जागतिक हरित भविष्यासाठी...

13 Feb 2023 22:11:50
अतिथंडीची लाट किंवा दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी उन्हाची दाहक तीव्रता अथवा पावसाळ्यातील लहरीपणा, हे सगळे निसर्गाचे स्वभाव माणसाने माजवलेला उन्माद आणि जोपासलेल्या चंगळवादामुळे बदलले. आता या ऋतूंच्या विचित्र स्वभावाने त्रस्त झालेला माणूस आपण खरोखर सुखी, आनंदी आहोत का, या प्रश्नांच्या उत्तरामुळे हैराण आहे.


G 20
 
 
एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातील धक्कादायक आकडेवारीनुसार, जगातील सध्याच्या एकूण ‘ग्रीनहाऊस गॅस’ अर्थात हरितगृह वायूंपैकी 80 टक्के गॅस ‘जी 20’ देश उत्सर्जित करतात. याची वार्षिक सरासरी दरडोई सात टन इतकी आहे. इतकेच नव्हे, कर्बउत्सर्जनात ‘जी 20’ देशांचा वाटा तब्बल 99 टक्के आहे. त्यात चीन आणि अमेरिका आघाडीवर आहेत, तर भारत आणि इंडोनेशियातील कर्बउत्सर्जनाचे दरडोई प्रमाण सर्वात कमी आहे. म्हणजे एकीकडे जागतिक विकासातून लाभ मिळत असताना, हा उपजीविकेलाच निर्माण होणारा धोका हे खरे समस्येचे मूळ आहे.

आता जगातील इतर देश या संकटाला रोखण्यासाठी काय करतात, हे दिसून येईलच. पण, भारताने याबाबतीत निश्चितच आश्वासक पावलं टाकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार अखिल मानवी जीवन सुकर व्हावे, म्हणूनच सक्रिय झालेले दिसते. ग्लोबल फॉरेस्ट वॉच- मेरीलँड विद्यापीठ, ‘गुगल’ आणि ’नासा’ (युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे अ‍ॅण्ड नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) यांच्या संयुक्त उपक्रमाच्या एका पाहणीनुसार, 2001 ते 2020 दरम्यान भारतातील 18 टक्के जंगल आणि पाच टक्के झाडांचं आवरण नष्ट झालं आहे.

भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2001 ते 2019 दरम्यान देशातल्या जंगलांमध्ये 5.2 टक्के वाढ झाली आहे. हिरवाईचा भाग वाढला, तर कार्बन उत्सर्जनाचे धोके कमी होतात, हे भारताच्या लक्षात आले आहे. म्हणून 2030 पर्यंत होणार्‍या अतिरिक्त अडीच ते तीन अब्ज टन कार्बन उत्सर्जनावर उतारा म्हणून पुरेशी वृक्षलागवड करण्याचा भारताचा निर्धार आहे. आजकाल सगळ्या जगात हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम यामुळे मानवाच्या शाश्वत जीवनशैलीबाबतच चिंता व्यक्त होताना दिसते.
एकतर माणसाने निसर्गाशी खेळ करताना चंगळवाद जोपासला आणि आता त्याचे तोटेदेखील तो अनुभवू लागला. या विषयावर सगळे जग एकत्र येत आहे. प्रदूषणाची समस्या सगळ्या जगाला कमी-अधिक पातळीवर भेडसावणारी आहे. त्यावर उपायदेखील शोधले जात आहे. उद्योग आणि मोठ्या प्रकल्पांची माणसाच्या सुविधेसाठी गरज आहेच. पण, जेव्हा निसर्गाने दिलेली मौल्यवान संपत्ती नाश करून माणूस कृत्रिम वातावरणात जगण्याचा आनंद घेऊ लागला, तेव्हा निसर्गाची त्याच्यावर अवकृपा होणे स्वाभाविकच होते. त्याचे परिणाम म्हणजे जागतिक तापमान वाढ.

आता ती आटोक्यात राहावी म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्र एकत्र येऊन मार्ग शोधत आहेत. कुणाला अमेरिकेत अकल्पित वादळे येतात म्हणून हे करावेसे वाटते, तर कुणाला ब्राझीलची नदी पिवळी होऊ लागली, म्हणून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावासा वाटतो. चुकांमधून धडा घेणे हे मानवी स्वभावाच्या शहाणपणाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे सध्या सुरू असलेले जगभरातील याबाबतचे प्रयत्न नक्कीच संभाव्य संकटावर मात करण्यास उपयुक्त ठरतील, अशी आशा आपण बाळगली पाहिजे.

भारताकडे आता ‘जी 20’ देशांचे नेतृत्व आहे. ‘जी 20’ देशांच्या प्रतिनिधींनी येऊन येथे हवामान बदलामुळे संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. तसे झाले तर भारताच्या या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होईल. त्यामुळे या क्षेत्रात केलेले प्रयत्न हे अखिल मानव जातीच्या कल्याणासाठीच केले जात असल्याचे यानिमित्ताने ध्यानात घेतले पाहिजे.

अन्नधान्याच्या बाबतीत तृणधान्ये आरोग्यदायी आणि पोषक आहेतच. संयुक्त राष्ट्राने यंदाचे वर्ष ‘जागतिक भरडधान्य वर्ष‘ म्हणून जाहीर केले असून जागतिक स्तरावर भारत या क्षेत्राचे नेतृत्व करणार आहे. भारतीय शेती आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी ही बाब नक्कीच लाभदायी ठरावी. विषमुक्त शेती आणि हरितऊर्जेचा संकल्प भारताने केला आहे. नैसर्गिक शेती, ‘ग्रीन हायड्रोजन’ मिशन यामुळे ओल्या आणि सुक्या कचर्‍याची विल्हेवाट आणि त्यापासून वीजनिर्मिती करणे, यातून भविष्यात शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताने पावले टाकली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली. आज लगेच याचे परिणाम दिसणार नाहीत. मात्र, भारतातील पुढील पिढी यामुळे नक्कीच शाश्वत जीवनमान जगण्याच्या दृष्टीने निश्चिंत राहील, यात संदेह नाही.

याशिवाय भारतात आता ई-वाहन निर्मिती, नद्या, शुद्धीकरण, जंगल, सौरऊर्जेवर भर देणे असे विविध सकारात्मक उपाय अवलंबिले जात आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-पेट्रोल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे, देशातील नागरिकदेखील त्यासाठी प्रतिसाद देत आहेत. हे सगळे उपाय हवामान बदलाचा जीवघेणा धोका आपल्या पुढील पिढीला बसता कामा नये, त्यामुळे या पृथ्वीवरील अमूल्य जीवन आणि साधनसंपत्ती नष्ट होता कामा नये, म्हणून केले जात आहेत. चीननंतर भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश. त्यामुळे येथे अडचणी, समस्या या इतरांच्या तुलनेत अधिक आहेत. मात्र, त्यावर मात करण्याचे सामर्थ्यदेखील आमच्यात आहे आणि आम्ही आमच्याच देशातील लोकांच्या कल्याणाचा विचार नव्हे, तर अखिल मानवजातीचा विचारदेखील करतो, हेच या सकारात्मक कृतीतून सिद्ध होते.

- अतुल तांदळीकर



Powered By Sangraha 9.0