विश्रांतीनंतर दोडामार्गात पुन्हा हत्तींचे ठाण; शेतपिकांचे नुकसान

08 Dec 2023 12:14:54
elephants in sindhudurg


मुंबई (विशेष प्रतिनिधी): 
जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचे पुनरागमन झाले आहे (human-elephant conflict in sindhudurg). कोल्हापूरात काही काळ व्यतीत केल्यानंतर हत्तींचा कळप पुन्हा कोकणात उतरला असून त्यांनी फळबागांमध्ये ठाण मांडले आहे. (human-elephant conflict in sindhudurg)
कोल्हापूरातील आजरा आणि चंदगड भागामधून दोडामार्ग तालुक्यात एक मादी, एक नर आणि तीन पिल्लू असा पाच हत्तींचा कळप दाखल झाला आहे. नारळ पोफळीच्या बागा, तसेच ऊस, केळीच्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन दिवसांपुर्वी म्हणजेच दि. ६ डिसेंबर रोजी दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावामध्ये एका प्रौैढ नर हत्तीचे दर्शन झाले असून हा हत्ती कोल्हापुरहून आलेला गणेश हत्ती असल्याचे सांगितले जात आहे.
कोल्हापुरातील आजरा तालुक्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात गणेश हत्तीने एका वनकर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. हत्तीला हुसकावताना ही घटना घडली. हल्ला केलेल्या हत्तीने वनकर्मचाऱ्याला पायदळी तुडवत त्याला ठार केले. ही घटना ताजी असतानाच आता महिन्याभराच्या कालावधीमध्ये हा हत्ती प्रवास करत सिंधुदूर्गमध्ये दाखल झाला आहे. त्याच्यापासून भयभीत झाल्यामुळे या हत्तीजवळ जाण्याचा अद्याप कोणीही प्रयत्न केला नाही. गणेश हत्तीजवळ न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिलेल्या असतानाच आता आणखी एक वनहत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यातील हेवाळे,घाटिवडे,बांबर्डे या गावांच्या हद्दीत दिसू आला आहे.
sindhudurg elephant


नारळ-पोफळीच्या बागा, केळीच्या बागा तसेच ऊस शेतीचे हत्तींनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या भितीचे वातावरण पसरलेले आहे. हत्ती येण्याआधीच वनविभागाने उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल आता गावकऱ्यांकडून उपस्थीत केला जात असून शेती पिकांच्या नुकसानाबरोबरच जीवाची चिंता ही आता स्थानिकांमध्ये दिसून येत आहे. वनविभाग हत्ती प्रश्न दुर्लक्षित करतोय का?, पंचनामे करायला ही उशीर का केला जातो?, ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत?, हत्ती प्रश्न गांभिर्याने कधी घेतला जाणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून शेतीच्या अपरिमीत नुकसानामुळे वनविभागावर गावकरी नाराज असल्याचा सूर उमटताना दिसत आहे.
"पिकांच्या नुकसानाबरोबरच आता जीवाची ही चिंता सतवू लागल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. होणारे नुकसान भरून निघता येण्यासारखे नाही. तसेच वनविभागाने वेळीच उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे."
- संजय सावंत
वनश्री फाऊंडेशन




Powered By Sangraha 9.0