारी एक विचारधारा आणि नथुराम गोडसे यांना समर्थन देणारी एक विचारधारा निर्माण होते. या अर्धज्ञानावर व्यक्तिकेंद्री वाद निर्माण होतात, जे विचारकेंद्री असणे अपेक्षित आहेत. ’गांधी गोडसे : एक युद्ध’ यामध्ये दिग्दर्शकाने काही अंशी विचारकेंद्री वाद दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.मुळात हा चित्रपट असून तो बहुतांश कल्पनारम्य आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दि. ३० जानेवारी, १९४८ रोजी म. गांधींची नथुराम गोडसे यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पुढे त्यांना फाशी झाली, हा सर्वज्ञात इतिहास. पण, या चित्रपटाचे कथानक गांधीजींचा मृत्यू झाला, हे मानत नाही. त्या हल्ल्यानंतरही बापू जीवंत होते. अगदी सुव्यवस्थित ’ऑपरेशन थिएटर’ दाखवून गांधीजींना वाचवण्यात आल्याचे दाखवण्यात आले. याच्यापुढे सामान्य मुद्दे घेऊन म. गांधी आणि नथुराम गोडसे यांचे विचारयुद्ध दाखवले आहे.
एका ऐतिहासिक घटनेला काल्पनिक रूप देण्याचा हा प्रयत्न आहे. असगर वजाहत यांच्या ’गोडसे गांधी डॉट कॉम’ या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. ’गांधीजी जीवंत असते तर...’ या थीमच्या आधारे चित्रपट उभा राहतो.चित्रपटाची सुरुवात पाकिस्तानच्या फाळणीच्या विदारक दृश्यांनी होते. या दृश्यांचे चित्रण भावदर्शी आहे. त्यात निर्माण झालेला म. गांधींविषयीचा रोष प्रकर्षाने दिसून येतो. यातूनच नथुराम गोडसे म. गांधी यांच्यावर प्रार्थनासभेमध्ये हल्ला करतात. चित्रपटाच्या कथेनुसार बापू हल्ल्यामधून बरे होतात आणि गोडसेंना भेटायला तुरुंगात येतात. उदार अंत:करणाने त्यांना माफ करतात. चित्रपटातील गांधीजी जीवंत असल्यामुळे खर्‍या इतिहासानुसार या हत्येनंतर झालेला जनक्षोभ दाखवलेला नाही. म. गांधी काँग्रेस विलिनीकरणाचा मुद्दा मांडतात. त्याच्यावर असणारी निराशा सर्व कलाकारांनी अभिनयाने चांगली दर्शवली आहे. संविधाननिर्मितीच्या प्रक्रियेची सुरुवात यामध्ये येते. काही विशिष्ट समाजाला ‘मनुस्मृती’ आणि हवन दाखवून निर्देशित करण्याचा मोजका प्रयत्न केलेला आहे. परंतु, कथानक पुढे जाताना तो उल्लेख तसाच राहतो.

चित्रपटात म. गांधी काँग्रेस सोडून ग्रामविकास करू लागतात, ग्रामस्वराज्य, लोकांना आत्मनिर्भर करणे, मुलांना शिक्षित करणे असे प्रयोग ते करू लागतात. दरम्यान, नथुराम गोडसे यांचे गांधीविरोधी काही लेख, प्रतिक्रिया दाखवल्या आहेत, ज्या सर्वविचारधारा मानणार्‍या लोकांना खटकू शकतात. कारण, गोडसे यांनी गांधींचा एकरी उल्लेख, अपशब्द कुठेही साहित्यात वापरलेले नाही. म. गांधीजींनी ग्रामस्वराज्यच्या आधारे सामाजिक, आर्थिक विकास केल्याचे दाखवले आहे. पुढे भारत सरकार असताना गावामध्ये स्वत:चे सरकार निर्माण करून देशद्रोह केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होते. म. गांधी नथुराम गोडसे हे ज्या तुरुंगात आहेत, तिथेच त्यांच्याच तुरुंगखोलीत येतात. एकत्र राहताना आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. यात दोघांचेही दोष आणि गुण दाखवण्याचा मध्यम प्रयत्न केलेला आहे. अंतिम क्षणी बापूंवर पुन्हा हल्ला होण्याचा प्रयत्न होतो आणि स्वत: नथुराम गोडसे हा हल्ला थांबवतात, असा ’सीन’ दाखवून ते दोघं एकत्र निर्दोष सुटतात आणि एकत्र चालू लागतात, असा सकारात्मक शेवट दाखवलेला आहे.

सामान्य प्रेक्षक आपले इतिहासासंदर्भातील विचार स्पष्ट व्हावे किंवा नक्की काय घडलं, नक्की विचारधारा काय आहेत, अशा काही अपेक्षा घेऊन हा चित्रपट बघायला जातो, तेव्हा त्याची काही अंशी निराशा होते. म. गांधी स्त्री-पुरुष प्रेमाला विकृत मानत होते, हा एकच गांधींचा दोष घेऊन त्याकरिता एक प्रेमकथा चित्रपटात निर्माण केली आहे. मऊ उशी-पांघरूण घेऊन सुव्यवस्थित खाटेवर झोपलेले गांधीजी-गोडसे कदाचित प्रेक्षकांना पचणार नाही. गांधी करत असलेले काही विनोद कदाचित प्रेक्षकांना मध्ये-मध्ये हसवण्यासाठीच बरे वाटतात. त्या तथाकथित प्रेमकथेचा आनंदी शेवट करताना शेरवानी घालून आलेला नवरदेव आणि गांधींचे विचार प्राण मानणारी नववधू शरारा घालून लग्नासाठी येते, असे तत्काळात किती योग्य वाटले असते, माहीत नाही. चित्रपट अर्थात राष्ट्रपिता म. गांधी यांचा आदर राखणार हे निर्विवाद सत्य होते. परंतु, असे असून त्यांनी नथुराम गोडसेंची भूमिका ‘खलनायक’ अशी दाखवलेली नाही, हे विशेष! परंतु, हा चित्रपट दोघांच्या विचारप्रदर्शनाला पुरेसा न्याय देत नाही.

केवळ बापूंचे अधिकाधिक विचार आणि कार्य दाखवून नथुराम यांचे ’अखंड हिंदूराष्ट्र’ असे काही विचार दाखवलेले आहे. परंतु, त्यातून नथुराम यांची नक्की विचारधारा कळत नाही. गांधीहत्या करण्यामागचा त्याचा हेतू, त्याने न्यायालयात केलेली कारणमीमांसा याचा कुठेच उल्लेख येत नाही. त्याने न्यायालयात केलेल्या वादाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला असता, तर चित्रपट अजून विचारकेंद्रित होऊ शकला असता. कस्तुरबा गांधी यांचा काही मिनिटांचा प्रवेश गांधींचे दोष दाखवण्यापुरताच आहे. परंतु, त्या दोषांची उत्तरे बापूंकडे नाहीत. स्वा. सावरकर, इतर तत्कालीन क्रांतिकारक यांचा उल्लेख चित्रपटात नाहीत. जिना किंवा तत्कालीन फाळणीसंदर्भातही पुरेसा इतिहास सांगितलेला नाही. कदाचित प्रेक्षकांना तो माहीत आहे, असे गृहीत धरलेले असेल. दि. ३० जानेवारी, १९४८ रोजी हल्ल्यानंतरही म. गांधी जीवंत राहिले, ही कल्पना चांगली होती. त्यांचे जीवंत असणे हे नथुराम गोडसे यांच्याशी विचारयुद्ध करण्यासाठी होते, हीसुद्धा कल्पना चांगली आहे. परंतु, त्या कल्पनेला वैचारिक न्याय मिळालेला दिसत नाही. अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच हा चित्रपट संपतो. या चित्रपटाच्या अंती म. गांधी आणि नथुराम गोडसे एकत्र तुरुंगातून निघतात. परंतु, त्यांच्या समर्थकांचे गट निर्माण झालेले असतात, हे चित्रण वास्तववादी आहे. विचारांपेक्षा व्यक्तीला महत्त्वाचे स्थान दिले जाते, याचे ते द्योतक आहे.

चित्रीकरण आणि ए. आर. रहमान यांचे संगीत उत्तम आहे. दीपक अंतानी यांनी गांधीजी उत्तम वठवले आहेत, तर चिन्मय मांडलेकर याने नथुराम गोडसेंच्या भूमिकेला जीवंत न्याय दिला आहे. राजकुमार संतोषी यांचे लेखन-दिग्दर्शन दाद देण्यासारखे आहे. विवादास्पद ठरू शकेल, असा विषय घेऊन त्याला न्याय देण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला आहे. अजून अधिक न्याय देता आला असता; पण हॉलीवूडमधील ’व्हॉट इफ’च्या माध्यमातून झालेले प्रयोग या चित्रपटात पाहताना मनोरंजन आणि विचार यांचा मेळ घातला आहे, असे म्हणता येईल.





Powered By Sangraha 9.0