"उबाठा गटाची बोगसगिरी..."; आमदारांच्या सह्यांबाबत संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
09 Dec 2023 15:07:29
नागपूर : एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी उबाठा गटाने केली असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शनिवारी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको अशी भुमिका घेत शिंदे गटाच्या २३ आमदारांच्या पत्रावर सह्या आहेत, असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. यावर संजय शिरसाट म्हणाले की, "मुळात ती बैठक झालीच नसून आम्हाला प्राप्त झालेल्या त्यांच्याकडील कागदपत्रांमध्ये अनेक खाडाखोड आहे. तसेच एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी त्यांनी केली आहे," असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "एकीकडे बैठक झाली असे ते म्हणतात आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टात बैठकीला हे लोक उपस्थित नव्हते असेदेखील म्हणतात. आताच्या सुनावणीत त्यांचे प्रश्न आणि आमच्या उत्तरांमध्ये तफावत बघायला मिळत आहे. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान आता सगळं खरं खोटं होणार आहे," असेही ते म्हणाले.