नित्य ‘प्रफुल्ल’ रंगकर्मी

08 Dec 2023 21:36:34
Article on Prafull Gaikwad

रंगमंचाच्या बॅकस्टेजपासून निवेदन, अभिनय ते कार्यक्रमाचे संयोजन, अशा नित्य प्रफुल्लित असलेल्या ठाणेकर प्रफुल्ल गायकवाड याच्या कलाप्रांतातील मुशाफिरीचा परिचय करुन देणारा हा लेख...

प्रफुल्लचा जन्म पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील नेतवड गावी झाला असला, तरी त्यांचे बालपण ठाण्यात गेले. वडील मुंबईत टपाल खात्यात पोस्टमन असल्याने त्यांचे वास्तव्य ठाण्यात होते. प्रफुल्लची आई गृहिणी. आईवडील दोघेही वारकरी असल्यामुळे पारंपरिक भजन, कीर्तन, प्रवचन आदींचे संस्कार झाल्याने लोककला, लोकनृत्याची आवड बालपणापासूनच होती.

शालेय जीवनात अभ्यासासोबतच प्रफुल्लने विविध शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला. खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केले. कराटेमध्ये ब्लॅक बेल्टपर्यंत मजल मारली. क्रीडाक्षेत्रात यश संपादन करीत असताना, खेळाऐवजी कलेमध्ये त्याची रुची वाढली. फावल्या वेळेत त्याने नृत्याची आवड जोपासण्यास सुरुवात केली. विविध स्थानिक मित्रमंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, शाळांच्या नृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागला. इतक्या व्यस्त नियोजनातही दहावीत प्रफुल्लने तब्बल ९१ टक्के गुण मिळवले. पुढे अकरावी, बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण करीत असतानाच, मो. ह. विद्यालयातच पहिल्यांदा नाटक करण्याची संधी प्रफुल्लला लाभली. त्या संधीचे त्याने सोने केले. मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयामध्ये पदवीच्या अभ्यासक्रमासाठी शिकत असताना, तेथील नाट्यमंडळाशी परिचय झाला आणि नाट्य व कला क्षेत्राशी जवळून संबंध आला. मग युवा महोत्सव, एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा स्पर्धांमध्ये सहभाग वाढला. फक्त अभिनय न करता संगीत संयोजन, संघ व्यवस्थापन, बॅक स्टेज या वेगवेगळ्या जबाबदार्‍या प्रफुल्लने पार पाडल्या.

अभिनयापेक्षा व्यवस्थापन, आयोजन, नियोजन, समन्वय या बाबींकडे त्याचा ओढा अधिक होता. याच दरम्यान कलाक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय त्याने घेतला. पदवी परीक्षेनंतर ’औदुंबर एंटरटेनमेंट’मध्ये त्याला पहिली नोकरी मिळाली. तिथे काम करताना साहाय्यक म्हणून सहा मराठी चित्रपटांसाठी ‘पीआर’ आणि ’इव्हेंट मॅनेजमेंट’ केले. नाटकाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून महाविद्यालयातील मित्रांना सोबत घेऊन स्वतःची ’मोरया ः इव्हेंट्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट’ ही नाट्यसंस्था सुरू करून, या संस्थेच्या नावाखाली गडकरी रंगायतन येथे ’संस्कृती. कॉम’, ‘हास्याविष्कार पर्व १, २, ३’ हे कार्यक्रम केले, जे रसिकांच्या पसंतीस उतरले. ‘एका क्षणात’, ’जन्म रहस्य’, ’तुम्ही-आम्ही’, ’बॅरिस्टर’, ’हाऊसगुल्ल’, ’चौर्‍याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च’ अशा व्यावसायिक नाटकांसाठी देखील प्रफुल्लने काम केले.

२०१७ साली मुलुंडमध्ये ‘अश्वमेधा’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. २०१८ साली माहिती व जनसंपर्क संचालनालय विभागातर्फे होणार्‍या ’संवाद वारी’ कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून प्रफुल्लने आपल्या कामाचा ठसा उमटविला. ’बॉम्बे स्टॉक एक्सचेंज फेस्टिवल’, ‘ठाणे आर्ट फेस्टिवल’, ‘उपवन आर्ट फेस्टिवल’मध्ये सादरीकरण केले. त्याचबरोबर ’राज्य मराठी विकास संस्थे’तर्फे भरवल्या जाणार्‍या ’रंगवैखरी’, ’राज्यस्तरीय कलाविष्कार स्पर्धे’चे मुंबई केंद्र समन्वयक म्हणून २०१७ ते २०१९ अशी सलग तीन वर्षे काम पाहिले. ’काळा घोडा आर्ट फेस्टिवल’च्या नाट्य विभागात तीन नाटकांतून सहभाग नोंदवल्यानंतर २०१९ साली राज्य हौशी नाट्य स्पर्धा- ठाणे केंद्र येथे समन्वयक म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून २०२३ पर्यंत हौशी नाट्य स्पर्धेची ठाण्यातील धुरा प्रफुल्लकडेच आहे. ’क्लिक’ या सांगीतिक मूकनाट्यासाठी व्यवस्थापक म्हणून तो काम करीत आहे.

२०२० साली ’झी मराठी’वरील ’माझा होशील ना’ या मालिकेसाठी प्रॉडक्शन टीममध्ये काम केले. तसेच ‘सोनी मराठी’वरील ’स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतही योगदान असल्याचे प्रफुल्ल सांगतो. विक्रम गोखलेंपासून ते गश्मिर महाजनीपर्यंत अनेक कलाकारांसमवेत नाटक, मालिका, चित्रपटांसाठी काम करायची संधी त्याला लाभली. २०२२ पासून ठाण्यात स्वतःच्या संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व ‘समन्वय प्रतिष्ठान’तर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सुरू केले. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा महाविद्यालयातील गुरू विनोद जाधव, सुधीर दादा, देवराज साळवी (बाप्पा), संदीप रेडकर, रवी मिश्रा, गिरीश पतके तसेच नाट्य मंडळातील मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळे मिळाल्याचे प्रफुल्ल आवर्जून सांगतो. कलेच्या प्रातांत असा विहार सुरू असतानाच, २०२२ पासून एका सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी आणि जाहिरात एजन्सीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट टीममध्ये तो कार्यरत आहे.

भारतीय नौसेनेच्या कार्यक्रमात सादरीकरण तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवात एसएनडीटी विद्यापीठाच्या संघांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. प्रफुल्लने दिग्दर्शित केलेल्या स्किट, माईमला सुवर्णपदक मिळाले, तर त्याच्या ’क्लिक’ या नाटकाला ’झी गौरव’चा ’विशेष लक्षवेधी नाटक पुरस्कार’ मिळाल्याने आतापर्यंत मिळवलेल्या अनेक पुरस्कारांपैकी हा अनमोल ठरला. ज्या भागात नाटक पोहोचलेले नाही, तिथे नाट्य चळवळ रुजविण्याचा मानस तो बोलून दाखवतो. दरवर्षी त्याच्या संस्थेतर्फे दि. २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी ’मिशन मेक इट पॉसिबल’ हा कार्यक्रम होतो. स्वतःचे मार्ग स्वतः तयार करताना परोपकारी वृत्तीने देशाचे नाव उज्वल करण्याचा सल्लाही तो युवावर्गाला देतो. अशा या सतत नावीन्याची कास धरलेल्या कलावंताला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९००४९१२४६८)
Powered By Sangraha 9.0