क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी

17 Feb 2023 20:21:15
 
career in sports
 
पूर्वीसारखे क्रीडा क्षेत्राकडे निव्वळ आवड किंवा फावल्या वेळातील उद्योग, या दृष्टिकोनातून न पाहता या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधीचे महत्त्व विद्यार्थ्यांसह पालकांनाही हल्ली पटलेले दिसते. खासकरुन आयपीएल आणि तत्सम क्रीडा स्पर्धांना प्राप्त झालेले प्रसिद्धीचे वलय आणि उत्पन्न यामुळे क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून अधिक गांभीर्याने बघितले जाते. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी आणि संस्थात्मक प्रशिक्षण यांचा आढावा घेणारा हा लेख...

भविष्याचा विचार करुन करिअर नियोजनाद्वारे आपले भवितव्य घडविताना, क्रीडा क्षेत्रातील अनेक आकर्षक व आगळ्यावेगळ्या पर्यायांचा नक्कीच विचार करता येईल. अनेकजण या खेळकर पर्यायाकडे अपेक्षित अशा गंभीरतेने बघत नसले, तरी त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. विशेषत: केंद्र सरकारने विकसित करुन लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या परिणामांमुळे नवीन विद्यार्थ्यांना क्रीडांगण व क्रीडा क्षेत्रापासून क्रीडा व्यवस्थापनापर्यंत विविध आकर्षक पर्याय उपलब्ध असून त्याचाच हा गोषवारा.

विद्यार्थी वा युवा उमेदवारांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, त्यांना त्यांचे क्रीडा क्षेत्रातील करिअर अगदी शालेय कालखंडात सुरू करता येते. असे केल्याने या वयोगटातील तरुणांना जे बहुविध फायदे होतात वा होऊ शकतात, त्यामध्ये तरुणपणाचा व्यायाम व नियमितता, युवावस्थेतील शिस्तबद्धपणा व भविष्यकाळात शिक्षणाच्या जोडीला अथवा क्रीडा क्षेत्रातील आपल्या आवडीच्या विषयात प्राविण्यासह विशेष करिअर करता येते.

वर नमूद केल्याप्रमाणे खेळ अथवा क्रीडा क्षेत्र ही वैयक्तिक प्रयत्न आणि प्राधान्याची बाब असली तरी त्याला शालेय स्तरापासून संस्थात्मक स्वरुपात सहकार्य व मार्गदर्शन मिळणे तेवढेच आवश्यक असते. सुदैवाने आपल्याकडे विद्यापीठ, राज्य व केंद्र स्तरापर्यंत क्रीडानुकूल भूमिकेसह होणारे प्रयत्न क्रीडापटू आणि क्रीडाविश्व या उभयतांना पूरक ठरले आहेत.

यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर ‘स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया’चे महत्त्वपूर्ण स्थान आणि योगदान राहिले आहे. ‘स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया’ची स्थापनाच मुळी केंद्र सरकारतर्फे क्रीडा क्षेत्राला चालना देणारीसर्वोच्च संस्था अशा स्वरुपात करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून प्रादेशिक केंद्रे, बंगळुरु, भोपाळ, गांधीनगर, कोलकाता, चंदिगढ, गुवाहाटी, इंफाळ, लखनौ, मुंबई व सोनेपत येथे आहेत. याशिवाय देशातील विविध ठिकाणी असणार्‍या २३ क्रीडा गुण अव्वलता केंद्रे व ६६ प्रशिक्षण केंद्रे व ३० विस्तारित क्रीडा केंद्रांच्या माध्यमातून ‘स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘साइं’चे काम सर्वदूर चालते व सर्वच क्रीडा प्रकारातील खेळाडू त्याचा लाभ घेतात.

सरकारी क्षेत्रांतर्गत अशा संस्था म्हणजेच संरक्षण सेवा रेल्वे, दूरसंचार, बँका, वित्तीय सेवा, विभिन्न सरकारी सेवा देणार्‍या संस्थादेखील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देतात. ‘टाटा उद्योग समूहा’सारखे उद्योग-व्यवसाय तर अनेक वर्षांपासून आपल्या कर्मचारी खेळांडूसह विविध क्रीडाप्रकार आणि स्पर्धांमध्ये आवर्जून सहभागी होतातच. त्यातच आता भर पडली, ती ‘रिलायन्स’ व ‘अदानी’ या मोठ्या उद्योगांची. ‘आयपीएल’ आणि तत्सम प्रकारच्या विशेष क्रीडा आयोजनाने तर क्रीडा क्षेत्राला व्यावसायिकतेची भक्कम जोड दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारांना विशेष स्वरुप प्राप्त झाले असून विविध प्रमुख क्रीडा प्रकारांचे आयोजक-प्रायोजक व खेळाडू यांना नक्कीच ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले आहेत.क्रीडा क्षेत्रात समाविष्ट विविध प्रकारच्या खेळाडू उमेदवारांना त्यांच्या नैपुण्य, गुणवत्ता व क्रीडा कौशल्याच्या आधारे प्रामुख्याने खालीलप्रमाणे क्रीडासंधी उपलब्ध असतात.


Bodybuilding


शरीरसौष्ठव/खेळाडू : क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक प्राधान्य असणारे ‘करिअर’ क्षेत्र म्हणून शरीरसौष्ठव क्षेत्राचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी शरीरसौष्ठवतेपासून क्रिकेटपर्यंत विभिन्नक्रीडा प्रकारांचा विचार केला जातो. यामध्ये वैयक्तिक क्रीडा कौशल्यांपासून सामूहिक क्रीडा विषयांचा समावेश होतो. या कौशल्यांसाठी विद्यापीठ, राज्य वा केंद्रीय पातळीवरील मार्गदर्शन व अभ्यासक्रमांसाठी विविध स्तरांवरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.


सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील संधी : वर नमूद केल्याप्रमाणे क्रीडाविषयक विविध प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या खेळाडू उमेदवारांना केंद्र वा राज्य सरकारचे विभिन्न विभाग व मंत्रालयामध्ये नोकरी-रोजगाराच्या संधी उपलब्ज असतात. याशिवाय सार्वजनिक बँका, वित्तीय सेवा संस्था, आयुर्विमा क्षेत्रातसुद्धा खेळाडू उमेदवारांची निवड केली जाते. अधिकांश सरकारी क्षेत्रातील विभाग वा आस्थापनांमध्ये विशेष खेळांसाठी राखीव जागा असतात व त्याचा लाभ विशिष्ट क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविणार्‍या खेळाडूंना होत असतो.

sports coach


क्रीडा प्रशिक्षक : विभिन्न क्रीडा संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वा शारीरिक शिक्षण विषयातील शिक्षक मार्गदर्शकांची गरज भासते. यासाठी विशेष उमेदवारांची शिक्षक- प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली जाते.यासाठी संबंधित उमेदवारांनी शारीरिक शिक्षण वा संबंधित क्रीडा विषयातील पदवी वा पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी वा त्यांना क्रीडा क्षेत्रात शिकवण्याची आवड असायला हवी.

क्रीडा मार्गदर्शक : नैपुण्यासह प्रावीण्य व विविध पुरस्कारप्राप्त अनुभवी क्रीडापटू क्रीडामार्गदर्शनाचे काम नक्कीच करू शकतात. या अनुभवी क्रीडापटूंचे मार्गदर्शक नवागत वा अनुभवी क्रीडापटू उमेदवारांना मोठे लाभदायी ठरते. क्रीडा मार्गदर्शक हे संबंधित क्रीडा प्रकारानुरूप खेळाडूंना वैयक्तिक वा समूह स्वरूपात मार्गदर्शक करू शकतात.


Umpire


क्रीडा क्षेत्रातील पंच : क्रीडा क्षेत्रात पंचाची भूमिका ही महत्त्वाची व प्रसंगी निर्णायक असते. क्रीडा पंच होण्यासाठी विषयतज्ज्ञ म्हणून विशेष क्रीडा विषयाचे सखोल ज्ञान, विचारशक्ती, उत्तम आकलनक्षमता, निर्णशशक्ती इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरतात. विशेष म्हणजे, क्रीडा क्षेत्रातील विशेष अनुभवी व्यक्ती क्रीडा पंच म्हणून दीर्घकालीन स्वरूपात विशेष उल्लेखनीय कामगिरी पार पाडतात.


क्रीडा पत्रकार : माध्यम-पत्रकारिता क्षेत्रात क्रीडा प्रकाराने भक्कम व अढळस्थान प्राप्त केले आहे. प्रत्येक वृत्तपत्रात आवर्जून असणारे क्रीडा पान, क्रीडा विषयालाच वाहिलेली विविध प्रकाशने, क्रीडा टीव्ही चॅनेल यासर्व ठिकाणी क्रीडा पत्रकारांना नेहमीच बाब असतो. क्रीडा पत्रकार होण्यासाठी क्रीडा क्षेत्राचे छान, भाषेचा अभ्यास व पत्रकारितेचा अभ्यास वा पात्रता असणे गरजेचे ठरते.

सुदैवाने क्रीडा क्षेत्रात आज विविध प्रकारचे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम प्रामुख्याने लक्ष्मीबाई राष्ट्रीय क्रीडा संस्था-ग्वाल्हेर, तामिळनाडू, क्रीडा विद्यापीठ-चेन्नई, श्री अनिरुद्ध देव क्रीडा विद्यापीठ-आसाम, महाराजा भूपिंद्रसिंह क्रीडा विद्यापीठ-पतियाला, स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठ-गांधीनगर, नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ-पतियाला, लक्ष्मीबाई राष्ट्रीय क्रीडा संस्था- त्रिवेंद्रम या संस्थांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय स्पोर्ट्स अकादमी-दिल्ली, छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी-पुणे, अदानी स्पोर्ट्स अकादमी-शांतीधाम, गांधीनगर या संस्था विशेष क्रीडा शिक्षण-प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे काम करतात.

केंद्र सरकारने सन २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्राला शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व देण्याच्या पार्श्वभूमीवर युवा-विद्यार्थ्यांनी नवे करिअर म्हणून क्रीडा क्षेत्राकडे पाहणे गरजेचे ठरते.


 
-दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन
सल्लागार आहेत.)
Powered By Sangraha 9.0