‘वेध’ची अनोखी सफर...

14 Feb 2023 20:29:53
Vedha Acting Academy


नाटकाचा उपयोग मुलांना-मोठ्यांना रोजच्या आयुष्यातही होतो. नाटक एक ‘थेरपी’ म्हणून वापरता येते आणि हाच उद्देश घेऊन १२ वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या संकेत ओक यांनी सहकलाकारांच्या साहाय्याने ‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ची सुरुवात केली. वयवर्ष पाचपासून ५० पर्यंतच्या शिकण्याची आवड असणार्‍यांना नाटकाच्या तालमीत तयार केले जाते. मुलांना अभिनयाचे धडे देणार्‍या ‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ने यंदा १२ वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केले आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.


'वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ची फक्त दहा-बारा दिवसांची अभिनय कार्यशाळा जेव्हा पूर्ण वर्षभराची हसती खेळती शाळा बनली आणि या छोट्या दोस्तांचं आयुष्यच बदलायला लागली. अर्थातच ही हसती खेळती, तंत्रशुद्ध शिक्षणासोबतच मज्जा, मस्ती, दंगा करण्याचे हक्काचे ठिकाण मानणारी, मुलांना आपलीशी झालेली शाळा म्हणजेच अभिनयासोबतच व्यक्तिमत्व विकास साधणारी लहान मुलांची ‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी.’ यावर्षी ’वेध’ संस्थेला एक तप म्हणजेच १२ वर्षे पूर्ण झाली.

’मास्टर्स ऑफ थिएटर आर्ट्स’ केलेल्या संकेत ओक यांनी दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाने १० जुलै २०१० रोजी ‘वेध अकॅडमी’ची सुरुवात केली. ’वेध’चे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते झाले. लहान मुलांची ही अभिनय कार्यशाळा फक्त १०-१२ दिवसांपर्यंत मर्यादित न ठेवता. त्यामध्ये असणारे सगळे पैलू एका प्रोफेशनल कोर्समार्फत पुढे आणावे शिवाय अभिनयाच्या तंत्रशुद्ध शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे काम ‘वेध अकॅडमी’ करतेय. या प्रयत्नांना खर्‍या अर्थाने आणि वेगवेगळ्या रुपात यश मिळत ही डोंबिवली, कल्याण आणि ठाणे येथे वर्षभराची लहान मुलांची आणि मोठ्या वयोगटाची ‘अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ गेली बारा वर्ष उत्तमरित्या कार्यरत आहे. यामध्ये संकेत ओक यांंच्यासोबतच त्यांची पत्नी मधुरा ओक याशिवाय अद्वैत ओक, सौरभ सोहोनी, निलय घैसास, अदिती हरदास, वृंदा दाभोलकर, श्वेता परेतकर ,चैताली धोपटकर, आदित्य बिवलकर आणि संंपूर्ण टीम ’वेध’, ‘वेध’चे आजी माजी विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे.


Vedha Acting Academy

‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ एक विशिष्ट अभ्यासक्रम तसेच इतक्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन मिळवून देणारी फक्त ठाणे, डोंबिवलीतलीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातली एक सर्वोत्कृष्ट अकॅडमी ठरतेय. ज्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा समावेश आहे. ‘नाटकातून व्यक्तिमत्त्व विकास’ हा मूळ हेतू ठेवून ‘वेध’ अभिनयाबरोबरच बाकी विषयातीलही प्रशिक्षण देत आहे. ‘व्हॉईस कल्चर’, ‘फोटोग्राफी’, ‘मेकअप’, ’डबिंग’, निवेदन, बॉडी मुव्हमेंटस, डान्स या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचं तंत्रशुद्ध शिक्षण दिले जाते. यासाठी प्रत्येक विषयातली तज्ज्ञ व्यक्ती बोलवली जाते. आजपर्यंत अनेक मान्यवर दिग्गज अभिनेते मंडळींची ‘वेध’ला भेट दिली आहे.

‘वेध’मध्ये विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, चिन्मय मांडलेकर, पुरुषोत्तम बेर्डे, वामन केंद्रे, शरद पोंक्षे, सुमित राघवन, डॉ. सलील कुलकर्णी, इला भाटे, सतीश राजवाडे, डॉ. गिरीश ओक, ललित प्रभाकर, शशांक केतकर, श्रीरंग गोडबोले, लीना भागवत, कुशल बद्रिके महेश लिमये , उदय सबनीस , स्मिता तळवलकर, सारंग साठ्ये यांसारखी उत्तम कलाकार मंडळी मार्गदर्शन करण्यासाठी आली आहे.या मार्गदर्शनासोबतच त्यांच्या प्रशिक्षणाचा ‘वेध’मधल्या कलाकारांंना प्रत्यक्ष काम करताना उपयोग व्हावा, यासाठी लघुचित्रपट, बालरंगोत्सव, अ‍ॅडव्हान्स कमिशयल शूट, एकपात्री स्पर्धा याही गोष्टींचा विशेष समावेश असतो. ‘बालरंगोत्सव’ हे मुलांचे प्रशिक्षण झाल्यावर थेट नाट्यगृहात सादरीकरण असते. यामध्ये निवेदनापासून सगळी जबाबदारी ही मुलेच उचलतात. शिवाय ‘वेध’ने सामाजिक विषय घेऊन काही लघुचित्रपटसुद्धा केले आहेत.

या सगळ्या सर्वांगीण विकासामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल होताना या ‘वेध’ने पाहिले आहेत. यामुळे या छोट्या दोस्तांची एकूणच प्रगती होत जाते. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो. धीटपणे ते चारचौघात बोलू शकतात. याविषयी बोलताना ‘वेध’चे संचालक संकेत ओक म्हणाले की, या सगळ्यात आजपर्यंत अनेकप्रकारे मुलांची प्रगती पाहिली. पण जेव्हा मूकबधीर मुलांमध्येसुद्धा माईक घेऊन बोलण्याचा आग्रह, जिद्द, आत्मविश्वास दिसला तेव्हा खर्‍या अर्थाने समाधान वाटले. यासोबतच जेव्हा मानसिकदृष्ट्या कमजोर मुलांना व त्यांच्या पालकांना त्या मुलांच्या सुधारणेसाठी मानसोपचारतज्ज्ञ ‘वेध’चे नाव सुचवतात तेव्हा खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास याचे योग्य प्रशिक्षण दिले जाते, याचे समाधान वाटते. असाच एक ‘ऑटिस्टिक’ मुलांमधला फरक लक्षात राहण्यासारखा होता. ज्या मुलांना काही बोलता येणे शक्य नव्हते, त्याने प्रशिक्षण घेत असताना अख्खा एक ‘डायलॉग’ अभिनयासहित बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग ‘वेध’ला वाढवत गेले. त्यामुळे दरवर्षी अशा दोन विद्यार्थ्यांना ‘वेध’मध्ये मोफत प्रवेश दिला जातो.
 

Vedha Acting Academy


‘वेध’मध्ये शिकणार्‍या या कलाकारांंनी मनोरंजन क्षेत्रात खूप मोठी झेप घेतलेली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून ते बालकलाकार म्हणून झळकले आहेत. ‘तू माझा सांगाती’मधील मल्हार अटकेकर, मैथिली पटवर्धन, स्वानंद शेळके, ‘खारी बिस्कीट’ चित्रपटामधील ‘खारी’ वेदश्री खाडिलकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामधील समय तांबे, निधी रासने,आरव तसेच सध्या सुरु असलेल्या ‘यशोदा’ मालिकेतील प्रमुख भूमिकेतील वरदा देवधर, ईशान पाध्ये आणि अर्जुन वायंगणकर याशिवाय ‘वेध’च्या अनेक कलाकारांनी गाजलेल्या चित्रपटांमधून ‘डबिंग’ केले आहे. ‘वेध’मधून जवळपास ५०० पेक्षा जास्त कलाकारांनी व्यावसायिक व्यासपीठावर आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ने त्याचा वाढता आलेख हा डोंबिवलीपासून सुरुवात करून मग ठाणे, कल्याण, पुणे इथपर्यंत तर नेलाच, पण सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट अशी की, ‘लॉकडाऊन’मध्ये ‘वेध’ने युके, युएस, दुबई, ऑस्ट्रेलिया येथील मुलांसाठी ऑनलाईन वर्ग घेतले, तसेच ‘वेध’ डोंबिवली, ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध शाळांमध्येसुद्धा शालेय तासात अभिनय आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देत आहे


‘वेध’ने आत्तापर्यंत बेळगाव, सोलापूर, ठाणे या बालनाट्य आणि नाट्य संमेलनात सहभाग घेतला आहे तसेच राष्ट्रीय महोत्सवात अनेक पारितोषिक मिळवली आहेत. ‘वेध’च्या बालकलाकारांनी कामे केलेल्या चित्रपटांना सलग दोन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तसेच ‘वेध’च्या कलाकारांना ’फिल्म फेअर’, ’झी’, ’मटा’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत तसेच अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


Vedha Acting Academy

यावर्षी तपपूर्ती झाल्याच्या निमित्ताने ‘वेध’ने ५० बालकलाकारांना घेऊन ’सुंदर ती दुसरी दुनिया’ या एका आगळ्यावेगळ्या दोन अंकी बालनाट्याचा शुभारंभ सावित्रीबाई फुले रंगमंदिर, डोंबिवली तसेच गडकरी रंगायतन, ठाणे येथे केला आणि सुरूवातीचे दोन्ही प्रयोग बुधवार, शुक्रवार रात्र असूनही प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले. प्रेक्षकांची उभं राहून मानवंदनाही मिळाली. या नाटकाच्या माध्यमातून बालरंगभूमी साठी योगदान दिलेल्या अनेक दिग्गज लेखक - दिग्दर्शक यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न ‘वेध’च्यावतीने करण्यात आलेला आहे. लहान मुलांना या व्यक्तिमत्त्वांची ओळख होणं आणि त्यांच्या पालकांना त्यांनी त्यांच्या लहानपणी अनुभवलेल्या नाटकांच्या त्या सुंदर दुनियेची एक सफर या निमित्ताने करता येते. डॉ. समीर मोने यांनी या नाटकाचं लेखन केलं असून त्यांनी योग्य पद्धतीने जुन्या-नव्या नाटकांची गुंफण या कलाकृतीत केलेली आढळते. या नाटकाचं दिग्दर्शन ‘वेध’च्या मधुरा ओक, निलय घैसास, वृंदा दाभोळलर, अदिती हरिदास, सौरभ सोहोनी ह्यांनी अत्यंत देखणे केले आहे. या नाटकाची संकल्पना ‘वेध’चे संकेत ओक यांची आहे.
 
ठाणे, डोंबिवली येथील प्रयोगाला शुक्रवार आणि बुधवार रात्र असूनसुद्धा लाभलेला प्रेक्षकवर्ग आणि नाटक संपल्यावर या बालकलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी उभं राहून दिलेली दाद हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता. या नाटकातील केलेली जुन्या नाटकांची निवड तसेच पात्र निवड ही अचूक असल्याचे मत प्रेक्षकांनी नोंदवले. तसेच मुले ज्या आत्मविश्वासाने सादरीकरण करत होती त्यामागे मुलांनी केलेल्या तालमींची मेहनत व त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे यांची मेहनत ही कळून येत होती. नाटकात वापर केला जाणारा दृक्श्राव्य माध्यमाचा वापर आणि या नाटकाचे अतिशय समर्पक असे संगीत ही या नाटकाची जमेची बाजू. यासाठी आदित्य बिवलकर आणि सुखदा भावे-दाबके यांनी खूप मेहनत घेतलेली दिसून आली,तसेच विजय गोळे यांनी अप्रतिम प्रकाशयोजना साकारली. उलेश खंदारे यांची रंगभूषा आणि इशिता गोखले हिने केलेली वेशभूषा अप्रतिम होती. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या बालकलाकारांना घेऊन सर्वांनाच समान भूमिका मिळेल, अशा पद्धतीचे बालनाट्य सादर होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या नाटकाचे असे अनेक प्रयोग व्हावेत आणि संपूर्ण जगापर्यंत मराठी बालरंगभूमीचे कार्य पोहोचावे, अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे,ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, महेश राजदेरकर, ‘अपूर्वा प्रॉडक्शन्स’ चे सुमुख वर्तक, ‘जाई काजळ’चे राजेश गाडगीळ, श्री लक्ष्मी नारायण संस्थेचे माधव जोशी, आनंद म्हसवेकर, मनोज मेहेता, श्रीपाद कुलकर्णी, ‘विद्यानिकेतन’चे विवेक पंडित , लीना मॅथ्यु, दीपाली काळे, स्नेहल दीक्षित, श्रीकांत पावगी, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, अरविंद जगताप, असिस्टंट कमिशनर धुमाळ , स्निग्धा सबनीस, विद्याधर ठाणेकर, प्रसाद कांबळी असे अनेक मान्यवर या प्रयोगाला उपस्थित होते. या नाटकाचे यापुढेदेखील विविध शहरांमध्ये अनेक प्रयोग व्हावेत आणि पुढील पिढीला बालरंगभूमी आणि बालनाट्यांशी निगडित व्यक्तिमत्त्वांची ओळख व्हावी, अशी इच्छा ’वेध’च्या मधुरा ओक यांनी व्यक्त केली. येत्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हे नाटक अजून लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ’वेध’च्या तपपूर्ती निमित्त ‘वेध’ने १२ वेगवेगळे कार्यक्रम केल. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला, येत्या वर्षांमध्ये शॉर्टफिल्म आणि फिल्म फेस्टिवल साठी चित्रपट बनवायचा ‘वेध’चा मानस आहे.


Powered By Sangraha 9.0