दुर्मीळ गुणसंपदेचा राज्यपाल

14 Feb 2023 19:36:08
Bhagat Singh Koshyari

भगतसिंह कोश्यारी न राहता ‘लोकराज्यपाल’ भगतसिंह कोश्यारी झाले. यापूर्वी झालेल्या कोणत्याही राज्यपालांना हे काम करता आले नाही, हे त्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ते विचाराला समर्पित आहेत, आणि स्वत:ला भारतमातेच्या चरणी त्यांनी अर्पित केलेले आहे. राग, लोभ, धन, मान-सन्मान यापासून ते मुक्त होते. मी त्यांना अनेकदा समोर आलेल्या माणसाचे तोंडभरून कौतुक करताना पाहिले आहे. अशी सर्व दुर्मीळ गुणसंपदा महाराष्ट्र सोडून गेली, याचा खेद झाल्याशिवाय राहत नाही.

भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या विनंतीचा आदर करून केंद्र सरकारने त्यांना राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मोकळे केले. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या ज्या राज्यात भाजपचे शासन आहे किंवा भाजपचे शासन नाही, पण राज्यपाल मात्र भाजप नियुक्त आहे, त्या त्या राज्यांतील भाजपसोडून सगळे राजकीय पक्ष राज्यपालांना टीकेचे लक्ष्य करीत असतात. दिल्लीत अरविंद केजरीवाल हे काम करतात, तर प. बंगालमध्ये हे काम ममता बॅनर्जी करतात. भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात ज्यांनी मोहीम चालविली, ते सगळे केजरीवाल आणि ममता बॅनर्जींचे भाऊबंद आहेत.
 
या मंडळींना केंद्र सरकारने म्हणजे भाजपने नियुक्त केलेला राज्यपाल चालत नाही. राजकीय भाषेत ते म्हणतात की, “राज्यपाल हे भाजपचे ‘एजंट’ आहेत आणि भाजपला सोयीचे निर्णय ते घेत असतात. ते आपली संवैधानिक जबाबदारी पार पाडीत नाहीत. त्यांच्या नको त्या हस्तक्षेपामुळे ‘संघराज्य‘ संकल्पनेला धोका निर्माण होतो. म्हणून प्रत्येक राज्यातील बहुतेक विरोधी पक्ष ‘राज्यपाल हटावो’चा एक राजकीय कार्यक्रम चालवितात. हा कार्यक्रम चालविण्यासाठी ते कथानक तयार करतात. त्यांच्या बरोबर असलेली डावी डोकी कथानक शास्त्रातील तज्ज्ञ असल्यामुळे ते ‘रेडिमेड फॉर्म्युले’ देत असतात आणि बहुतेक बिनडोक राजकारणी ते विषय एकनिष्ठेने पुढे नेत असतात.

भगतसिंह कोश्यारी यांच्यासंदर्भात २०१९पासूनच विरोधी पक्षांनी वादंगाला सुरुवात केली. २०१९ची निवडणूक झाली. सेना-भाजपला बहुमत मिळाले. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बळकावली. त्यापूर्वी एक घटना घडली. भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट हटवून पहाटे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे, शरदराव पवार यांच्याशी बोलूनच हे सर्व ठरले होते. शरदराव पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि आपला पुतण्या अजित पवार यांचा ‘कात्रजचा घाट‘ केला. ‘मी याला संमती दिली होती’ असे शरद पवार आज काही बोलणार नाहीत, याला ‘राजकारण‘ असे म्हणतात.

भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला बाजूला सारून शपथविधी केला म्हणून ‘शिवसेनेचा बोलका पोपट’ खवळला आणि सवयीप्रमाणे त्याने जीभ सैल सोडून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर वारेमाप तोंडसुख घेतले आणि शेवटी महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. नियतीला ते आवडले नसावे, म्हणून तिने महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट सोडले आणि उद्धव ठाकरे घरात बसले. तसे ते सभेत शूर असतात म्हणून ते कोरोनाला घाबरले आणि घरात बसले, असे कोणी म्हणू नये. बायकोच्या नथेतून तीर मारणारे तिरंदाज हणमंतराव खूप असतात, पण ते रणांगणात जातात तेव्हा त्यांना कापरे भरते आणि हुडहुडी निर्माण होते. असो...

 
Bhagat Singh Koshyari


भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सूड घेण्याची कोणतीही संधी हणमंतरावांनी सोडली नाही. २०२१ला राज्यपाल मसुरीला जाण्यासाठी विमानतळावर गेले. उद्धव ठाकरे यांनी आदेश काढून सरकारी विमान उड्डाण रद्द केले. भगतसिंह कोश्यारी यांना विमान कंपन्यांच्या विमानातून जावे लागले.

भगतसिंह कोश्यारी एका भाषणात असे म्हणाले की, “मुंबई ही गुजराती आणि मारवाडी समाजाशिवाय आर्थिक राजधानी होऊ शकत नाही.” त्यांचे हे वाक्य येताच अनेकांची मराठी अस्मिता जागी झाली. ‘मुंबई महाराष्ट्राची, नाही कोणाच्या बापाची’, ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट’, ‘मुंबईचा शिल्पकार मराठी माणूस आहे’ ही कथानके नंतर सुरू झाली. कोणी असे प्रश्न विचारले नाहीत की, मुंबईत मराठी माणसांचे उद्योग किती आहेत? त्याच्या वडापावच्या गाड्या भरपूर आहेत, पण वडापाव हा काही उद्योग नाही. मशीद बंदर आणि नव्या मुंबईत, कांदेबाजार, फळबाजार, दाणेबाजार, भाजी बाजार, सुकामेवा बाजार, इलेक्ट्रिक वस्तूंचा बाजार, प्लास्टिकचा बाजार यात मराठी माणसांचे गाळे किती आहेत? ओझी वाहायला मराठी माणूस तिथे भरपूर आहेत, दुकानांत काम करायला मराठी माणूस भरपूर आहेत.

काळबादेवीच्या मंगलदास कापड मार्केटमध्ये मराठी माणसांचे गाळे किती आहेत? या सर्व ठिकाणी मी काही ना काही कारणानिमित्ताने जाऊन आलो आहे. मला भेटलेली सर्व माणसं गुजराती आहेत, मारवाडी आहेत, सिंधी आहेत, पंजाबी आहेत, मराठी माणूस औषधालाही तिथे सापडत नाही.मराठी माणूस या क्षेत्रात का नाही? याचा राजकीय नेते विचार करतात का? त्यांची उद्योगाची कल्पना म्हणजे वडापावची गाडी अधिक झाले, तर ‘शिवभोजन‘ फारच झाले तर, रिक्षा चालक-मालक संघटना. उद्योजक असे आकाशातून निर्माण होत नाहीत, ते पिढ्यान्पिढ्यांच्या संस्कारांतून निर्माण करावे लागतात. व्यापारीवृत्ती रक्तात यावी लागते. आमच्या राजनेत्यांनी मराठी माणसाला नोकर्‍या करायला शिकविले आणि बेंबीच्या देठापासून ‘आवाज कोणाचा’ अशी ओरड द्यायला शिकविले. भगतसिंह कोश्यारी यांचे सत्य, पण कटू बोल त्यांना पचनी पडणे कठीणच होते.

“समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते आणि त्यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अपूर्ण राहिले असते,“ असे ते म्हणाले. ही गोष्ट खरी आहे की, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर लिहिलेले पत्र उपलब्ध आहे, त्यापूर्वी कुठे भेट झाल्याचा ऐतिहासिक उल्लेख नाही. असे असले तरी, रामदास स्वामी हे वेगळ्या प्रकारचे संत होते. ते केवळ पारमार्थिक आणि भजन-संकीर्तन करणारे संत नव्हते. समाजात छात्रधर्म जागविण्याचे काम त्यांनी केले. त्यांची शिकवण प्रयत्नवादाची, धर्मरक्षणाची, स्वराज्यनिर्मितीची आणि परकीयांच्या जोखडातून मुक्त होण्याची आहे. समर्थांचा कर्मयोग हा केवळ आध्यात्मिक कर्मयोग नाही. तो व्यावहारिक कर्मयोग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच कार्य राजकीय क्षेत्रात केले. दोघांचीही कामं एकमेकांना पूरक आहेत. महाराजांच्या मनातही समर्थांविषयी प्रगाढ श्रद्धाभाव होता म्हणून त्यांनी सज्जनगड समर्थांना दिला.

 
जातीयतेच्या दुर्गंधीने ज्यांच्या डोक्याची खोकी झालेली आहेत, ते समर्थ रामदास स्वामींची जात काढतात. महाराजांचीही जात काढतात. एका मराठ्याचा गुरू ब्राह्मण कसा होईल? असा त्यांचा सवाल आहे. ‘ब्राह्मणद्वेष करावा, द्वेषाने तरुण भारावा, ब्राह्मण जातिविरुद्ध तयास उभा करावा, या कारणे राज्य प्राप्त होते,‘ हा त्यांचा राजकारणाचा मंत्र आहे. भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राची ही जातीय मानसिकता माहीत नसल्यामुळे ते सहजभावनेने बोलून गेले. आपल्या बोलण्याचा विपर्यास होईल, हे त्यांच्या लक्षात आले नाही.

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी, प्रगतिवादी भुतावळीने भगतसिंह कोश्यारी यांना घेरले. औरंगाबाद येथे भाषण करताना कोश्यारी म्हणाले, “शिवाजी महाराज हे गतकाळातील हिरो आहेत, सध्याचे आपले हिरो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी का असू नयेत?” लबाड शिवभक्तांना पुन्हा एक कोलित मिळाले. ‘महाराजांचा अपमान झाला’ ही ओरड त्यांनी सुरू केली. या सर्व लबाड लोकांचे मानस इतके नाजूक आहे की, शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘छत्रपती शिवाजी महाराज‘ असा केला नाही तरी त्यांना महाराजांचा अपमान झाल्यासारखे वाटते. जर कोणी नुसतं ‘बाबासाहेब आंबेडकर‘ म्हणाले की, ते ओरड सुरू करतात. बाबासाहेबांचा यांनी अपमान केला. कारण, ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर‘ म्हणाले नाहीत. जर कोणी नुसतंच ‘जोतिराव फुले‘ असं लिहिलं, तर गजब निर्माण होतात. ‘महात्मा जोतिराव फुले‘ असं लिहिलं पाहिजे, असं नाही म्हटलं तर महापुरु०षाचा अपमान झाला.

या मतलबी अपमानी मनोवृत्तीला आपण प्रश्न करायचे नसतात की, तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय समजले? महात्मा फुले काय समजले? छत्रपती शिवाजी महाराज काय समजले? ते सांगणार नाहीत, पण त्यांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित आणि महात्मा जोतिराव फुले म्हणजे माळी. त्यांच्या कार्याशी आम्हाला काय करायचे? आम्हाला त्यांची जात प्रिय! कार्य सांगून मते मिळत नाहीत, जात सांगून जातभावना जागविता येते आणि मतबँका तयार करता येतात. या महापुरुषांचा आम्हाला तेवढाच उपयोग. अशी ही नाजूक अपमानित मानसिकता आहे.

 
या मानसिकतेने भगतसिंह कोश्यारी यांना बदनाम करण्याची मोहीम चालविली. राज्यपाल म्हणून त्यांची कारकिर्द ही संस्मरणीय आहे. ती पुढील कारणांसाठी -


१. त्यांनी राजभवन सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले.


२. सर्वसामान्य नागरिक राजभवनात केव्हाही जाऊ शकत होता.

 
३. आदिवासी पाडे, दलित वस्त्या, समाजातील अत्यंत दुर्बल घटकांसाठी चालणारे सेवाकार्य यांना त्यांनी वयाचा विचार न करता भेटी दिल्या. त्यांचे प्रवास धक्क करणारे असत. राजभवनातील सगळे कर्मचारी त्यांनी हलते, बोलते आणि चालते केले.


४. प्रत्येक कामाला आपल्याकडून होईल तेवढे साहाय्य त्यांनी केले.


५. राज्यपाल निधीतून त्यांनी अनेक संस्थांना भरीव आर्थिक साहाय्य केले.

म्हणून ते भगतसिंह कोश्यारी न राहता ‘लोकराज्यपाल’ भगतसिंह कोश्यारी झाले. यापूर्वी झालेल्या कोणत्याही राज्यपालांना हे काम करता आले नाही, हे त्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ते विचाराला समर्पित आहेत, आणि स्वत:ला भारतमातेच्या चरणी त्यांनी अर्पित केलेले आहे. राग, लोभ, धन, मान-सन्मान यापासून ते मुक्त होते. मी त्यांना अनेकदा समोर आलेल्या माणसाचे तोंडभरून कौतुक करताना पाहिले आहे. अशी सर्व दुर्मीळ गुणसंपदा महाराष्ट्र सोडून गेली, याचा खेद झाल्याशिवाय राहत नाही.


 
Powered By Sangraha 9.0