वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद सलग पाच वर्षे भूषवण्याचा विक्रम नावावर केलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीतील ’पहाटेचा शपथविधी’ ही एक मोठी नाट्यमय घडामोड होती. अजित पवारांनी आमदार पाठीशी घेऊन भाजपला पाठिंबा देऊ करणे, पहाटे राजभवनात शपथविधी होणे आणि ८० तासांत अजित पवारांनी नांगी टाकत पवारांची वाट धरली होती, हा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. मात्र, हा शपथविधी का झाला आणि कुणाच्या सहमतीने झाला, याचा मोठा खुलासा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुळातच मागील अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत वर्चस्ववाद आणि मुख्यमंत्रिपदापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्यामुळे नाराज अजित पवारांच्या मनातील खदखदत असलेला असंतोष वेळोवेळी उफाळून आलेला महाराष्ट्रानेही पाहिला. त्यातच काही दिवसांपूर्वी अजितदादांनी २००४ मध्ये पक्षाने चालून आलेलं मुख्यमंत्रिपद नाकारणे ही मोठी चूक होती, असे म्हणत शरद पवारांसह राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवर थेट निशाणा साधला होता. तत्पूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही अजितदादांच्या भूमिकांवरून शरद पवारांनी त्यांचा कान पिळल्याचे समोर आले होते. त्यामुळे एक चतुर राजकीय नेता म्हणून आपल्या विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण करणे आणि अस्वस्थ असलेल्या विरोधी पक्ष (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्थिरतेला बळ देण्याचा फडणवीसांचा हा प्रयत्न अगदीच यशस्वी झाला आहे.सध्या पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकदिलाने प्रचार करत असल्याचे माध्यमांना आणि महाराष्ट्राला भासवून देत आहेत. या कथित एकीला सुरुंग लावण्याचेही काम फडणवीसांनी या एकाच प्रयत्नांमधून केल्याचे दिसून येते. पहाटेच्या शपथविधीचे खापर अजितदादांवर फोडून राष्ट्रवादीतील अनेकांनी पवार साहेबांना यापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, फडणवीसांनी केलेला खुलासा आणि त्यामुळे भंबेरी उडाल्यानंतर आलेली पवार साहेबांची प्रतिक्रिया यातून फडणवीसांनी घातलेला एक घाव राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे १०० तुकडे करण्यास पुरेसा आहे, हेच सध्याच्या राजकीयस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.
तुम्हीच शेखचिल्लीचे वारसदार!
देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या खुलाशामुळे ‘ब्लेम गेम’चे खरे सूत्रधार शरद पवारच होते, हे जवळपास आता सिद्ध झाले. एकीकडे हा घटनाक्रम सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुंबईतील घरासमोर लावण्यात आलेल्या ’भावी मुख्यमंत्री’ या आशयाच्या बॅनर्समुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि मुख्यमंत्रिपदावरून असलेली भळभळती जखम पुन्हा एकदा उघडी झाली आहे. बुधवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची विधिमंडळात बैठक सुरू असतानाच, दुसरीकडे विधिमंडळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जयंत पाटलांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सची चर्चा विधिमंडळ बैठकीनंतर पक्षाच्या आमदारांमध्येही रंगली होती. रोहित पवार यांनीही यावर हलकीशी प्रतिक्रिया देत पक्षांतर्गत लाथाळ्यांवर प्रतिक्रिया न देण्याचा चालढकलपणा केला आहे. वास्तविक ’भावी मुख्यमंत्री’ आणि ’भावी पंतप्रधान’ या शब्दांची मालकीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावावर केली, तर किती चांगलं होईल ना? असा विचारही एखाद्या वेळी मनाला शिवून जातो.संख्याबळाची अनुकूलता आणि सहयोगी पक्षांमध्ये पवारांविषयी असलेली बेभरवशाची भावना, यामुळे पवारांच्या हाती शेखचिल्लीप्रमाणे पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहण्यापलीकडे कधीच काही राहिलं नाही. तसाच प्रकार अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात राष्ट्रवादीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या शीतयुद्धामुळे समोर आला आहे. एकतर राष्ट्रवादीचे कधीही ७५ पेक्षा अधिक आमदार निवडून आलेले नाहीत आणि जेव्हा ७४ आले, तेव्हा पवारांनी अधिकची मंत्रिपदे घेऊन मुख्यमंत्रिपद काँग्रेसच्या पारड्यात टाकले होते. त्यामुळे तेव्हाही अजित पवारांसह जयंत पाटील आणि मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असलेली मंडळी नाराज झाली होती. पण, काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी २००४चा संदर्भ देत मुख्यमंत्रिपदाची टूम काढून दिली आणि पुन्हा ही चर्चा सुरू झाली. जे हातात नाही, त्यावरून भांडत बसणे, या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पद्धतीवरून पवार आणि जयंतरावांना, ’तुम्हीच शेखचिल्लीचे वारसदार’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!