१९६०च्या दशकातील एका चित्रपटात ’मानसीचा चित्रकार तो... तुझे निरंतर चित्र काढतो...’ या हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांच्या ओळींप्रमाणे बालपणीपासूनच कुंचल्याच्या प्रेमात पडलेली मानसी संजय यादव या होतकरू युवा चित्रकाराचा जन्म ठाणे शहरात झाला. ठाणे पूर्वेकडील साईनाथनगर, चिखलवाडी परिसरात 10 बाय 12च्या चाळवजा झोपडीत तिचे बालपण तसे गरिबीतच गेले. आई-वडील, एक भाऊ आणि वारकरी पंथातील आजोबा असे त्यांचे छोटे, पण समाधानी कुटुंब. मानसीचे बालपण ठाण्यात तसेच आजोळी सातारा येथे गेले. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घरानजीकच्या शाळेत तिने पूर्ण केले. दहावीत मानसीने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. कुठलीही शिकवणी न लावता तिने हे उज्ज्वल यश संपादन केले. ठाण्यातीलच जोशी-बेडेकर महाविद्यालयात सध्या ती अकरावीमध्ये वाणिज्य शाखेत शिकत आहे.
शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूलं अनेकदा चित्रांतून संवाद साधत असतात. मानसीचेही काहीसे असेच झाले. लहानपणी शाळेत किंवा बाहेर तिने नवीन काही पाहिले की, एखादी सुंदर रचना दिसली की, नेहमी घरात वडिलांना येऊन ती सांगायची की, “पप्पा, हे मी करणारच!” नंतर आपल्याकडील असतील त्या साधनसामग्रीच्या साहाय्याने आपले इप्सित साध्य करण्यासाठी ती झोकून देत आली. त्यामुळे तिने निर्मिती केलेल्या कलाकृतीत मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार दिसून येतो.
कलासक्त असलेली मानसी लहानपणापासूनच हरहुन्नरी असून प्रत्येक गोष्टीत आपला हातखंडा असावा, असा तिचा आग्रह असतो. या ईर्षेपोटीच ती गाणे तसेच पोवाडे, भारूड तर गातेच, किंबहुना अभिनयासोबतच हार्मोनियम आणि माऊथ ऑर्गनदेखील वाजवते. गावच्या मंदिरात तसेच शाळा-महाविद्यालयात रांगोळी काढण्यासाठी मानसीच सर्वात पुढे असते. शैक्षणिक उपक्रमांमध्ये शिक्षकांची मुलाखत घेणे, संस्कृतमध्ये अध्याय वाचन करणे आदींमध्ये ती हिरिरीने भाग घेते. शाळेत शिकत असताना ‘रामायण ग्रंथ’ या विषयावर तिने परीक्षा दिली होती. तिचे आजोबा मूगटराव यादव यांच्याकडून प्रेरणा घेऊन भजनाची ओढ निर्माण झाली. लहान भाऊ निशांत याने तिला हार्मोनियम वाजवण्यास शिकवल्याचे ती अभिमानाने सांगते. भाषा जरी येत नसली, तरी दक्षिण भारतीय भाषेतील गाणी पाठ करून गायला तिला खूप आवडतात. युट्यूबवरून फ्रेंच भाषाही तिने अवगत केली.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत असूनही ती छान मराठी बोलते व लिहिते. ‘अबॅकस’ गणितात तिने प्रावीण्य मिळवले आहे. तिला पु. ल. देशपांडे यांची पुस्तके वाचायला आवडतात. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या कविता गुणगुणायला आवडतात. बेडेकर कॉलेजमध्ये कवितांच्या अभिवाचनामध्येही तिने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कुसुमाग्रजांच्या ’कणा’ या कवितेचे तिने अभिवाचन केल्याचे ती सांगते.
चाळीतील घरासमोर चित्रकार नरेश वाणी काका राहत असत. त्यांच्यामुळे चित्र काढण्याची ओढ निर्माण झाली. त्यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच ही उपजत कला तिच्या अंगी बाणल्याचे ती सांगते. चित्र काढता काढता वडिलांच्या सांगण्यावरून नंतर तिने ‘स्केचेस’ काढायला सुरूवात केली. शाळेत असताना चित्रकला स्पर्धेत तिने अनेक पुरस्कार पटकावले. त्यामुळे भविष्यात चित्रकार बनण्याची मनीषा तिने उरी बाळगली असून, हे सर्व शिक्षण पूर्ण करून करणार असल्याचे ती सांगते. उत्तम रेखांकन, चित्ररचनेतील वेगळेपण, वास्तवाशी संवाद, ठोस संकल्पना, विचार आणि अभिव्यक्तीमधील स्पष्टता हे तिच्या चित्रांचे वैशिष्ट्य असून तिने व्यक्तिचित्रे, समूहचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे अशा विविध चित्र प्रकारांत काम केले आहे. तिने काढलेली छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, विठ्ठल-रखुमाई, कार्टून चित्र रसिकांना भावतील अशीच आहेत. व्यक्तीच्या छायाचित्रावरून हुबेहूब स्केच तयार करण्यात तिचा हातखंडा असून ‘वॉल पेंटिंग’ तसेच, ‘थ्रीडी नेमप्लेट’देखील ती खूप छान बनवते.
इयत्ता सहावीमध्ये असताना शाळेत इंग्लिश गाणे गायल्याबद्दल शाळेने सुवर्णपदकासह प्रमाणपत्र देऊन गौरवले होते. ठाण्याचे जनसेवक आ. संजय केळकर यांचे अर्कचित्र काढल्याबद्दल स्वतः आ. केळकर यांनी तसेच, आ. आशिष शेलार यांनीही तिच्या विविध कलाकारी उपक्रमांचे कौतुक केल्याचे ती सांगते. संस्कृतमध्ये मानसीने पारितोषिकही मिळवले. हर्षदा रुपक केणी यांनी ’लोहार की’ या काव्यसंग्रहासाठी मुखपृष्ठ बनवण्याची संधी देऊन एकप्रकारे माझ्या कलेचा गौरव केल्याचे ती आवर्जून नमूद करते.
“आयुष्यात कला महत्त्वाच्या असतात, आयुष्यात कला नसेल, तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमधील कला जोपासायला हव्यात. कोणतीही गोष्ट मनापासून शिकलात, तर अशक्य असे काहीच नाही,” असा संदेश ती विद्यार्थ्यांना देते. “कोणत्याही शिकवणीची गरज नाही. मीसुद्धा दुसर्याकडूनच वेचत राहिले. मग ती कला असू देत अथवा ज्ञान,” असे सांगणारी उदयोन्मुख कलाव्रती मानसी यादव हिला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
9320089100