मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत आज दि. १८ फेब्रुवारीला भारतात आणण्यात आले. भारतीय वायुसेनेचे विमान या चित्त्यांना घेऊन ग्वाल्हेर शहरामार्गे १० तासांचा प्रवास करुन भारतात दाखल झाले.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरुन भारतीय वायुसेनेच्या आयएएफ सी-१७ या एअरक्राफ्टने या चित्त्यांना आणण्यात आले. पुढे त्यांना आएएफ हेलिकॉप्टर्स कडुन मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात सोडण्यात येईल. जगातील पहिल्या आंतरखंडीय हस्तांतरणाचा भाग म्हणून सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून भारतात आणलेल्या इतर आठ चित्त्यांच्या ताफ्यात हे चित्ते सहभागी होतील. ’प्रोजेक्ट चित्ता’ला अधिकृतपणे भारतातील चित्ता परिचयाची कृती योजना म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचे उद्दिष्ट विलुप्त झालेल्या चित्त्याला परत नैसर्गिक अधिवासात परिचित करणे हे आहे.
सर्वाधिक शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे चित्ता भारतातून १९५२ मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. गेल्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेने भारतात चित्ते पाठवण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, १२ चित्त्यांची प्रारंभिक तुकडी दि. १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात पाठवली गेली आहे. याच बरोबर पुढील आठ ते दहा वर्षांसाठी दरवर्षी आणखी १२ चे स्थलांतर करण्यात येणार आहे.