रणतांडव दर्याभवानीचे

08 Dec 2023 21:09:42
Article on biggest bonfire in the Arabian Sea

पूर्व समुद्रात ‘गाझी’चा निकाल लागत असतानाच, इकडे पश्चिमेला भारतीय नौदलाने कराचीवर जबर हल्ला चढवला. दि. ४ व ५ डिसेंबर आणि पुन्हा दि. ८ व ९ डिसेंबर असे लागोपाठ दोन हल्ले चढवून नौदलाने कराचीचं पेकाट मोडून टाकलं.

तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असा आपला देश असूनही समुद्री जीवन, समुद्र सफरी किंवा एकंदरीतच समुद्रविषयक साहित्य आपल्याकडे अभावानेच आढळतं. आपणा हिंदूंच्या भावजीवनात अढळ स्थान मिळवून राहिलेली, दोन महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत. रामायणात प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी हनुमंत शंभर योजनं समुद्र उल्लंघून लंकेत गेला आणि नंतर वानरांनी समुद्रावर सेतू बांधला. एवढेच समुद्रविषयक उल्लेख येतात. महाभारतात युधिष्ठिराच्या राजसूर्य यज्ञात भीमाने अपरान्त म्हणजे समुद्रकाठचा सप्तकोकण प्रदेश जिंकला होता आणि कृष्णाने समुद्र मागे हटवून द्वारकानगरी वसवली असे उल्लेख येतात. पण, म्हणजे यात समुद्री सफरी, समुद्री युद्धं वगैरे काहीही नाही.

हिंदू परंपरेनुसार रामायण कथा आजपासून दहा हजार वर्षांपूर्वी, तर महाभारत कथा आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी घडली. त्यानंतर क्रम लागतो, चाणक्य-चंद्रगुप्ताचा. पाटलीपुत्राचं नंद साम्राज्य अत्यंत प्रबळ होतं. ते उलथून टाकून, मगधाच्या सिंहासनावर चंद्रगुप्ताला बसवणार्‍या आर्य चाणक्याने आपल्या ’अर्थशास्त्र’ ग्रंथात समुद्री व्यापार आणि नौदलाचा तपशीलवार विचार केलेला आढळतो. अर्थशास्त्राचा काळ आहे, आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वींचा.
 
मग क्रम लागतो. जातककथा आणि कथासरितासागर यांचा. त्यांचा काळ इसवी सनाच्या १८व्या शतकापासून पाचव्या शतकापर्यंतचा साधारणपणे मानला जातो. या संग्रहांमधल्या हजारो कथा वर्षानुवर्षे संकलित केल्या जात होत्या. यांत मात्र समुद्र प्रवासांच्या, त्यातल्या संकटांच्या, गमती-जमतींच्या, अद्भुत देशांच्या कथा येतात. अनेक अभ्यासकांच्या मते, अरेबियन नाईट्स किंवा एक हजार एक रात्रींमधल्या विलक्षण कथांचा मूळ उद्गम या भारतीय साहित्यातून झालेला आहे. साहसी समुद्र प्रवासी सिंदबाद आणि त्याच्या पाठुंगळी बसलेला खवीस म्हातारा, ही अरेबयिन नाईट्समधील गोष्ट आठवते का? अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, कित्येक आग्नेय आशियाई देशांमध्ये अगदी आता-आतापर्यंत पाहुण्यांना असं पाठुंगळी बसवून नेण्याची पद्धत रूढ होती. म्हणजे कोलकात्यात जशा माणसांनी ओढून नेण्याच्या रिक्षा आता-आतापर्यंत होत्या, तसंच!

पण, तरी हे झालं समुद्र प्रवासाचं वर्णन. समुद्री युद्धाची वर्णनं तर फारच कमी आहेत. याचं कारण म्हणजे, समुद्री किंवा आरमारी युद्धाचं तंत्र फारच वेगळं आहे. जमिनीवर कसं चतुरंग दलानिशी युद्ध करीत असत किंवा हातघाईच्या युद्धात योद्धे अगदी एकमेकांना भिडून युद्ध करीत असत किंवा आज आधुनिक काळातही दोन सैन्य, तोफखाना, रणगाडे, चिलखती वाहनं यांच्या आश्रयाने एकमेकांवर हल्ले करतात. दोघांनाही एक खात्री नक्की असते की, बाकी काय होईल, ते होवो; पण आपल्या पायाखालची ही जमीन काही कुठे जात नाही.

आरमारी युद्धात सगळंच वेगळं असतं. पहिली गोष्ट म्हणजे आपलं हे गलबत पाण्यावर तरंगत ठेवणं, पाण्यात बुडू न देणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. मग ते गलबत हव्या त्या वेगाने, हव्या त्या दिशेने नेणं आणि शत्रूच्या गलबतावर हल्ला चढवून ते बुडवणं किंवा निकामी करून ताब्यात घेणं, असा सगळा प्राधान्यक्रम असतो. आरमारी युद्धाच्या या तंत्रात आपण जगभरात सर्वात अधिक कुशल आहोत, हे इंग्लंडने १५८८ साली सिद्ध केलं. त्या वर्षी इंग्लिश आरमाराने आपल्यापेक्षा अनेक पट मोठ्या असलेल्या स्पॅनिश आरमाराचा पराभव केला आणि अशा इंग्लिश आरमाराचा पराभव मराठी आरमाराने मुंबई समोरच्या खांदेरी लगतच्या समुद्रात केला. मुंबईच्या दक्षिणेला २० सागरी मैलांवर भर समुद्रात असलेल्या खांदेरी बेटावर किल्ला बांधायला, छत्रपती शिवरायांनी ऑगस्ट १६७९ मध्ये भर पावसाळा असूनही सुरुवात केली. साहजिकच मुंबईकर, इंग्रज आणि मुरूड-जंजिर्‍याचा सिद्धी यांनी खांदेरीला समुद्रातून वेढा घालणं, खांदेरीवर समुद्रातून जहाजांवरून तोफांचा भडीमार करणं आदी सर्व प्रयत्न केले.

मुंबई ते थळ ते अलिबाग हा समुद्र पट्टा ऑगस्ट १६७९ ते फेब्रुवारी १६८० असा सहा-सात महिने, दर्याभवानीच्या रणतांडवाने नुसता गर्जत होता. शिवरायांच्या आरमारातले कोळी-भंडारी-कोकणी-मुसलमान विरुद्ध सिद्दीचे हबशी आणि इंग्रजांचे गोरे सोजीर यांच्या मरण-मारणाच्या आरोळ्या, किंकाळ्यांनी आसमंत दणाणून जात होता. दि. २६ जानेवारी १६८० या दिवशी खांदेरीजवळच्या सिद्दीच्या ताब्यातल्या उंदेरी या बेटावर मराठी आरमाराने फार कजाखी हल्ला चढवला, फार जबर लढाई झाली. खांदेरी-उंदेरी-थळ यांच्या लगतचा समुद्र मुडदे आणि तुटकी-फुटकी जळती गलबतं होड्या, पडाव यांनी भरून गेला अखेर इंग्रज आणि सिद्दी यांच्या नाकावर टिच्चून मायनाक भंडार्‍याने म्हणजेच शिवरायांनी खांदेरीवर किल्ला उभा केलाच.

मुरूड-जंजिर्‍याबद्दल बोलताना अनेक शांतिदूत आणि अनेक निधर्मी हिंदू तुम्हाला आवर्जून सांगतील की, जंजिरा शिवरायांना, शंभूराजांना, बाजीरावाला कधीच जिंकता आला नाही. तेव्हा त्या लबाड लोकांना हे आवर्जून ऐकवा की, मुंबई आणि मुरूड यांच्या दरम्यान स्वतः शिवरायांनी उभारलेला हा जलदुर्ग खांदेरी, सिद्दी आणि इंग्रज यांना कधीच जिंकता आला नाही. १८१८ साली जेव्हा मराठी राज्य बुडालं, तेव्हा तहान्वये तो आपोआपच इंग्रजांना मिळाला. म्हणजे जिंकला नाही, आपसूक मिळाला!

आपल्या समाजाला आपल्या पराभवांच्या कथा-कहाण्या ऐकण्याची फार सवय लागली आहे. किंबहुना, ती मुद्दाम लावण्यात आलेली आहे. तुम्ही हिंदू लोक सगळ्यांकडून पराभूत होण्यासाठीच जन्मला आहात, असं आपल्या शत्रूंना आपल्या जाणिवेत ठसवायचं आहे, यालाच म्हणतात-’सायकोलॉजिकल वॉरफेअर.’ ते उलटवण्यासाठी एकच उपाय आपण शत्रूंना मारून कसा दिग्विजय केला, या कहाण्या आपण पुनःपुन्हा सांगत राहायच्या. युरोपात सागरी महासत्ता म्हणून टेंभा मिरवणार्‍या इंग्लिश आरमाराच्या आमच्या कथित अशिक्षित कोळ्या-भंडार्‍यांनी कसा साफ नक्षा उतरवला आणि नाक मुठीत धरून तह करायला भाग पाडलं, हे ठसून सांगायचं. या तहाच्या वेळी एक मोठा नाट्यमय प्रसंग घडला. इंग्रजांचा वकील रामोजी शेणवी कोठारी हा मोठा मिजाशीत होता. चहा गरम असतो, चहाची किटली गरम असते, इथपर्यंत ठीक आहे; पण किटली पकडायचं फडकं पण गरम होऊन चटके द्यायला लागलं तर? तसा रामोजी शिवरायांच्या प्रतिनिधीला म्हणजे अण्णाजी दत्तो यांना म्हणाला की, ‘’पंत, इंग्रजांनी मनात आणलं, तर डाव्या हाताने खांदेरी घेतील.” अण्णाजी दत्ता पंत सचिव हे शिवरायांच्या अष्टप्रधानांपैकी एक. राजकारण आणि रणांगण यांत आवळ्यासारखे मुरलेले. त्यांनी रामोजीने हाती दिलेला कागद त्याच्या अंगावर भिरकावला आणि मिशीतल्या मिशीत हसत म्हणाले, ”असं? मग आणा ना मनात आणि काय करायचं ते करा!” रामोजीने गपगुमानं तह केला.

आरमार युद्धातल्या विजयाची ही जी परंपरा शिवछत्रपतींनी, सरखेल कान्होजी आंग्य्रांनी, सरदार आनंदराव धुळप यांनी निर्माण केली, तीच १९७१च्या भारत-पाकयुद्धात स्वतंत्र भारताच्या नौदलाने कायम ठेवली. १९७१ सालच्या एप्रिल-मे महिन्यापासूनच युद्धाची तयारी सुरू झाली होती. पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानात पाऊण लाख फौज उतरवून, तिथल्या आपल्याच जनतेवर अनन्वित अत्याचार चालवले होते. या फौजेला अन्नधान्य-दारुगोळा इत्यादी सगळी रसद नौदलाद्वारे कराची ते कॉक्स बजार, खुलना, चित्तगाँग अशा बंदरांमदून चालू होती. भारतीय सेनापतींनी ठरवलं की, बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाने या बंदरांची कोंडी करायची. रसदपुरवठ्याचं एकही जहाज या बंदरांपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. मग विमानवाहू नौका ’आयएनएस विक्रांत’वरील विमानांनी बॉम्बफेक करून, ही बंदरे भाजून काढायची.

नौदल हे काम करत असताना लष्कर आणि हवाईदल चारी दिशांनी पूर्व पाकिस्तानात घुसून त्याचं काम करतील. पूर्व आघाडीवर हे काम चालू असताना, पश्चिमेकडे नौदलाच्या विनाशिका आणि क्षेपणास्त्रवाहू नौका थेट कराची बंदरावर हल्ला चढवून, पाकिस्तानी आरमाराच्या मुळावरच धाव घालतील. बेत तर मोठा नामी होता. त्यातला धोक्याचा भाग होता, तो म्हणजे पाकची पाणबुडी ’पीएनएस गाझी.’ गाझीला पाक नौदल सेनापतींनी ‘विक्रांत’च्या मागावर सोडलं होतं. भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल नीलकंठ कुष्णन् यांनी सुंदर सापळ लावला. ‘विक्रांत’ जहाज विशाखापट्टणम् बंदरात आहे, अशी पाकिस्तानी हेरांची समजून पटवून देणारे, असे असंख्य खोटे संदेश मुद्दाम पाठवण्यात आले. दि. ३ डिसेंबर १९७१च्या मध्यरात्री ‘गाझी’ पाणबुडी विशाखापट्टणम्च्या समुद्रात पाणसुरुंग पेरायला आली. ’आएनएस राजपूत’ या भारतीय विनाशिकेचे कमांडर इंदरलिंग यांनी दोन पाणतीर (डफ्थ चार्जिस) तिच्यावर डागले. प्रचंड स्फोट झाला. विशाखापट्टणम् बंदर आणि शहरातल्या लोकांना भूकंपाचा धक्का बसल्याचा भास झाला.

पूर्व समुद्रात ‘गाझी’चा निकाल लागत असतानाच, इकडे पश्चिमेला भारतीय नौदलाने कराचीवर जबर हल्ला चढवला. दि. ४ व ५ डिसेंबर आणि पुन्हा दि. ८ व ९ डिसेंबर असे लागोपाठ दोन हल्ले चढवून नौदलाने कराचीचं पेकाट मोडून टाकलं. दि. ४ व ५ डिसेेंबरचे हल्ले आणि दि. ३ व ४ डिसेंबरला ‘गाझी’चा विध्वंस यामुळे पाकी नौदल पिसाटून गेलं. ‘पीएनएस हँगोर’ ही त्यांची फ्रेंच बनावटीची पाणबुडी अरबी समुद्रात दात ओठ खात शिकार शोधू लागली. तिला शिकार दिसली. ’कुकरी’ आणि ’कृपाण’ ही भारतीय नौदलाची दोन पाणबुडीरोधक जहाजं. ‘हँगोर’चाच शोध घेत, दीव बेटासमोरच्या परिसरात होती. भारतीय सोनार यंत्रांपेक्षा ’हँगोर’चं सोनार यंत्र अधिक प्रगत होतं. ’हँगोर’ने प्रथम ’कृपाण’वर दोन टॉरपेडो सोडले. एकाचा नेम चुकला आणि एक ’कृपाण’ने चुकवला. मग ’हँगोर’ने ’कुकरी’वर तिसरा टॉरपेडो डागला. तो ‘कुकरी’च्या दारुगोळ्याचा कोठारावरच फुटला. बघता-बघता ’कुकरी’ बुडाली.

पाश्चिमात्य नौकानयन क्षेत्रात एक फार उमदी परंपरा आहे. नौकेचा कप्तान हा त्या नौकेवरच्या प्रत्येकाला जबाबदार असतो. नौका बुडू लागली, तर कप्तानाने शक्य असेल, तेवढ्या लोकांना प्रथम वाचवायचं आणि अखेर त्या नौकेसह जलसमाधी घ्यायची. ’कुकरी’चे कप्तान महेंद्रनाथ मुल्ला यांनी शक्य तितक्या लोकांना लाईफ जॅकेट्स दिली आणि अखेर नौकेसह जलसमाधी घेतली. भारतीय नौदल आणि भारतीय जनता सेनादलांच्या पराक्रमाने जितकी थरारली, तितकीच कॅप्टन महेंद्रनाथांच्या या धीरोदात्त बलिदानाने भरारून उठली.
 
Powered By Sangraha 9.0