नवभारताची संकल्पना साकारणारा नमो महारोजगार मेळावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

09 Dec 2023 13:36:16

Fadanvis


नागपूर : नमो महारोजगार मेळावा हा खऱ्या अर्थाने नवभारताची संकल्पना साकार करणारा मेळावा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते.
 
दिनांक ९ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकीकडे रोजगार आकांक्षी तरुणाई आणि दुसरीकडे रोजगार देण्यासाठी तयार असलेले उद्योजक या दोघांना एका मंचावर आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे."
 
"वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, त्यासाठी आवश्यक कौशल्य आणि त्यांची कमतरता ओळखून त्यानुसार तरुणाईला प्रशिक्षण देत त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या देण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. नमो रोजगार मेळाव्याला विदर्भातील अनेक तरुणांनी प्रतिसाद दिला आहे. या मेळाव्यात ज्यांना रोजगार मिळाला नाही अशा लोकांचे कौशल्य तपासून त्यांची गरज असलेल्या लोकांशी त्यांना जोडून देण्यात येईल. तसेच ज्याला आवड आहे त्याला योग्य संधी मिळेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे."
 
पुढे ते म्हणाले की, "नमो महारोजगार मेळावा हा खऱ्या अर्थाने नवभारताची संकल्पना साकार करणारा मेळावा आहे. लवकरच जागतिक बँकेच्या साहाय्याने रोजगार निर्मितीचे मिशन सुरु करणार आहे. याशिवाय 'दवाखाना आपल्या दारी' ही नवी संकल्पना राबवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले."



Powered By Sangraha 9.0