‘चॅट जीपीटी’ फक्त हिमनगाचे टोक!

15 Feb 2023 21:49:03
chatgpt

युरोप आणि अमेरिकन बहुराष्ट्रीय आणि माहिती- तंत्रज्ञान कंपन्या ज्या प्रकारे नोकर्‍यांवर कुर्‍हाड चालवत आहेत, तसाच फटका कृत्रिम बुद्धिमता असलेल्या तंत्रज्ञानाला बसेल, असा विचार आपण करणार असू तर ते तसे अजिबात नाही. ‘चॅट जीपीटी’कडेही आपण संधी म्हणूनच पाहायला हवे. कारण, ते फक्त हिमनगाचे टोक आहे.

जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात ‘चॅट जीपीटी’ नावाच्या ‘चॅट बॉट’ने भारतभर धुमाकूळ घातला. सोशल मीडिया असो वा वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून मजकूर ‘चॅट जीपीटी’ला वाहिला गेला. इतके करूनही अद्याप ‘चॅट जीपीटी’बद्दलचा संभ्रम काहीसा दूर झालेला नाही. हे अद्ययावत तंत्रज्ञान नेमके काम कसे करते, त्याने साध्य काय होणार, याबद्दल बराचसा उहापोह आत्तापर्यंत झालेला आहे. त्यातही अनेकांच्या नोकर्‍या जाणार का? विद्यार्थ्यांच्या हाती हे ‘टूल‘ लागले, तर गृहपाठ देताना आणि परीक्षांच्या वेळी शिक्षकांनी करायचे काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे ठाकले आहेत. त्याचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न.

सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ‘चॅट जीपीटी’मुळे नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे का? तर ढोबळमनाने त्याचे उत्तर ‘हो‘ असेच द्यावे लागेल. ज्याप्रमाणे भारतात पहिला संगणक अवतरल्यावर भारतातील नोकर्‍या जाणार, असा बोभाटा करण्यात आला तसाच आजचाही प्रकार आहे. ‘चॅट जीपीटी’मुळे ई-मेल तयार करणे, औपचारिक पत्र लिहिणे हीच कामे ‘चॅट बॉट’ करू शकतो. एखादा शोधनिबंध लिहिणे किंवा संशोधनपर मजकूर लिहिणे ‘चॅट बॉट’ला अशक्य आहे. मात्र, त्यासाठी संदर्भ ‘चॅट बॉट’ला शोधता येऊ शकतो. ‘गुगल’वर एखादा प्रश्न सर्च केल्यानंतर ज्याप्रकारे विविध संकेतस्थळांच्या लिंक्स उपलब्ध होतात, त्यातून ‘युझर’ला हवी असलेली माहिती गोळा करता येते. मात्र, ती जशीच्या तशी कॉपी करून स्वतंत्र लेख किंवा मजकूर म्हणून वापरली तर ते ‘वाङ्मयचौर्य‘ ठरू शकते. त्यामुळे या मजकुराचा वापर फारफार संदर्भ म्हणून वापरता येऊ शकतो.

मात्र, ‘चॅट जीपीटी’द्वारे निर्माण होणार्‍या मजकुरात कुठल्याही प्रकारचे असे अडथळे येत नाहीत. त्यामुळे हाच मजकूर जसाच्या तसा वापरला, तर ती काही चोरी होऊ शकत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, असा मजकूर ‘गुगल’द्वारे सहज ओळखला जातो. जर तुम्ही संकेतस्थळासाठी मजकूर लिहित असाल, तर अशावेळी ‘गुगल’च्या ‘क्रॉलर‘कडे मजकूर ’एआय‘निर्मित आहे, याची माहिती आपोआप पोहोचते आणि असे संकेतस्थळ आपोआप ‘गुगल सर्च‘मधून डावलले जाते. त्यामुळे आशयनिर्मिती करणार्‍या क्षेत्राला याचा फारसा फटका बसणार नाही. बसला तरीही त्याची व्याप्ती सीमितच असेल. आज ‘कंटेंट रायटिंग’ या क्षेत्रात प्रामुख्याने मागणी आहे. विविध ब्रॅण्ड, वृत्तपत्रे, नियतकालिके सर्वच क्षेत्रांची ही गरज आहे. पण, म्हणून ‘चॅट जीपीटी’ पूर्णपणे ही जागा भरून काढेल, ही शक्यता धुसरच!

भारत आजही विकसनशील देश आहे. आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर पुढील २५ वर्षांत प्रगत देश म्हणून विकसित होण्याचे स्वप्न पाहत आहोत. अशातच या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांना गती देणारा ठरु शकतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी दोन भिन्न राज्यांमध्ये भाषेची मर्यादा येते. अशावेळी ‘चॅट जीपीटी’सारखी माध्यमे ही दरी मिटवू शकतात. ‘गुगल ट्रान्सलेट’ हा पर्याय यापूर्वीही उपलब्ध होता. मात्र, तो फारसा प्रभावी ठरेल, यादृष्टीने ‘गुगल’ने फारसे प्रयत्न केले नाहीत. ‘चॅट जीपीटी’ यात ताकदीने उतरणार म्हटल्यावर ‘गुगल’लाही खडबडून जाग आली. त्यांनीही ‘चॅट बार्ड’ ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या सर्वांचा परिणाम असा की, तंत्रसुसज्जतेच्या या स्पर्धेत फायदा हा नेहमी ग्राहकांचा होणार आहे. भारतातील छोटे किरकोळ उद्योग ‘डिजिटलायझेशन’कडे झेप घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असो किंवा नव्याने सुरू केलेला ‘स्टार्टअप’ असो, तंत्रज्ञानाविना आजपर्यंत धंद्याचा विस्तार अशक्य! ‘चॅट बॉट’सारख्या सेवा देणार्‍या कंपन्या ‘कस्टमर सव्हिर्र्स ऑटोमेशन’ देऊ शकते.

सध्या अशा तंत्रज्ञानाची मक्तेदारी ‘अ‍ॅमेझॉन’, ‘गुगल’ आणि तत्सम बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेच आहे. भारतातील अनेक स्टार्टअप्सना डिझायनिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग आदी गोष्टींसाठी सुरुवातीपासूनच वेगळे मनुष्यबळ न परवडणारे असते. अशावेळेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर किफायतशीर ठरणारा आहे. अनेक शिक्षकांनी ‘चॅट जीपीटी’ हे विद्यार्थ्यांना अभ्यासापासून दूर ठेवणारे ठरेल, अशी भीतीदेखील व्यक्त केली. मात्र, याउलट पुस्तकातील मजकुरासोबत ही दुहेरी संवाद शिक्षण प्रक्रिया उत्साहवर्धक ठरेल. ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह क्लासरुम्स’, ‘डिजिटल बोर्ड्स’सह ‘एआय’ हे तंत्रज्ञानही अत्यावश्यक ठरणार आहे. भारतासारख्या देशाला गरज आहे ती तंत्रसुसज्ज राहाण्याची आणि त्या दृष्टीने आपली पावले सकारात्मकरित्या वळूही लागली आहेत. ‘५ जी’ तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधांचा विकासही होताना दिसतो. विचार करा, कोरोना काळात जर ‘४ जी’ तंत्रज्ञानाचा तितकासा विस्तार झाला नसता किंवा टीव्ही केबल सेवेप्रमाणे जर का घरोघरी इंटरनेट सुविधा पोहोचवणे शक्य नसते, तर काय झाले असते, याची कल्पनाच न केलेली बरी! ‘एआय’ तंत्रज्ञान, ‘मेटावर्स‘ किंवा अन्य भविष्यातील येणार्‍या संधी या सर्वांसाठी सुसज्ज असणे आणि अशा गोष्टी आत्मसात करणे, हाच पर्याय उभा आहे.

पूर्वीच्या काळी फिचर फोन उपलब्ध होते. त्याची जागा ‘स्मार्टफोन्स‘ने घेतली. भविष्यात आणखी नवे तंत्रज्ञान येईल. मात्र, वापरकर्ते आपणच असू. नवतंत्रज्ञान आत्मसात न करणार्‍यांच्याच नोकर्‍या जातील. बाकी चिंता करण्याचे कारण नाही. भारतासारख्या देशात सृजनशील आणि नवनवीन गोष्टी शोधणार्‍यांची कमतरता मुळीच नाही. देशात हजारो ‘स्टार्टअप्स’ कंपन्या वेगळी वाट निवडून मोठी होत आहेत. नवी पिढी पूर्वापार चालत आलेल्य व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन नवे आयाम गाठत आहे. ‘शार्क टँक इंडिया’सारख्या शोमध्ये येणार्‍या नवउद्यमींचा संघर्ष आणि जिद्द कमालीची आहे. चौकटीच्या बाहेर विचार करणार्‍यांसाठी असे तंत्रज्ञान नेहमीच फायदेशीर ठरणार आहे. ‘चॅट जीपीटी’ तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा भारतासारख्या सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशासाठी नवनव्या संधींची कवाडे खुली करणारा ठरणार आहे.




Powered By Sangraha 9.0