मनाला ‘पल्लवित’ करणारी थेरपिस्ट

15 Feb 2023 21:56:03
Pallavi Shimpi


राष्ट्रीय जिमनॅस्टिकपटू, आपल्या नृत्यकौशल्याने ‘रिएलिटी शो’ज गाजवलेल्या आणि आता ‘मुव्हिंग माईन्ड्स’च्या संस्थापक म्हणून मानसशास्त्रात कार्यरत पल्लवी शिंपी यांच्याविषयी...


"पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा समोरच्याला मदत करून त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू बघणं, हीच माझ्या कामाची प्रेरणा,“ असं अभिमानाने सांगणार्‍या आणि आपल्याकडे येणार्‍या माणसांची दुःख-अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणार्‍या पल्लवी शिंपी...

ठाण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पल्लवी या शालेय वयातही तितक्याच उत्साही आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थिनी होत्या. पल्लवी यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी जिमनॅस्टिक्स शिकायला सुरुवात केली आणि पुढे आयुष्यातली 15 वर्षे जिमनॅस्टिक्समध्ये नैपुण्य प्राप्त करुन, राष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाने नावलैकिक संपादित केले. सरस्वती विद्यामंदिर या शाळेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. ”शाळेत असताना शालेय अभ्यास आणि जिमनॅस्टिक्स या दोन गोष्टी सोडल्यास इतर काहीही फार करता आले नाही. कारण, इतर उपक्रमांमध्ये लक्ष गेले, तर जिमनॅस्टिक्सकडे दुर्लक्ष होईल, म्हणून प्रशिक्षकांनी इतर कशातही फार सहभागी होऊ दिले नाही. अगदी उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही ‘डबल‘ मेहनत म्हणून कॅम्प्सला जावं लागत होतं आणि इतर मुलांसारखं आपण सुट्टी ’एन्जॉय’ करू शकत नव्हतो, याची कधी कधी खंत वाटायची. आपली ध्येय वेगळी आहेत हे समजून घेऊन ते काम तसंच सुरू ठेवलं,” असं पल्लवी सांगतात.

मात्र, अकरावीत मुंबईतल्या रुईया महाविद्यालयात पल्लवी यांनी प्रवेश घेतला आणि तिथून पुढे नृत्यकला शिकायला सुरुवात केली. अकरावीत असताना जिमनॅस्टिक्स, नृत्य आणि महाविद्यालयीन शिक्षण या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे सुरू होत्या. शालेय जीवनापासूनच त्यांना ‘मानसशास्त्र’ या विषयातही विशेष कुतूहल होतं. म्हणून त्यातच पुढे शिक्षण घेण्याचे पल्लवी यांनी ठरवले. मानसशास्त्राचे तास संपले की, डान्स क्लासला जायचं हे पल्लवी यांचं नित्याच ठरलेलं. त्यांना नकुल घाणेकर यांच्याकडून ‘सालसा’ हा नृत्यप्रकार शिकता आला, तर टेरेन्स लुईस यांच्याकडून नृत्य शिकण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्यांनी नृत्यक्षेत्रात टीव्हीवरील ‘रिएलिटी शो’मध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. ‘डान्स प्लस’, ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘झलक दिखलाजा’ यांसारख्या छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रिएलिटी शो’मध्ये प्रावीण्य मिळवत नृत्यकलेत स्वत:ला सिद्ध केले.

बारावीनंतर पुढे ‘बीए’ ही मानसशास्त्रातच करायचे असं ठरवून रुईया महाविद्यालयात पल्लवी यांनी प्रवेश मिळवला. ‘बीए’नंतर पुढे त्यांनी ‘काऊंसिलिंग सायकोलॉजी‘मध्ये एसएनडीटीमधून पदव्युत्तर शिक्षणही घेतले. मात्र, त्यांना ‘स्पोर्ट्स सायकोलॉजी‘मध्ये पुन्हा पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, यासंबंधीचे शिक्षण भारतात कुठेही उपलब्ध नाही. परिणामी, त्यांनी हे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी एक ब्रेक घेतला होता. ज्यात त्या हिमाचल प्रदेशला जाऊन आल्या. हिमाचलला गेल्यानंतरचा त्यांचा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. हिमाचलमध्ये एका ठिकाणी एक छोटी कार्यशाळा करत असताना ‘थेरोपॅटिक मूव्हमेंट’ या तंत्राचा त्यांच्यावर प्रयोग झाला आणि नृत्याच्या माध्यमातून हे नेमकं काय केलं, याबद्दल त्यांना विशेष कुतूहल निर्माण झालं. तिथल्या मेंटरशी बोलून त्यांनी याबाबतची अगदी जुजबी माहिती घेतली आणि हे तंत्र शिकून घ्यायचं असं तिथेच मनोमन ठरवलं. अमेरिकेला जाण्याचा प्लॅन रद्द करून त्या या कोर्सला अ‍ॅडमिशन घेण्यासाठी बंगळुरुला गेल्या. ‘स्पोर्ट्स सायकोलॉजी‘ शिकण्यासाठी परदेशी चाललेल्या पल्लवी ‘आर्ट ऑफ एक्सप्रेशन्स’मधील थेरपी शिकल्या.

‘एम.ए’ पूर्ण झालं, त्यावर्षी म्हणजेच 2017 साली त्यांनी ’मुव्हिंग माईन्ड्स’ ही संस्था सुरू केली. मात्र, त्यावेळी ती फार चर्चेत नव्हती. ‘थेरपेटीक मूव्हमेंट’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांनी या संस्थेचे काम प्रामुख्याने करायला सुरुवात केली. गेली सहा वर्षे ही संस्था मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अनेक प्रकारे कार्यरत असून त्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त लोकांची मदत आजवर केली आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळे ग्रुप, कंपन्यांमध्येही पल्लवी यांनी समुपदेशनाचे उपक्रम हाती घेतले आहेत. या कामात आता 15 मानसशास्त्रज्ञ जोडले गेले असून त्यांचे अनुभव चांगले असल्याचे पल्लवी आवर्जून नमूद करतात.

अनेकदा,‘ध्यान’ आणि ‘थेरपटिक मूव्हमेंट्स’मध्ये अनेकांची गफलत होण्याची शक्यता आहे. ध्यानाबद्दल सांगताना ’मनाची एक शांत अवस्था चिरकाल टिकावी यासाठी करतात ते ध्यान’ अशी वेगळी व्याख्या पल्लवी सांगतात, तर दुसरीकडे विचारांचा मनातील गोंधळाचा निचरा होण्यासाठी ज्या पद्धती वापराव्या लागतात, त्यापैकी एक ही ’थेरपी’, असा फरक त्या अधोरेखित करतात.जिमनॅस्टिक्स, नृत्य आणि मानसशास्त्र या तिन्हींचा मेळ घालत पल्लवी यांनी आजवर अनेक अनुभवांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे. “या अनुभवांतून शिकत, आकार घेत मी इथवर आले,“ असं सांगत स्वतःबरोबरच त्यांचे कुटुंबीय आणि या प्रवासातील शिक्षक यांना ते आपल्या यशाचं श्रेय देतात.त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
 

Powered By Sangraha 9.0